दिनांक १ ऑक्टोबर २०१५,श्रीगोंदा:
राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झालेले आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था आणि श्री. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या सर्व संस्थांमधील सर्व सेवकांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.

राजेंद्रदादा नागवडे यांनी सांगितले की, यावर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीकाठच्या व इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

काही बांधव अक्षरशः बेघर झाले आहेत. पशुधन संकटात सापडले असून, त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची समस्या गंभीर झाली आहे. अशावेळी त्यांना मदतीची अत्यंत गरज असल्यामुळे आपण सामाजिक बांधिलकी स्वीकारून मदत करणे गरजेचे आहे.

ही सामाजिक बांधिलकी जपत नागवडे समूहातील सर्व संस्थांनी मदतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था व श्री. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा केला जाणार आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
