दिनांक ७ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:
तालुक्यातील कौठा गावात जमीन वादातून भालेराव कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित आशा सुनिल भालेराव (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिलीप हौसराव डोके व त्यांचे दोन पुत्र संकेत आणि सोहम यांनी सामाईक शेतबांधावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, मारहाण आणि जातीय अत्याचार केल्याचे म्हटले आहे.

दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, भालेराव कुटुंब कापूस वेचण्यासाठी त्यांच्या शेतात गेले होते. तेव्हा त्यांनी पाहिले की, डोके कुटुंबाने सामाईक बांध तोडून पाणी दुसऱ्या बाजूच्या शेतात वळवले होते. विचारणा केल्यावर दिलीप डोके आणि त्यांच्या मुलांनी आशा भालेराव यांच्या पती सुनिल यांच्यावर हल्ला केला. त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी पीडितांचे भाऊ मोहन भालेराव आणि जाऊ सुनिता भालेराव यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की आणि जातीय शिवीगाळ करण्यात आली.

आरोपींनी “महारड्यांनो, तुमच्यासारख्यांनी शेती करायची लायकी नाही,” असे म्हणत जातीय अपमान करत भालेराव कुटुंबाला धमकावले. घटनेनंतर पीडितांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

मारहाणीत जखमी झालेल्या सुनिल भालेराव यांना त्वरित श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी भालेराव कुटुंबाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात जीवे मारण्याची धमकी, मारहाण, जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे भालेराव कुटुंबाने आक्रमक भूमिका घेतली आहे. “आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास आम्ही श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करू,” असा इशारा पीडितांनी दिला आहे.
स्रोत:(फिर्याद)
