बलुतं..दया पवार(भाग २१)

बलुतं..

लागल्यावर मध्यरात्री वाजंत्र्याला लापशी किंवा भात मिळायचा होता . तोपर्यंत भुकेनं मी रडकुंडीला आलेलो . ह्या दरम्यान एक बाई सुदाम्याकडे गंडादोरा मागायला आलेली . पोर झालं नाही तर तिचा नवरा सवत आणणार होता . सुदामबुवानं शक्कल लढविली . ” समोरच्या आंब्याच्या झाडाखाली बारा अंड्यांची चाणकी , तुपातले बारा परोठे नेऊन ठेव . मावशीचा हा उतारा आहे . तुला मावशी नक्की पावेल ! ” असं म्हणून तिच्या डोक्यावरून मावशी उतरतो . बाई जाते आणि काही वेळानं उतारा घेऊन येते . आम्ही त्यापूर्वीच जवळपास लपून बसलेलो . बाई उतारा ठेवून निघून जाते , तोच आम्ही त्या उताऱ्यावर तुटून पडतो .

एकदा मात्र मावशीच्या प्रतापाची काही मात्रा चालली नाही . गावातील विठोबाच्या देवळापुढं श्रावणातील पारायणं चालू असताना सुदामबुवा मंडपातून वहाणा घालून गेला . झालं . गावकऱ्यांचं माथं तापलं . त्याला गावकऱ्यांनी लाथा – बुक्क्याखाली कुचललं . गावात पीठ बंद झालं , पण सुदामबुवा तसा डगमगणारा नव्हता . आजुबाजूच्या गावांत तो पीठ मागत फिरू लागला .

chandan ghodke848510538770414127..jpg

उघड नाही , पण चोरून , लपून आम्ही सुदामबुवाकडून पीठ घ्यायचो . वडिलांची आठवण म्हणा किंवा आम्ही पोरके म्हणून म्हणा , सुदामबुवा आम्हाला खुशीने फुकट पीठ द्यायचा . तो घरी आला म्हणजे खूपच गमतीजमती करायचा . त्या वेळी गावात एक तमाशा आला होता . त्यात ‘ पाथर्डीचा राजा ‘ हा वग होता . पाथर्डी ह्या गावाला नपुंसक किंवा हिजड्यांची संज्ञा कशी मिळाली कुणास ठाऊक ; पण वगातील राजा हिजड्यासारखा हावभाव करायचा . ” हालव ! ” तो म्हणायचा , आणि सारा राजदरबार मागून म्हणायचा – ” हालवते ना , बाय ! ” सारी प्रजाही राजाप्रमाणेच हावभाव करायची . ही नक्कल तो करायचा . आम्ही मुलं त्याच्या सन्निध्यात सारखी हसत राहायचो . सुदामबुवाच्या पिठावरच आम्ही आखाड – श्रावणात दिवस काढायचो . बलुतं , येसकर – पाळी बंद झाल्यामुळं त्याचा खरा फटका बसला तो आमच्या घराला . उपजीविकेचं दुसरं काहीही साधन नाही . आई आता कष्टाकरिता सारखी उभी . डोंगरावर मोळीसाठी गेली म्हणजे तिथंही फॉरेस्ट – शिपाई चिरीमिरी मागायचा . सुगीच्या दिवसांत आई सरवा वेचायची . ढेकळातून गाडीरस्त्यानं शिवारातून नेताना पडलेली कणसं वेचायची . त्यावर कशी तरी थंड चूल फेटायची .

निसर्गाचं मला कधीच आकर्षण वाटलं नाही , हे मात्र खरं . डामडौल असलेला एखादा श्रीमंत माणूस असावा आणि त्याबद्दल तिटकारा वाटावा , तसं वाटायचं . प्रश्नच एवढे छळणारे होते , की प्रसन्नपणे निसर्गाकडे पाहायला इथं वेळ कुणाला ? मला वाटतं , हे सारं माणसाला भरल्या पोटी सुचत असावं . मला भोवतालचा निसर्ग काट्यासारखा बोचायचा …

तसं अनेकदा मी आईबरोबर ढग्या डोंगरावर जायचो . त्याची नकटी पायरी चढणं म्हणजे दिव्यच . ढग्या डोंगरावरून दूरवरचा आसमंत नजरेच्या टप्प्यात यायचा . लांबवर कळसूबाई दिसायची , तर मुळेची धार चांदीच्या रसासारखी लकाकायची . पण ह्या सृष्टि – सौंदर्याकडे पाहण्यापेक्षा झाडाची करवंदं तोडून खाण्यातच आम्हाला रस होता .

रात्रीच्या वेळी घरातूनही डोंगराला वणवा लागलेला दिसायचा . अंधारात सरकणारी जळती रेघ . ह्यातील सौंदर्यापेक्षा दुसरेच प्रश्न मला सतावायचे … आता सकाळीच फॉरेस्ट – शिपाई येऊन ठाकरांना धारेवर धरतील ; “ वणवा तुम्हीच लावला ” म्हणून गुन्हा नोंदवतील … उभी झाडं तोडण्यापेक्षा जळालेली लाकडं घेणं हा तसा गुन्हा नव्हता . ठाकर मंडळीच झाडांना वणवा लावतात , जळती लाकडं मिळावीत म्हणून ते ही युक्ती करतात , असाच शिपाऱ्यांचा समज होता . पण ठाकर हे फारच भावडे . त्यांना फक्त चार आण्यांचं नाणं ओळखता यायचं . मोळीचा कुणी रुपया दिला , तरी घ्यायचे नाहीत . ” व्हते चारी आणे ” अशीच साद घालायचे . असे भाबडे ठाकर वणवा पेटवीत असतील ह्यावर विश्वास बसायचा नाही .

ठाकरवाडीत मी केव्हा केव्हा जात असे . घराजवळ आमची थोडीशी शेती होती . आईनं ती जिवापलीकडे जपलेली . रंडकीच्या जमिनी घशात घालणं हा भाऊबंदांचा खेळ . पण आईनं डोळ्यांत तेल घालून तुकड्याचा सांभाळ केलेला . आई गावच्या मराठ्यालासुद्धा जमीन वाट्याने लावत नसे . एक तर मराठा शेतकरी फारच लोभी . ” इथं तुहा बाप मेला , इथं तुही आय मेली ” म्हणून सारं उत्पन्न हडप करायचा . एक – दोन पायल्या दिल्या तरी मेहेरबानी . पेरणीच्या वेळी वापरलेलं बी – बियाणंही तो सुगीत कापून घेत असे , त्यामुळं आई नेहमीच ठाकराकडे जमीन वाट्यानं लावी . आमचा सरकती ठाकर कमालीचा प्रामाणिक माणूस . सुगीत धान्य झालं म्हणजे घरी म्हारवाड्यात ओझं डोक्यावरून घेऊन यायचा . कडधान्याचा वानवळा आणायला विसरायचा नाही . काही कामानिमित्तानं खळ्यावर मी जायचो . घरापाशीच ठाकरवाडीत त्याचं खळं असायचं . ठाकरवाडी लक्षात राहिली ती तिथल्या कमालीच्या स्वच्छतेमुळं . त्यांची घरं तशी छोटीच ; पण खूपच सुबक , वर गवताच्या पेंढ्या टाकलेल्या . भिंती लाल मातीनं सारवलेल्या . त्यावर चुन्यानं रंगीबेरंगी नक्षी काढलेली . अंगणही स्वच्छ सारवलेलं . पाण्याचा तांब्याही घासुनपुसून लखलखीत . महारवाड्यात अशी स्वच्छता कधी दिसायची नाही .

स्वच्छता टापटीप सोडली , तर त्यांच्यात अज्ञान भयानक . शाळेत मुलं शिकायला पाठवत नसत . शेरडं – मेंढरं वळायला जात . गावात देवीचा डॉक्टर आला , म्हणजे एखाद्या घरात मूल जन्मलं असेल , तर भीतीनं ते त्याला रानात पळवून नेत . तशी खूपच सोशिक जमात . स्वत : होऊन कुणाची कागाळी काढत नसत .

एका गोष्टीची मात्र मला ठाकरांची चीड यायची . तसे ठाकर हे आदिवासीच ; स्वत : ला महादेवाचे वंशज समजत . आम्हा मंडळींचा त्यांना बाट लागे . पाणीही वरून पाजायचे . चटणी – भाकरी द्यायची असेल तर तीही वरूनच . ठाकरांच्या व्यवहारात जातीयता आली कशी , हाही प्रश्नच आहे . त्यांनी गावातील मराठ्यांचं तर अनुकरण केलं नसावं ना !

गावात जातीयतेच्या इंगळ्या डसलेल्या . ठाकरांनीही विटाळ पाळावा , हा कळसच , शहरात हा जाच नव्हता , असं दिसतं . हेही काही तितकसं खरं नाही . शाळेतील मित्र बदलले होते , याचा अर्थ तालुक्याच्या गावी बदल होत होता , असंही काही नाही . हॉटेलबाहेर प्रथम अस्पृश्यांकरता वेगळा कप पाहिला तो तालुक्याच्याच गावी . हा कप कोणत्या साली गेला , हे काही सांगता येत नाही ; पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तो काही वर्ष होता , एवढं मात्र नक्की आठवतंय , कायदा झाला होता ; पण कुणाला धाडसच होत नव्हतं . तालुक्याच्याच गावच्या एका मांगानं धाडस केलं . त्याचा कित्ता बाकीच्या अस्पृश्यांनी गिरवला . मालकांनी किंवा गावातील मंडळींनी विशेष खळखळ केली नाही . हे जसं कपाचं , तसं न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घेणं हे आम्हा पोरांना खूपच दिव्य वाटायचं . एकदा मात्र दुकानात केस कापावयास जाण्याचं धाडस केलं . दुकानदारानं कसं ओळखलं कुणास ठाऊक ? त्याला आपल्या चेहऱ्यावरील जात तर वाचता येत नसावी ना , या शंकेनं हैराण झालो . कान पाडलेल्या गधडीनं मागं परतावं तसा परतलो . आम्ही , शाळेत जाणारी मुलं सुदामबुवाकडून केस कापून घेत असू . पण तालुक्याच्या गावी शाळेत गेलो म्हणजे हे केस फारच बंगरूळ दिसत . तालुक्याच्या गावी महारवाड्यात जाऊन पुढं आम्ही रामजी ह्या माणसाकडे जाऊन केस कापून घ्यायचो . दुधाची तहान ताकावर भागविण्याचा तो प्रकार . दुकानात केस कापतात एवढं ते स्किल्ड वर्क नसायचं . पुढं पुढं दुकानातही आमचे केस कापू लागले . पण आत जाताना मात्र बराच काळ काळीज धडधडत असायचं . शहरात केस जरी सर्रास कापले जायचे , तरी गावी मात्र गावचा न्हावी बराच काळ महार – चांभारांचे केस कापायचा नाही . वाटायचं , खुशाल म्हशी भादरतो , पण म्हशीपेक्षाही आमची किंमत जादा नसावी ना ? आपलं गावचं गिन्हाईक तुटेल ह्या भीतीनंच आमच्या वस्तीतील कुणाला तो स्पर्श करीत नसावा .

ह्याच दरम्यान माझ्या जीवनात एक महत्त्वाचा बदल झाला . पाचवीची परीक्षा चांगल्या मार्कानी पास झालो होतो . पुढं शिकावं ही दुर्दम्य इच्छा होतीच . शाळेत सोनवणे नावाचे एक जातीचेच मास्तर होते . त्यांचं माझ्या प्रगतीकडे चांगलं लक्ष होतं . त्यांनी एकदा माझ्याकडून तालुक्यात असलेल्या वसतिगृहात प्रवेश मिळावा ‘ असा अर्ज लिहून घेतला होता . खरं म्हणजे , तो अर्ज तसा मी विसरूनच गेलो होतो . मी परीक्षा पास होतो आणि वसतिगृहात प्रवेश दिल्याचं पत्र अहमदनगर येथील लोकल बोर्डाच्या ऑफिसातून येऊन थडकतं . मला खूपच आनंद होतो . एक तर त्यामुळे , आईच ओझं थोडंफार हलकं होणार असतं . साचलेल्या पाण्याचा ओघ अचानक कुणी तरी वळवावा , तसं वाटतं .

