दिनांक ९ जुन २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील आदिवासी भटके विमुक्त समाजासाठी अतिक्रमित जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जातीचे दाखले मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार मुदगुल यांनी १२ जून रोजी शक्ती प्रादत्त समितीची बैठक घेऊन जागेच्या हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यात येईल आणि १५ दिवसांत जातीच्या दाखल्यांसाठी कॅम्प आयोजित केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले.

लिंपणगावमधील जुना गट क्रमांक ५२/५२ आणि नवीन गट क्रमांक २/१/५२ वर १९९४ पासून आदिवासी भटके विमुक्त समाजाची कच्ची घरे, झोपड्या उभ्या आहेत. या वस्तीमध्ये सुमारे ३५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. यापैकी ३५ कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झाली आहेत, मात्र जागा अधिकृत नसल्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे १६ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयाच्या आधारे शक्ती प्रादत्त समितीमार्फत जागा नियमित करून हस्तांतरित करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले. यावेळी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या लता सावंत, पल्लवी शेलार, उमाताई जाधव, बापू ओहोळ, तुकाराम पवार, विशाल पवार, आसाराम काळे, संतोष चव्हाण, राहुल पवार, सचिन चव्हाण, आतिश पारवे, राजू शिंदे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीराताई शिंदे, तालुका प्रमुख नंदू गाडे तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.

सकाळी ११:०० वाजता शेख महंमद महाराज मंदिरापासून पारंपरिक वाद्यांसह – ढोल, ताशा, हलगी, डफ, तुणतुणे यांच्या गजरात रॅली सुरू झाली आणि पोलीस स्टेशन मार्गे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. आंदोलकांनी “आवाज दो हम एक है”, “जमीन आमच्या हक्काची”, “आमचा लढा न्यायासाठी” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आंदोलनस्थळी लता सावंत, तुकाराम पवार, अनिल घनवट, रूपचंद सावंत, संजय सावंत, अरविंद कापसे, मीराताई शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू ओहोळ यांनी, सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी आणि आभार प्रदर्शन पल्लवी शेलार यांनी केले.
स्रोत:(आंदोलन)
