बलुत.
दिवसांकरिता पॅलेस्टाइन इथं जायचं असतं . त्याला दादांचाच विश्वास वाटतो . पेटी आमच्याच घरात ठेवून जातो . एक – दोन वर्ष होतात , तो परत येत नाही . आम्हाला वाटतं , म्हातारा वहुधा गचकला . दादांना मात्र त्यातले हिरे विकण्याचा मोह होत नाही . दोन वर्षानंतर म्हातारा परत येतो . त्याचा माल त्याला सहीसलामत परत दिला जातो . असे दादा .
मुंबई सोडताना तसं मला दुःख झालं . का कुणास ठाऊक , गाव आवडायचं नाही . मुंबईची दिव्यांची झिळमिळीत दुनिया . हे शहर म्हणजे अंगठीतल्या खड्यासारखं वाटायचं . बराच काळ मला गावी एक मजेदार स्वप्न पडायचं . एका उंच भिंतीवरून मी उडी मारायचो , की लगेच मुंबईला पोहोचायचो . मुंबईला चहाबरोबर बटर – पाव मिळायचे . कधी पाव – मस्का . सिनेमा तर नेहमीच पाहायचो- तो मारामारीचा . दादांनी एकदा आईला खास ‘ संत सखू दाखवलेला . साऱ्या सिनेमात सखूचं दुःख पाहून आई रडत असते . तिला आपलं दुःख सखूच्या रूपात तर दिसलं नसावं ना ? तिचं नाव सखू , म्हणूनच बहुधा तो खेळ दादांनी दाखवला असावा . असे रडके चित्रपट मला मात्र आवडायचे नाहीत . नादिया , जॉन कावसचे चित्रपट आवडायचे . पिलाहाउसला चार आण्यात ते पाहायला मिळायचे . माझ्या वयाच्या मुलाचे किती गमतीदार खेळ ? चिकोटी , हंज्याप , इत्यादी . हंज्याप म्हटलं , म्हणजे हात वर करायचे . म्हणणारा खिशातला असेल – नसेल तेवढा माल काढून घ्यायचा . गोट्या किंवा पत्ते मात्र कधीच खेळता आले नाहीत . चिकोटीला सारखा ढुंगणावर हात ठेवावा लागे . हात नसला म्हणजे ढुंगणावर सणसणीत चपराक बसायची . समोरच ख्रिश्चन मंडळींनी चालविलेलं नेबरहूड होतं . तिथं लोखंडी झोके , घसरगुंडी , सी सॉ असायचे . नेबरहूडच्या भिंतीवर बसून मुलं जाणाऱ्या – येणाऱ्या मोटारीच्या नंबरवर जुगार खेळत . ह्या खेळात रस वाटायचा नाही . मात्र व्हिक्टोरियाच्या पाठीमागे लटकणं , चालवणाऱ्याच्या चाबकाचा मार खाणं हे सारं थ्रिल वाटायचं . पाठीमागे फाटकी चादर बांधून वगीच्यात रानोमाळ हुंदडणं , टारझनसारख्या आरोळ्या मारणं ह्यात खूपच गंमत वाटायची . ह्या साऱ्या खेळांना आपण मुकणार याचंच वाईट वाटलं . त्या काळी गावी जाताना आगगाडीतून घोटी येथे उतरावं लागे .
आम्ही तसे घाटावरचे . तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेतील एक फाटा गेलेला . उंच असं कळसूबाईचं शिखर . तिथून मुंबई बेट टळटळीत दिसायचं- अर्थात हे सारं जुनी मंडळी सांगत . जन्मगावापासून जवळच अमृतवाहिनी प्रवरा नदी गेलेली . गाव तर डोंगराच्या कुशीत . तालुक्यात देशातील महत्त्वाचं ठरावं असं प्रचंड धरण- भंडारदरा . त्याचं पाणी खालच्या कोपरगाव , श्रीरामपूर , इत्यादी तालुक्यांना जायचं . ‘ दगडाच्या देशा ‘ हे वर्णन बहुधा आमच्या तालुक्याला पाहूनच कवितेत केलं असावं . तालुक्यात जादा संख्येने आदिवासी ,ठाकर , कोळी – लंगोट्या लावणारे , माझं गाव मात्र बहुसंख्य मराठ्यांचं . घोटी ते संगमनेर असा मोटारीचा प्रवास . त्या काळी एस . टी . नव्हती . तालुक्यात एका सधन मारवाड्याचा ने – आण करण्याचा मोटारीचा धंदा होता . ह्यात माणसं मेंढ्या – बकऱ्यांसारखी कोंबली जायची . टपावरही माणसं . गावातल्या कुणी प्रतिष्ठित अगर श्रीमंत असामीची सीट असेल , तर त्याच्या घरापुढे जाऊन गाडी उभी राह्यची . ड्रायव्हरजवळची सीट नेहमीच त्यांच्याकरिता रिझर्व . अशा मोटारीतून गावी गेलेलो चांगलं आठवतंय . घोटीपर्यंत मी विदाऊट असतो . लहान मुलाचं काय तिकीट काढायचं , असा आईवडिलांचा समज असावा . आपण विदाउट आहोत , केव्हाही पकडलं जाऊ , ही धास्ती माझ्या चेहऱ्यावर . स्टेशन येताच अंधारातून टी.सी.चा डोळा चुकवून मी बाहेर पडतो . आई – दादा फाटकावरच शोधत असतात . मी त्यांना अंधारातून खुणावत असतो . आई – दादा नंतर माझं कमालीचं कौतुक करतात . तसाच दुसरा प्रकार गाडीतला . तालुक्याच्या गावी आम्ही उतरतो , तो लक्षात येतं की पांढऱ्या चादरीतलं मोठं गठुडं उतरून घेतलंच नाही . ते संगमनेरला गेललं असतं . आईला स्टँडवर बसवून दादा आणि मी गठुड्याच्या शोधात . संगमनेरच्या स्टॅन्डवर मालकापाशी ते विनवारीस गठुडं असतं . मालक देण्यास राजी नाही . ” हे तुमचं कशावरून ? ” ह्यावर वाद . मी लहान असताही त्यांतील पदार्थाची नावं सांगतो . गंमत म्हणजे , आम्ही गावाला निघालो म्हणून मुंबईच्या सर्वच गाववाल्यांनी आमच्याकडे सामानाच्या पुरचुंड्या दिलेल्या . त्यावर आपलं नाव लिहिलेलं . सुईदोऱ्यात शिवलेलं . आतल्या पुरचुंड्यांवरील माणसांची नावं न पाहता जेव्हा मी सांगतो , तेव्हा कुठे मालकाचा विश्वास बसतो . मालक गटुडं परत देतात . त्यात फारसं डबोलं नसतं म्हणा- कुणाचा मिरची – मसाला , तर कुणाचे बोंबील तर कुणाचे खजूर पाव , आम्ही हे परत केलं नसतं तर आम्हीच तो माल गडप केला अशी महारवाड्यात बोंब झाली असती , आणि त्यामुळंच दादा विवंचनेत होते . आपल्या पोराच्या चतुराईमुळं हा माल सापडला , याचं दादांना किती कौतुक वाटलं होतं म्हणून सांगू ? ते जाता – येता गाववाल्यांना ही हुशारी सांगत असत . आपली छाती उंचावली नसती तरच नवल !
