‘अग्निपंख’चा  ‘बेस्ट स्कुल’ उपक्रम अमरावतीत राबविणार : आ.बच्चू कडू 

श्रीगोंदा दिनांक ३ डिसेंबर :-
मी कायमच कर्दनकाळ नाही.चांगले काम खांद्यांवर घ्यायची तयारी आहे.शिक्षण क्षेत्रातील चांगुलपणा शोधून त्यांना सन्मानित करण्याचा ‘अग्निपंख’ च्या बेस्ट स्कुल चा उपक्रम मी आमच्या अमरावती जिल्ह्यात राबविणार आहे,त्याचा प्रारंभ अचलपूर मधून करणार असल्याचे प्रतिपादन ‘प्रहार’चे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी केले.
         येथील तुळशीदास लान्स मध्ये रविवारी दुपारी आयोजित अग्निपंख प्रेरणा उत्सवात प्रमुख अतिथी व गौरवमूर्ती म्हणून ते बोलत होते.वीरमाता सरस्वती उदार अध्यक्षस्थानी होत्या.तत्पूर्वी ‘ बेस्टलीडर’ चा अवॉर्ड ज्येष्ठनेते गणपतराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला.प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित नव्हते.त्यांच्या वतीने सांगोला सुतगीरणीचे अध्यक्ष नानासाहेब लिंगाडे यांनी तो माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते स्वीकारला.आ.कडू यांना जीवन गौरव पुरस्कार वृक्षमित्र व राष्ट्रपती पदक विजेते प्रा.आबासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.ऊसतोडणी मजुरांच्या मुलांची शाळा असलेल्या जरेवाडी (ता.पाटोदा)प्रा.शाळेला बेस्ट स्कुल चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.त्या सोबत तालुक्यातील  दहा प्राथमिक व आठ माध्यमिक शाळांना बेस्ट स्कुल पुरस्काराने गौरविण्यात आले.
         डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या या प्रेरणा उत्सवाचा उल्लेख करीत आ.कडू म्हणाले,डॉ.कलाम यांच्या नावाने दिल्या जाणारा पुरस्कार स्वीकारण्याची माझी पात्रता नाही.बेस्ट स्कुल ला गौरविण्याचा अग्निपंख चा उपक्रम मी माझ्या जिल्ह्यात राबवेल.आज समाजात जात,धर्म व पंथाच्या नावाने भांडणे लावली जात आहेत.मात्र समाजातील विषमते विरोधात वातावरण का पेटवले जात नाही.आमदाराचा मुलगा ज्या शाळेत त्याच शाळेत गरीबाच्या मुलाला प्रवेश मिळतो का?शेतीला रात्री अपरात्री वीज दिली जाते,मग हेच धोरण उद्योगधंद्यांना का लागू करत नाही.शहरी अन ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा क्षमतेत खूप तफावत आहे.मजुरांचा अन अधिकाऱ्यांचा पगार सारखा का नाही.मजुरीला ‘स्किल’ नसते का? विरोधीबाकावर असताना ते जे बोलत होते  आता सत्ता असताना ते गप्प का?जेथे खोकल्याची औषधे घ्यायला पैसे नाहीत,तेथे पुतळयावर साडे तीन हजार कोटी खर्च केले जातात.कोणताही उत्सव आला की नाचायला तरुणांची गर्दी जमते.आपली परंपरा लढण्याची होती ती नाचण्याची कशी काय झाली.समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रदीर्घ लढा उभारला लागेल.”
         श्री.पाचपुते म्हणाले,”अग्निपंख च्या काकडे  व त्यांच्या टीम ने पुरस्कारांची रास्त निवड केली आहे.वर्षभर विविध उपक्रम राबवून ते समाजाचा मोठा दुवा मिळवत आहेत.मोठ्यांचे पाय धारण्यापेक्षा गरिबांचे आशीर्वाद लाखमोलाचे आहेत.अनाथांना मूठभर धान्य,बेघराना मदत,दुर्धररुग्णांना उपचार,विरमातांचा सन्मान ,एमपीएससी उत्तीर्ण साठी उपक्रमा मुळे ‘अग्निपंख’ ने समाजात आदर्श निर्माण केला आहे.पाचपुते यांनी यावेळी राजकीय विरोधकांना कोपरखळ्या मारत चिमटे काढले.कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब काकडे यांनी आमदार गणपतराव देशमुख व ऑलम्पिक विजेत्या ललिता बाबर यांच्या जीवनावर आधारित धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली.बच्चू कडू व पाचपुते यांनी ही मागणी शासन दरबारी मांडण्याची तयारी दर्शविली.संयोजक दिलीप काटे यांनी प्रास्ताविक करताना अग्निपंख ने मागील तीन वर्षात केलेल्या उपक्रमाची माहिती दिली.                                                                           यावेळी, नानासाहेब लिंगाडे,स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आदींची भाषणे झाली.प्रा.शंकर गवते यांनी सूत्रसंचालन केले.विचारमंचकावर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस,प्रा.तुकाराम दरेकर,सभापती भैय्या लगड,उपसभापती प्रतिभा झिटे,नगराध्यक्ष मनोहर पोटे,उपनगराध्यक्ष अर्चना राजू गोरे,शुभांगी लगड,सुवर्णा पाचपुते,प्रा.संजय लाकुडझोडे,रामदास झेंडे,हरिदास शिर्के, अरुणराव पाचपुते,डी.बी.रोडे,शिवदास शिंदे डॉ.खंदारे,मनीषा काकडे,सुरेखा शेंद्रे,तहसीलदार महेंद्र माळी आदी सह शिक्षण व राजकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.जेष्ठ नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलीकराव जगताप यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply