बहुजन समता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार: वसंतराव सकट…

दिनांक २६ सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:

बहुजन समता पार्टीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यात स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी श्रीगोंदा येथील पक्ष कार्यालयात आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घोषणा केली.

यावेळी बैठकीत वीस नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. वसंतराव सकट यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

वसंतराव सकट यांनी बैठकीत बोलताना बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारावर तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “बहुजन समाजावर अन्याय-अत्याचार खूप वाढत चाललेले आहेत

अशा प्रकरणांमध्ये दलित आणि बहुजन समाजाला न्याय मिळत नाहीये. अनेकदा पोलीस यंत्रणा आरोपीस अटक करत नाही आणि पोलीस अधिकारी देखील अन्याय करणाऱ्यांचीच बाजू घेतात, त्यामुळे दलितांवरील अन्यायाच्या घटना वाढत आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “पोलीस सविस्तर फिर्यादही घेत नाहीत, ज्यामुळे ज्याच्या विरोधात फिर्याद दाखल केलेली असते, तो व्यक्ती द्वेष भावनेने समाजाकडे बघत असतो आणि त्यामुळे अन्यायाचे प्रमाण आणखी वाढते.” यासाठी पोलीस यंत्रणेने घडल्या प्रकाराबाबत निश्चितपणे आहे तशी फिर्याद दाखल केली तर आरोपीला धाक बसेल आणि तो बहुजन समाजावर अन्याय करणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या वाढत्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये एक जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट मत वसंतराव सकट यांनी बैठकीमध्ये व्यक्त केले.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये सिताराम शिरसाट (जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर उत्तर), संजय पवार (जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर दक्षिण), हिरामण गायकवाड (कर्जत तालुकाध्यक्ष), सुधीर साठे (जामखेड तालुकाध्यक्ष), सचिन गायकवाड (कार्य अध्यक्ष अहिल्यानगर दक्षिण), पोपट शिंदे (पाथर्डी तालुका अध्यक्ष), गणेश केंदळे (कर्जत तालुका उपाध्यक्ष), मधुकर उकिरडे (जिल्हा संघटक अहिल्यानगर दक्षिण), सचिन साठे (नान्नज शाखा अध्यक्ष), राहुल पवार (कर्जत शहराध्यक्ष), मीना शेंडगे (श्रीगोंदा तालुका महिला अध्यक्ष), रोहिणी थोरात (कर्जत तालुका उपाध्यक्ष), ॲडव्होकेट नितीन लोंढे (कायदेशक सल्लागार अहिल्यानगर, बीड जिल्हा), राहुल शिंदे (कायदेविषयक सल्लागार अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.

या सर्व पदाधिकाऱ्यांचे वसंतराव सकट यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर यांनी देखील दूरध्वनीवरून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कामांसाठी शुभेच्छा दिल्या.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply