श्रीगोंदा शहरातील सराईत गुन्हेगार आतिक कुरेशी एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्ध..

दिनांक २९ मार्च श्रीगोंदा, अहिल्यानगर:

शहरातील खाटीकगल्ली परिसरात राहणारा आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार आतिक गुलामहुसेन कुरेशी (वय ३४) यास एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश मा. जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी दिला आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आतिक कुरेशी याने त्याच्या साथीदारांसह गोरक्षण कायद्याचे उल्लंघन करत गोवंशीय जनावरांची कत्तल करून विक्री करण्याचे गंभीर गुन्हे केले होते. तसेच त्याने खुनाचा प्रयत्न, दरोडा, महिलांचा विनयभंग, बलात्कार, जबरी चोरी आणि खून यासारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांत सहभाग घेतल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आतिक कुरेशीच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे श्रीगोंदा आणि परिसरातील शांतता भंग होत होती. त्याच्या समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी आधीच्या हद्दपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया अपुऱ्या ठरत होत्या. त्यामुळे श्रीगोंदा सहा.पोलीस निरीक्षक श्री. प्रभाकर निकम यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून तो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे आणि पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकारी मा. डॉ. पंकज आशिया यांच्याकडे पाठवला.

सदर प्रस्ताव आणि सोबतच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केल्यानंतर जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आतिक कुरेशी यास एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यास ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेर, स.फौ. रविंद्र पांडे, पोहेकॉ सुरेश माळी, पोना सोमनाथ झांबरे, पोकॉ रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, मनोज लातुरकर, अमोल कोतकर, चासफौ महादेव भांड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहकार्य केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, वाळू तस्कर आणि संघटित गुन्हेगारी टोळींच्या हालचालींवर कठोर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा गुन्हेगारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी दिले आहेत.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading