भटके विमुक्त समाज घटकांना महिनाभरात दाखले देण्याचे मंत्री विखे यांचे निर्देश..

दिनांक ११ जुलै २०२४, अ.नगर:

भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना महिनाभरात दाखले वाटप करण्यासाठी विशेष शिबिरांचे सर्व जिल्ह्यात आयोजन करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्यांनी बैठकीत सांगितले की, कागदपत्रांची कोणतीही जाचक अट न ठेवता कोणत्याही एका पुराव्यावर दाखले देण्यात यावेत.

भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, महाआयटी विभागाच्या मुख्य व्यवस्थापक जयश्री भोज, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय पुरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील यांनी भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आणि दाखले मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.

आधार कार्ड, शिधा पत्रिका, आयुष्यमान कार्ड, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र असे विविध दाखले देण्यासाठी भटक्या विमुक्त विकास परिषदेच्या संयोजकांवरोबर तालुका स्तरावर तहसीलदार, ग्रामसेवक यांनी काम करावे आणि प्राधान्याने महिनाभरात जास्तीत जास्त शिबिरे राबवून दाखल्यांचे वाटप करावे असे मंत्री महोदय म्हणाले. तसेच सर्व विभागीय आयुक्तांनी दर आठवड्याला या संदर्भात बैठक घेऊन आढावा घ्यावा आणि आलेल्या अडचणी सोडवाव्यात, तसेच ३० ऑगस्ट पर्यंत ही मोहीम पूर्ण करावी असे त्यांनी सांगितले.

यामुळे आता भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना मतदान कार्ड, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा अधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचा भटके विमुक्त समाजाचा असल्याचा दाखला, शहरी भागात नगरसेवकांचा व ग्रामीण भागात सरपंच/उपसरपंच यांचा रहिवाशी दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र असल्यास आवश्यक असलेले दाखले मिळणार आहेत.

सदर मोहिमेतून भटके विमुक्त समाजाला विविध दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी संपुष्टात येतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading