दिनांक ५ मे श्रीगोंदा:
जगभर थैमान घालून हाहाकार माजवणाऱ्या कोरोना सारख्या दुर्धर व्याधी वर उपचार करणारी लस सापडत नाही,तोपर्यंत आपल्याला काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही. या भयंकर आपत्तीवर मात करण्यासाठी सामाजिक जनजागृतीच्या माध्यमांतून करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.
सद्य परिस्थितीत डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ यांच्या बरोबरीने प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावत जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सर्वांमध्ये महत्वाचा समन्वय साधणारे पत्रकार बांधव आपआपल्या परीने या लढ्यात सहभागी झाले आहेत. या अवघड परिस्थितीत वार्तांकन तसेच वृत्त संकलन करण्यासाठी धावपळ करणाऱ्या पत्रकारांसाठी फुल ना फुलाची पाखळी देणारा एक हात पुढे आला आहे. श्रीगोंद्याच्या माध्यम क्षेत्रात अल्पावधीत एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या माध्यम विश्लेषक अवधुत राऊत यांनी या पत्रकारांची जाणीव ठेवत त्यांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप केले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्व कार्यरत पत्रकारांना एकत्र आणत राऊत यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते या किटचे पत्रकारांना वाटप केले. या किट मध्ये उच्चप्रतीचे पॉकेट सॅनिटाइझर, कापडी मास्क, रोगप्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या व्हिटामिन-सी च्या टॅब्स समाविष्ट आहेत.
या सगळ्या परिस्थितीत धावपळ करणाऱ्या पत्रकारांचा सर्व राजकीय नेत्यांना विसर पडलेला दिसून येत असताना,एका मोठ्या राजकीय यंत्रणेचा मुख्य घटक राहिलेल्या राऊत यांनी पत्रकारांची व्यक्तिगतरित्या जाणीव ठेवल्याने त्यांचे माध्यम क्षेत्रात कौतुक होत आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल चव्हाण यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पत्रकार अर्षद शेख , चंदन घोडके यांनी प्रयत्न केले. पत्रकार बाळासाहेब काकडे,पत्रकार अंकुश तुपे, पत्रकार राजमहंमद शेख, पत्रकार दादासाहेब सोनवणे, पत्रकार योगेश चंदन, पत्रकार शकील भाई शेख, पत्रकार शिवाजी साळुंखे, पत्रकार सुभाष शिंदे सह तालुक्यातील बहुतांश पत्रकार हजर होते.
