पाटील हॉस्पिटल: सर्वसामान्यांचे विश्वासस्थान,.. डॉक्टर संदीप पाटील यांचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद.!

दिनांक २९ मार्च २०२५, श्रीगोंदा::

श्रीगोंदा शहरातील पाटील हॉस्पिटल हे केवळ आरोग्यसेवेचे केंद्र नसून, माणुसकीचा जिवंत संदेश देणारे ठिकाण बनले आहे. वैद्यकीय क्षेत्रात केवळ व्यवसायिक दृष्टीकोन न ठेवता समाजातील दुर्बल आणि गरजू रुग्णांना सहकार्य करण्याची आपली परंपरा डॉक्टर संदीप पाटील यांनी कायम ठेवली आहे.

असाच एक प्रसंग काही दिवसांपूर्वी घडला. पुण्याहून नांदेडकडे मोटरसायकलवर प्रवास करणाऱ्या एका इसमाचा श्रीगोंद्याच्या आढळगाव जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचा हात निकामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याशिवाय, मोठ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्चही मोठा होता.

अत्यवस्थ स्थितीत असलेल्या या अपघातग्रस्ताला तातडीने ऑपरेशनची गरज होती. मात्र, नांदेडसारख्या लांबच्या ठिकाणी राहणाऱ्या या इसमाच्या नातेवाईकांना त्वरित आवश्यक आर्थिक मदत करणे शक्य नव्हते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टर संदीप पाटील यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चातून शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, भूलतज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था केली आणि वेळ न दवडता त्या इसमावर शस्त्रक्रिया केली. त्यांच्या त्वरित निर्णयामुळे त्या रुग्णाचा हात निकामी होण्यापासून वाचला.

उपचारानंतर काही दिवसांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाचा काही भाग भरला, मात्र पूर्ण रक्कम देणे त्यांना शक्य झाले नाही. अशा स्थितीत डॉक्टर संदीप पाटील यांनी पैशांपेक्षा माणुसकी मोठी मानत कोणतीही नाराजी व्यक्त न करता तेवढ्याच समाधानाने रुग्णास मदत केली. या कृतीमधून त्यांनी “डॉक्टर खरंच देवदूत असतात” याचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना दिला.

“मला अनेक सत्कर्म करायची आहेत” – डॉक्टर संदीप पाटील..

आपल्या कार्याबद्दल बोलताना डॉक्टर संदीप पाटील म्हणाले, “लोक डॉक्टरांमध्ये देवाचे दर्शन करतात. मात्र, देव रूपी काम करण्याची इच्छा मनात ठेवूनच मी माझ्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. मला अनेक सत्कर्म करायची आहेत, आणि ही माणुसकीची सेवा मी पुढेही चालू ठेवीन.”

श्रीगोंद्यासह संपूर्ण तालुक्यात डॉक्टर संदीप पाटील यांचे कार्य कौतुकास्पद मानले जात आहे. आर्थिक दुर्बल आणि मागास घटकांना सातत्याने मदत करणाऱ्या पाटील हॉस्पिटलबद्दल नागरिकांमध्ये विशेष आदर आणि विश्वास आहे. “सर्वसामान्य लोकांना आपले वाटणारे हॉस्पिटल म्हणजे पाटील हॉस्पिटल,” असे स्थानिक रहिवासी अभिमानाने सांगतात.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading