दिनांक २८ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस आणि वरवंडच्या सीमेजवळ असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ दोन एसटी बसची भीषण धडक होऊन गंभीर अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि एक ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, दोन्ही बसमधील ४० ते ४५ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी ही माहिती दिली आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सुवर्णा संतोष होले (वय ३८, रा. बिरोबावाडी, ता. दौंड, जि. पुणे) आणि नामदेव आढाव (वय ७०, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांचा समावेश आहे. या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड ते स्वारगेट जाणारी एसटी बस पुणे दिशेला जात असताना एका मोटारसायकल स्वाराची मोटर सायकल अचानक मार्गात आडवी आल्याने, एसटी बस चालकाने मोटारसायकल स्वाराला वाचवण्यासाठी गाडी बाजूला घेतली. यात वाहनावरील ताबा सुटल्याने बसने पुण्याहून तुळजापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला धडक दिली. हा अपघात आज दुपारी एक ते दीड च्या दरम्यान घडला आहे.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी तातडीने पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा पोहोचल्या. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)




