वयाच्या ५२ व्या वर्षी एसएससी परीक्षेत महिलेचे ४८% मिळवून यश ..!

दिनांक २८ मे २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

शिक्षण पूर्ण करण्यासाठी वय महत्त्वाचे नसून जिद्द महत्त्वाची आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपली इच्छा व महत्त्वकांक्षाच्या बळावर पूर्ण करू शकतो. हे दाखवून दिले आहे. कोळगाव येथील सौ निर्मला ज्ञानदेव साबळे यांनी. १९८९ मध्ये दहावीला फक्त प्रवेश घेतला होता व आता श्री कोळाईदेवी विद्यालय कोळगाव येथे २०२४ मध्ये परीक्षा देऊन ४८ टक्क्यांनी पास होण्याची किमया सौ निर्मला साबळे यांनी साधली आहे.

शिंदे बाई दत्तात्रेय उर्फ सौ निर्मला ज्ञानदेव साबळे यांनी १९८८-८९ साली इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. परंतु दोन महिन्यांनी त्यांना शाळा सोडावी लागली. त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. पर्यायाने आणखीनच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्या. शिक्षण बंद झाले. प्रपंच, शेती, मुलेबाळे, यांच्यामध्ये त्या रमल्या.

पुढे त्यांना २००१ या सालापासून अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या शिंदेमळा येथे काम सुरू केले. परंतु, आपण इयत्ता दहावी पास होऊ शकलो नाही. ही खंत मनामध्ये सलत होती. त्या योग्य संधीची वाट पाहत होत्या. अंगणवाडी मदतनीस मधून जर बढतीने अंगणवाडी सेविका म्हणून जायचे असेल..  तर, इयत्ता दहावी पास व्हावे लागेल, हे त्यांना समजले.

सध्याच्या शिंदे मळा येथील अंगणवाडी सेविका क्षीरसागर मॅडम या दोन-तीन वर्षांनी सेवानिवृत्त होणार आहेत. तेथे आपणास अंगणवाडी सेविका म्हणून काम करता येईल. या अपेक्षेने त्यांनी यावर्षी २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना घरातून प्रोत्साहन मिळाले. त्यांचे पती प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव साबळे, दीर प्रा. तुळशीदास साबळे, सासरे तात्याबा साबळे यांनी त्यांना परीक्षेस पास होऊ शकता हा विश्वास दिला.

पियुष बाळासाहेब साबळे याने स्वतः दहावीची परीक्षा देत असल्याने सौ निर्मला यांना अभ्यासासाठी मदत केली. पियुष साबळे हा दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. तर, सौ निर्मला साबळे या ४८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा इंजिनिअर असून, मुलगी पोलीस मध्ये सध्या कार्यरत आहेत.

कोळगाव मध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, केवळ जिद्दीच्या बळावर कुठलेही आव्हान स्वीकारण्याची ताकद एका अंगणवाडी मदतनीस यांनी जगाला दाखवून दिली. त्यांच्या या यशाबद्दल कोळगाव सोसायटीचे चेअरमन श्री हेमंत नलगे, सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच माया संतोष मेहत्रे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग, प्राचार्य शहाजी हिरडे, शिक्षिका शुभांगी भोईटे, तसेच सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

इच्छाशक्ती तीव्र असल्यास कुठल्याही संकटावर मात करू शकतो. अशी जबरदस्त महत्त्वाकांक्षा बाळगल्याने आपणास हे यश प्राप्त झाले. या कामी सर्व कुटुंबीयांचे, श्री कोळाई देवी विद्यालयातील प्राचार्य श्री हिरडे शहाजी, शिक्षिका सौ शुभांगी नलगे यांची मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

Leave a Reply