दिनांक ३ मार्च २०२५, श्रीगोंदा/नाशिक:
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगनरावजी भुजबळ उपस्थित होते.
या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील कार्ययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रदेश कार्यकारिणीमध्ये काही नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ओबीसी नेते अनिल निकम यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रीगोंद्याचे फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष मुकुंद सोनटक्के यांना महाराष्ट्र प्रदेश प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, गोरख आळेकर, सुभाष लोंढे आणि बबन घुमटकर यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या बैठकीत संघटनेच्या विविध उपक्रमांवर आणि समाजहिताच्या कार्यावर सखोल चर्चा झाली. आगामी काळात ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





Advertise..