तालुक्याचं नाव अकोला . तिथून तीन – चार मैलांवर माझं धामणगाव . गावाच्या नावात तशी काही अपूर्वाई नाही , अगर एखाद्या ऐतिहासिक स्थळाची आठवणही नाही . रस्ता खूपच धुळीचा . बैलगाड्यांमुळे चाकोऱ्या खूप खोलवर गेलेल्या . पावसाळ्यात तर रस्त्यातून खूपच चिकचिक . कचेरी सोडली म्हणजे गावाला जाण्याचा रस्ता सुरू होतो . आजही गावापेक्षा महारवाड्या संबंधीच मी जादा सांगू शकतो . गावात आणि माझ्यात आजही अदृश्य भिंत उभी आहे . ते पल्याड – मी आल्याड . गाव आणि हेच गावकूस . एका उंचवट्यावर महारवाडा . गावाच्या खालच्या बाजूला . असं म्हणतात , की वारा आणि नदीचं पाणी हे वरच्या जातींना शुद्ध मिळावं , म्हणूनच अशी गावची रचना पूर्वीपासून केलेली . सर्वांच्या घरांची तोंडं गावच्या विरुद्ध दिशेला . लहानपणी पाहिलेला महारवाडा चांगलाच गजबजलेला होता . महारवाड्यात टोलेजंग चावडी होती . कौलारू , उंच उंच लाकडी तुळ्यांची , चावडीला दार नव्हतं . एखाद्या सार्वजनिक हॉलसारखा मोकळा भाग . रात्रीच्या वेळी सारी पुरुषमंडळी चावडीत झोपायला यायची . विशेषत : तरुण मंडळी . झोपण्याच्या जागेवरून भांडणं होत . राहत्या घरापासून चावडी , त्यापुढचं पटांगण , तिथले खेळ- सारं सारं नजरेच्या टप्प्यात यायचं . आमचं राहतं घर तसं खूपच सामान्य . घराच्या दोन्ही बाजूंना चांगली भक्कम पाटाची घरं . त्यामुळे तर आमचं घर खूपच बेंगरूळ दिसायचं . वार्धक्यानं एखादं म्हातारं खोड वाकावं तसं . मातीच्या लगद्याच्या भिंती , वर कौल , कौलाखालील वमान तर खूपच काळपट पडलेलं . मधल्या आढ्यामुळे आपोआप घराने दोन भाग झालेले . आम्ही येतो तेव्हा अर्थात घरापुढं चुवकाठ्यांचं , सावराचं जंगल वाढलेलं , थोडक्याच दिवसांत आईचा हात भिंतीवर , भोवताली फिरतो . घराला घरपण येत . इथं कधीकाळी माणसं राहत होती , ह्याची निशाणी वुजली होती . घासलेटचा का होईना दिवा घरात ढणढणू लागतो .
आई सांगायची , ” लेका , ह्याच जागेत तुहा जलम झाला . ” आईनं जन्माच्या वेळी झालेलं कोडकौतुक अनेकदा सांगितलेलं . आईच्या गोष्टी आठवतात . सवर्णाचे सर्व विधी जसा ब्राह्मण पुरोहित करतो , तसा त्या काळात महारांचे विधी भाट करायचा . हा भाट तालुक्याच्या गावी राहायचा . मुलाचं नामकरण करणं , लग्न लावणं इत्यादी चामं भाट करीत असत . हे भाट तसे जातीने महारच . पण ह्यांना मात्र महार मंडळी हलकी समजत असत . दारात तो आला , म्हणजे ‘ रावसाहेब , पुण्य महाराज ! ” अशी हाळी द्यायचा . आमच्या घरी येणारा सीताराम भाट स्वभावानं खूपच गोड होता . वोलण्यात एक वेगळी रसवंती होती . कुणालाही हवंहवंसं वाटावं असं याचं व्यक्तिमत्त्व . दादा तसे दिलदार , म्हणून गावाकडे खूपच प्रसिद्ध . माझ्या जन्माच्या वेळी एक छोटीशी कालवड , पाच भांडी दादांनी भाटाला दान दिली . पुढं मोठा झाल्यावर ज्या ज्या वेळी तालुक्यात सीताराम भाट भेटत असे , त्या त्या वेळी दादांबद्दल भाट गौरवानं बोलत असे . “ तू त्यांच्या दिलदारपणापुढं काहीच नाहीस ‘ असंही सुनावत असे . दादा केवळ धर्माच्या भीतीनं हा सारा दान करीत होते असं मात्र वाटत नाही . मला जसं आठवतं आहे , तसं त्यांचं व्यक्तिमत्त्व हे विद्रोही म्हणूनच चांगलं लक्षात राहिलेलं . ते केव्हाच देवपूजा अगर उपास – तापास करीत नसत . गावी असताना आई…
क्रमशः
