बिबट्याच्या हल्यात तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यु..! अजनुज गावच्या ग्रामसभेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी.. तर, अधिकाऱ्यांचे लोकांना सतर्कतेचे आवाहन..

दिनांक २० जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

(घटनेतील छायाचित्र वाचकांस विचलित करु शकते…)
तालुक्यातील अजनुज गावच्या शिवारात हॉटेल रानवारा च्या मागे ऊस तोडणसाठी चाळीसगाव येथून आलेल्या अरुण गायकवाड यांच्या तीन वर्षांच्या लक्ष्मीला बिबट्याच्या हल्यात आपला जीव गमावावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेने अजनुज गावासह तालुक्यांत दुःख व्यक्त केले जात आहे.

या घटनेबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. काल दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ७:३० वाजनेच्या सुमारास अजनुज येथे राहोटी बाहेर खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीवर या परीसरात वावरत असलेल्या बिबट्याने हल्ला केला.. त्यात तिच्या डोक्याला, मानेला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्यामूळे सदर मुलगी मयत झाली आहे.

चाळीसगाव येथून मोल मजुरीसाठी श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील कारखान्यावर ऊस तोडणीस आलेल्या अरुण गायकवाड यांच्या कुटुंबावर या दुर्दैवी घटनेने मोठा आघात झाला आहे. परीसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याच्या आणि त्याचे सर्रास होणारे दर्शन यामुळे परीसरात भीतीचे सावट होते. अनेकदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपाय योजना करण्यासंदर्भात स्थानिक मागणी करीत होते. मात्र, १४५ गावांचे मोठें कार्यक्षेत्र, कर्मचाऱ्यांचे कमी संख्याबळ आणि संसाधनांचा अभाव असल्याने वन आणि वन्य जीव विभागाला कारवाई बाबत अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

काल घडलेल्या घटनेमुळे या परीसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून, आज सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक वन परिक्षेत्र अधिकारी श्रीगोंदा आणि कर्जत यांच्या संयुक्त अजनुज गावात घेतलेल्या ग्रामसभेत लोकांना खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती देत सतर्कतेचे आवाहन केले आहे. तर, या ठिकाणी थर्मल ड्रोन मार्फत बिबट्या शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. वाढीव पिंजऱ्यांची शासनाकडे मागणी केली असल्याचे माध्यमांना सांगीतले आहे. याबरोबरच येथील ग्रामस्थांनीही विविध मागण्या असलेले निवेदन स्थानिक प्रशासनाला सुपूर्त केले आहे.

पिडित कुटुंबाला २५ लक्ष रूपयांची शासनाची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत गणेश मिसाळ (जिल्हा उप वनअधिकारी), दिपाली भगत (वन परिक्षेत्र अधिकारी, श्रीगोंदा), मोहन शेळके (वन परिक्षेत्र अधिकारी, कर्जत) यांनी माहिती दिली. तर, घटनास्थळी वन विभागाचे फिरते पथक, नगर/श्रीगोंदा/कर्जतचे अधिकारी, कर्मचारी, वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

मृतकाचे शव विच्छेदन झाल्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच, ग्रामसभेत लोकांकडून अधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनूसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading