बेलवंडी येथे मोटारसायकलस्वार चोरट्यांनी वयोवृद्धाला लुटले..

दिनांक २९ मार्च १०२५,बेलवंडी, ता. श्रीगोंदा:

बेलवंडी येथे भरदिवसा मोटारसायकलस्वार चोरट्यांनी वयोवृद्ध शेतकऱ्याला लुटल्याची घटना घडली. दोघा अज्ञात व्यक्तींनी मोठ्या शिताफीने मारुती गेणा हिरवे (वय ७०, रा. हिरवे वस्ती, बेलवंडी) यांची दीड तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ₹४५,०००) बळजबरीने काढून नेली.


मारुती हिरवे हे त्यांच्या बजाज मोटारसायकलवरून प्रथमेश मॉलकडून बेलवंडी गावाच्या दिशेने येत असताना सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास मराठी शाळेजवळ त्यांना दोन अनोळखी इसमांनी थांबवले. या दोघांपैकी एकाचा बांधा जाडसर असून त्याने टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती, तर दुसरा मध्यम शरीरयष्टीचा असून त्याने ओपन शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती.

या दोघांनी हिरवे यांना गप्पांमध्ये अडकवले आणि ते सरकारी विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यातील एकाने त्यांच्या मागून येत हात पकडला, तर दुसऱ्याने त्यांच्या उजव्या हातातील अंगठी व्हॅसलीन लावून काढून घेतली. अंगठी काढून घेताच दोघेही मोटारसायकलवरून भरधाव वेगाने पसार झाले.


मारुती हिरवे यांनी तात्काळ बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरटे साधारण ३० ते ३२ वयोगटातील होते. त्यांना पाहिल्यास ओळखू शकतो, असेही हिरवे यांनी पोलिसांना सांगितले.

या चोरीच्या घटनेनंतर बेलवंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बेलवंडी पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत असून, कोणत्याही संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना त्वरित कळवावी, असे सांगण्यात आले आहे.

स्रोत:(फिर्याद)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading