‘ॲट्रॉसिटी’ गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीगोंद्यात तणाव; लोणी व्यंकनाथ गाव कडकडीत बंद.!

दिनांक २६ सप्टेंबर २०२५श्रीगोंदा:

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावात दलित स्मशानभूमीच्या वादातून झालेल्या घटनेनंतर बाळासाहेब नहाटा यांच्यावर उशिरा ॲट्रॉसिटी (Atrocity) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Video समाविष्ट..

या गुन्ह्याच्या निषेधार्थ, लोणी व्यंकनाथ गाव आज कडकडीत बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली, तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात निषेध निवेदन सादर करण्यात आले. यामुळे तालुक्यात काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी लोणी गावात स्मशानभूमीच्या वादातून बाळासाहेब नहाटा यांच्यावर काही लोकांनी आणि जमावाने प्राणघातक हल्ला केला होता. काठी आणि टिकावाच्या माध्यमातून झालेल्या या हल्ल्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल झालेले आहे.

यानंतर, नहाटा यांनी जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बौद्ध समाजाने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.

या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी, समाजाच्या मागणीनुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी उशिरा बाळासाहेब नहाटा यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला.

नहाटा यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर २६ सप्टेंबर २०२५ (आज) रोजी सकाळी लोणी व्यंकनाथ गावातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी संपूर्ण गाव बंद ठेवत निषेध सभा घेतली.

समाज हिताचे काम करणाऱ्या बाळासाहेब नहाटा यांच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचा सूर या सभेत होता. सभेनंतर, मोठ्या जमावाने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला धाव घेतली.

तिथे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि तहसीलदार डोंगरे यांना दाखल गुन्ह्याच्या विरोधात निषेध निवेदन सादर करण्यात आले. या घटनेमुळे श्रीगोंदा शहरासह लोणी व्यंकनाथ परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

(स्रोत: अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading