दिनांक १५ जुलै २०२४, कोळगाव, श्रीगोंदा:
आज सायंकाळी कोळगाव येथे आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी साधारण साडेचार वाजता आकाश काळ्या ढगांनी आच्छादले गेले आणि जोरदार पावसास सुरुवात झाली. सुमारे एक तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर पाण्याने भरून गेला.
पावसामुळे कोळगावातील शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना थोडेफार अडथळे आले. पावसात भिजतच अनेक विद्यार्थ्यांना घरी जावे लागले. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसू लागली आहे. मूग, बाजरी, तूर, मटकी, हुलगे, कापूस, कांदा यांसारख्या खरीप पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे.
या वर्षी कोळगाव परिसरात सर्वच नक्षत्रांमध्ये वेळेवर पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे शेतांमध्ये बांधावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. लव्हाळे माजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी करावी लागत आहे. त्याचबरोबर पिकांना खते देणे, जमीन तयार करणे अशी कामे लगबगीने सुरु आहेत.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे लवकरच पूर्ण करता येणार आहेत. पावसामुळे जमिनीत आद्रता वाढल्याने पिकांची वाढ चांगली होणार आहे. शेतकरी वर्गाला यंदा चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. कोळगावातील शेतकरी या पावसाने आनंदीत आहेत आणि चांगल्या पिकांच्या आशेने तयारी करत आहेत.
स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)






