दिनांक २७ एप्रिल,पुणे:
कोरोनामुळे नियोजित विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ अनेकांवर आली.मात्र, श्रीगोंदा तालुक्यातील किरण निंभोरे आणि राणी डफळ यांनी आपला विवाह २७ एप्रिल रोजी करण्याचे ठरवले.त्यास कारणही तसेच आहे. लॉकडाऊन मुळे आज पुण्यात जवळपास २ हजार पेक्षा जास्त राज्यभरातील विद्यार्थी गुंतलेले आहेत. मेस बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत. मागील १ महिन्यापासून किरण आणि त्याचे मित्र विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून त्या मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करत आहेत. परंतु,लॉकाडाऊन वाढत चालल्याने काही अन्नदाते माघार घेऊ लागले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावचे किरण निंभोरे यांचा विवाह येळपणे येतील राणी डफळ यांच्याशी मागील वर्षी ठरलेला होता.आजची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहून, किरणने आत्ताच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही कुटुंबीयांनी किरणला साथ देण्याचा निर्धार केला. लग्नासाठीचा नियोजित खर्च विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी वापरण्याचं ठरवलं. या पैशातून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आणि लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा दोन वेळच्या जेवणासाठी प्रश्न मार्गी लागणार आहे.
आज २७ एप्रिल रोजी सांयकाळी ४:४५ ला लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टनसिंग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत,दोघांच्या आई-वडिलांच्या साक्षीने घरामध्येच फेसबुक, यूट्यूब या सोशल नेटवर्किंगच्या सहाय्याने त्यांचा लाईव्ह विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार यांना ऑनलाईन हजेरी लावता आली. विवाहाचे थेट प्रक्षेपण वास्तव कट्टा या यूट्यूब चॅनलवर आणि एमपीएससी स्टुडंट राईट्स या फेसबुक पेजवरून करण्यात आले. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