तालुक्यात ज्या मैदानात आठवड्याचा बाजार भरायचा , तिथे हे मुलांचं वसतिगृह होतं . लांबच लांब , पांढऱ्या रंगाची इमारत . वर चिंचोळी कौलं . भोवताली तारेचं कंपाउंड . इमारतीपासून जवळच मुलांच्या जेवणाचा हॉल . मुलांना आंघोळ करण्यासाठी प्रशस्त विहीर . गावातल्या शाळेत जायचं आणि वसतिगृहात मुक्काम करायचा . तिथे मोफत जेवणाची सोय . यापेक्षा मला वेगळं काय हवं होतं ? स्वर्गाची कल्पनाही बहुधा अशीच असावी .

पण हा आनंद फार काळ टिकला नाही . वसतिगृहात माझ्या पुढ्यात काय ताट वाढून ठेवलंय याची किंचितही कल्पना आली नाही . वसतिगृह तसं कोळ्यांच्या मुलाचं म्हणून प्रसिद्ध . डांग भागातील सारीच महादेव कोळी मुलं . ह्या मुलांव्यतिरिक्त मीच पहिला महार विद्यार्थी वसतिगृहात आलेला . जातीचा अहंकार -मग तो कितीही खालच्या तळातील असो- हा केवढा मोठा असू शकतो , आणि त्यामुळं आयुष्यभर डसणाचा इंगळ्या तिथं कशा भेटल्या , हे आठवलं म्हणजे आजही अंगाचा थरकाप होतो .

पहिल्याच दिवशी टोळ्याटोळ्यांनी मुलं जमून माझ्याकडे पाहत कुजबूज करू लागली . माझी ज्या खोलीत वर्णी लागली होती , तिथं वरच्या वर्गातील , थोराड शरीराचा एक लंगडा मुलगा होता . त्याला दाढी – मिश्या आलेल्या . त्यानं मला दमात घेतलं , ” तू आमच्या पंगतीत बसू शकत नाहीस . हॉलच्या दरवाज्याजवळ बसावं लागेल ! ” बाकीच्या मुलांनीही त्याचीच री ओढली . तो बहुधा सर्वांचा नेता असावा . मला तर तो तैमूरलंगच भासला . आजवर तसे मी खूपच बरेवाईट अनुभव पचवलेले ; पण त्या दिवसाचा डंख आजही विसरू शकत नाही . पुस्तकाची संगत जडल्यामुळं माझं मूळचं संवेदनाक्षम मन हे जादाच संवेदनाशील झालेलं . तक्रार करण्याचा प्रश्नच नव्हता . बोर्डिंग सुपरिटेंडंटही त्यांचाच जातवाला . तांब्या – भांडं घासून , लखलखीत करून जेवणाच्या हॉलकडे गेलो , तेव्हा त्यांनीही समज दिली , “ हे बघ , तू महाराचा आहेस . पुढं हॉलमध्ये सरकलास तर तुझा चेंदामेंदा होईल . ” मी गुपचूप हॉलच्या दरवाज्यापाशी बसतो . थोडं अंतर ठेवण्यास मी विसरलो नव्हतो . मी पंगतीतल्या मुलांकडे बघतो . सारी माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघतात . “ वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ” ही मुलांच्या तोंडातील प्रार्थना मला आणखीनच डागण्या देते .

खरं म्हणजे हा अपमान मी निमूटपणं सहन करायला नको होता . मी एकदा जरी धाडस दाखवलं असतं , तर साऱ्यांचा विरोध कोलमडला असता .

विद्रोही कविता लिहिणं तसं पाहता सोपं . स्वत : वर बेतलं म्हणजे कळतं . मी स्वाभिमानशून्य जगलो , याचा आज मला विषाद वाटतो हे मात्र खरं . पण तेव्हा वाटायचं , खरंच आपल्याला ताठ कणा नाही काय ? सालं , आपण एवढे भित्रे कसे ? ही भीती…

क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)

Leave a Reply