#Accident.. दुर्दैवी अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू; निष्काळजी चालकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल..

दिनांक १९ मे २०२५, शिरूर/श्रीगोंदा:

शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत असलेल्या कळसकरवाडी येथे १  मे रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता एका दुर्दैवी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

या अपघातात इनामगाव येथील दिलीप दगडू शिंदे (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी श्रीगोंदा येथील वाहन चालकाविरोधात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप शिंदे हे त्यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची सी.टी. ११० एक्स मोटारसायकल (MH12TP4081) घेऊन जात असताना, श्रीगोंदा येथील महेश शिवाजी तावले (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या आरोपीने चालवलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाने (MH14GA8624) त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की, दिलीप शिंदे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या मोटारसायकलचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी मयताचे चिरंजीव सतिष दिलीप शिंदे (वय ३८, धंदा – शेती, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, आरोपीने भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि अविचाराने वाहन चालवल्यामुळे अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीनुसार शिरूर पोलीस स्टेशनमध्ये मोटार वाहन कायद्यानुसार आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी करत असून, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

—स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading