दिनांक ११ जुलै २०२४, श्रीगोंदा:
“वंचितांना मदत करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर महांडूळे यांनी केले. ते राहुल विद्यार्थी वस्तीगृह, श्रीगोंदा येथे शुभम गोरक्ष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
महांडूळे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांचाच विचाराचा वारसा राहुल वस्तीगृहाच्या माध्यमातून पुढे चालू आहे. याचा आम्हाला सर्वस्वी अभिमान आहे. त्यांनी वस्तीगृहास सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
गोरक्षनाथ गायकवाड यांनी आपल्या वस्तीगृहातील बालपण आठवले. विद्यार्थ्यांनी ध्येयाने प्रेरित होऊन अभ्यास करावा, यश तुमच्याच हातात आहे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले, “माझ्या मुलाचा वाढदिवस डीजे लावून साजरा करू शकलो असतो, पण गरजवंतांना मदत करणे हे माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे मी तुम्हा सर्वांना मदत करत आहे.”
यावेळी प्रशांत चव्हाण सर, अनिल उबाळे, मेघना गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले, तर आभार प्रेमराज जाधव यांनी मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






