दिनांक २३ मार्च,श्रीगोंदा:
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड – १९ ) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करणेसाठी अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कोव्हीड – १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळे आदेश निर्गमित केलेले आहेत.
श्रीगोंदा शहरातील विविध भागात पिपंरी चिंचवड , पुणे , मुंबई अशा कोरोना विषाणुग्रस्त भागातुन नागरीक आलेले असल्याची माहिती समोर येत आहे.तसेच,नमूद ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या लोकांकडून ही शहरी भागातील बरेच लोक प्रवास करून श्रीगोंदा शहरांत आले असल्याची चर्चा आहे .
त्यामुळे संभाव्य विषाणु संसर्गाचा धोका लक्षात घेता सदर नागरीकांनी घराबाहेर पडु नये , शेजारी , मित्र अथवा नातेवाईक यांचेकडेस जाऊ नये. त्यांनी स्वतःला आपले घरामध्ये अलगीकरण करुन घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच कोरोना विषाणुची काही लक्षणे आढळुन आल्यास,त्वरीत आरोग्य विभाग व महसूल विभाग यांचेशी संपर्क साधान्या विषयी सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
वरीलप्रमाणे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदींनुसार तसेच राज्य शासनाकडील अधिसुचना १४ मार्च २०२० नुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी निर्गमित केलेल्या आदेशांचे कोणत्याही व्यक्तिने उल्लंघन केल्यास,त्यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे श्रीगोंदयाचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.
