श्रीगोंदा नगर पालिकेने नियमित स्वच्छता ठेवावी.. अन्यथा दिनांक ३० मे रोजी पालिकेच्या कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन करण्यात येईल..: सागर कोथिंबीरे..

दिनांक २८ मे २०२४, श्रीगोंदा:

शहरातील विविध भागात घाणेचे साम्राज्य निर्माण झाले असून, साळवण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला असल्याचे लेखी तक्रारी पत्र श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.

याबाबत श्री.सागर कोथिंबीरे (शहर उपाध्यक्ष, रा.कॉ.) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, श्रीगोंदा साळवण देवी रोडवर मच्छी/चिकन मार्केटच्या मागील बाजूस येथील दुकानदार चिकन आणि मच्छीचे अवशेष फेकून देत असल्याने, रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी क्षेत्र निर्माण झाले असून, या रस्त्याने ये – जा करणाऱ्या नागरिकांना घाणीचा प्रादुर्भाव होऊन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

सागर कोथिंबीरे यांनी नमूद पत्राद्वारे नपा प्रशासनाला सूचित केले आहे की,  एसटी स्टँडच्या मागच्या बाजूस व साळवनदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत लोकांना येता जाता दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने यापूर्वीहि वेळोवेळी श्रीगोंदा पालिका प्रशासनाला याबाबत तक्रारी अर्ज देण्यात आलेले आहेत. मात्र, नियोजित ठिकाणी नियमित स्वच्छता होत नसल्याचे दिसून येत आहे.

साळवण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील दयनीय अवस्था पाहून मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येण्याची शक्यता स्थानिक नागरिक वर्तवत आहेत. तसेच, याच रोडवरील बरेच पथदिवे बंद असल्याने तेही तात्काळ दुरुस्त करून घेण्यात यावेत. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर ठिकाणी होणारी घाण तात्काळ स्वच्छ करावी व पथदिव्य दुरुस्त करून घेण्यात यावेत.. अन्यथा दिनांक ३० मे २०२४ रोजी श्रीगोंदा नगरपालिका कार्यालयासमोर सदरील घाण (कचरा) टाकत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येईल..!  याची स्थानिक प्रशासनाने नोंद घ्यावी.. असे निवेदन सादर करण्यात आले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading