दिनांक २७ एप्रिल,श्रीगोंदा :
शहरातील पत्रकार शिवाजी साळुंके हे वार्तांकन करण्यासाठी परिसरातील औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर गेले असता,त्यांना ५ ते ६ गावगुंडांनी मिळून जमावबंदीचा कायदा मोडत प्राणघातक हल्ला करीत जखमी केले आहे. त्यांच्यावर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्रकार साळुंखे यांच्या फिर्यादीवरून नमूद आरोपीं विरोधात जबर मारहाणीसह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पत्रकार शिवाजी साळुंके यांना परिसरातील शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली.की, कुकडी वितरिका क्रमांक ११ वर काही इसमांनी अनधिकृतपणे वितारिकेला भगदाड पाडून पाणी चोरून भरणे चालवले आहे. त्यामुळे ते सकाळी ९ वाजेच्या सुमारास वितरिकेवर वार्तांकन करण्यासाठी गेले.त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शशिकांत माने जे जेसीबी यंत्राच्या साह्याने भगदाड बुजविण्यासाठी आले होते. वितरिकेला भगदाड पाडलेले पाहून फोटो काढण्यासाठी साळुंखे यांनी मोबाईल काढला असता,आरोपी आबा सखाराम औटी,दशरथ आण्णा औटी,ज्ञानदेव औटी, भरत औटी, आबा औटी या पाच जणांनी उपअभियंता माने यांच्या समक्ष त्यांची मोटारसायकल वितरिकेत ढकलून देऊन, शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण केली.तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना वितरिकेच्या पाण्यात ढकलून दिले.जखमी अवस्थेत त्यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीने आरोपींच्या तावडीतून सुटत श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठले.
यावेळी साळुंखे यांनी घडलेला सर्व प्रकार पोलीस निरीक्षकांना सांगितला.जखमी असल्याने आगोदर उपचार घ्या असे पोलिसांनी सांगितले.त्यानुसार पत्रकार साळुंखे यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन श्रीगोंदा ग्रामीण रुग्नालयात उपचार घेतले.घडलेल्या सर्व प्रकारावरून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि भारतीय दंड विधान कलम ३०७ नुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करत आहेत.
काही वेळात गुन्हा दाखल करतील ,मात्र कुणीच आले नाही – हेमंत धुमाळ कुकडीच्या वितरिका क्र. ११ काही लोकांनी फोडली आहे. त्या ठिकाणी पत्रकार साळुंखे याना मारहाण झाली आहे.याबाबत अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले कि,आमची वितरिका फोडली असेल तर मी आमचे अधिकारी तात्काळ गुन्हा दाखल करायला येतील.असे त्यांनी सांगितले. मात्र, वास्तविक पाहता कुकडीचे अधिकाराची अथवा कर्मचारी वितरिका फोडल्या प्रकरणी कोणीही गुन्हा दाखल करण्यास आले नाहीत.
समज देताच सर्वजण निघून गेले – शशिकांत माने.
कुकडी वितरिका क्र.११ वर चारी फोडल्याची माहिती मिळताच आम्ही आमच्या सहकाऱ्यां सोबत जेसीबी यंत्र घेऊन त्या ठिकाणी गेलो असता,नमूद ठिकाणी पत्रकार साळुंखे यांना मारहाण चालू होती.मी पुढे जाऊन त्यांची सोडवासोडव केली.अशी माहिती शाखा अभियंता माने यांनी पत्रकारांना दिली आहे.
