दिनांक: २० जून २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी २९ मे २०२४ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी, बलवंतराय गोपालराय राजभर, हा उत्तर प्रदेशातील मुबारकपूर, तालुका चकिया, जिल्हा चंदोही येथील रहिवासी आहे.
मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक विश्लेषणातून तपास सुरू करण्यात आला. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग यांनी एक टीम तयार केली आणि सुमारे दीड हजार किलोमीटरवरील ठिकाणी कारवाई केली.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने ४८ तासांत मुलीला ताब्यात घेतले गेले आणि आरोपीला अटक करण्यात आली. या तातडीच्या आणि यशस्वी कारवाईमुळे श्रीगोंदा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलीस यांचे कौतुक केले जात आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्या नेतृत्वाखाली पोना गुलाब मोरे, पोकॉ मनोज साखरे, पोकॉ गणेश साने, पोकॉ प्रताप देवकाते, पोना गणेश गाडे, आणि सायबर सेलचे गुंडू राहुल यांनी सहभाग घेतला.
पीडित मुलीच्या जबाबानुसार, आरोपी राजभर याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल श्रीगोंदा पोलीस टीमचे आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
स्रोत: (मिळालेल्या माहितीनुसार)


