बलुतं..
काटकोनात . मुलं त्यांना चळचळा कापत . ते माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहतच राहिले , रागावले नाहीत ; माझी समजूत काढली . ” अरे , मस्तानीचं काम कोण करणार ? ” याचा मला अंदाज होताच . तसं संगमनेर गाव हे सोवळंच . मुलांबरोबर मुलींनी नाटकात काम करावीत , ही कल्पना अजून तिथं पोचलेली नव्हती . मी आधीच एका ब्राह्मणाच्या चुणचुणीत मुलाला मस्तानीचं काम करण्याकरिता राजी केलेलं . मी त्याचं नाव घेतो . प्रिन्सिपॉलना शाळा चालवायची असते . ते मला नकार देतात . त्या दिवशी हिरमुसला होऊनच मी बाहेर पडतो .
नाटकाची मोडशी जिरली ती एका क्षुल्लक घटनेवरून . मला आठवतंय , माझं शाळेतलं शेवटचं वर्ष . मनातून नाटकाची झिंग काही जात नाही . शाळेत ह्या वर्षी ‘ राजा अशोक ‘ हे नाटक बसविण्यास घेतलेलं . दरवर्षाप्रमाणे आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल , असं वाटत होतं . पण निवडीच्या वेळी अशोकचा रोल मला मिळाला नाही . ” अशोक राजा गोरा हवा आणि तू तर काळा ” असं म्हणून शिक्षकांनी ती भूमिका देण्याचं नाकारलं . अशोकच्या प्रधानाची भूमिका देऊ लागले . मी कमालीचा संतापलो . रागानं धुमसतच प्रिन्सिपॉलना भेटलो . त्यांनी त्या दिवशी माझ्यापुढे वेगळेच प्रश्न उभे केले . ” हे तुझं शेवटचं वर्ष . तुझ्यासारख्या गरीब मुलानं नाटकाचे हे छंद करणं बरोबर नाही . हे श्रीमंत मुलांचे उद्योग ! ” त्या दिवशी , का कुणास ठाऊक , पण मला माझ्या वास्तवतेची प्रखरपणे जाणीव झाली . पुढल्या आयुष्याचा सारा भयाण काळ एखाद्या वाळवंटासारखा दिसू लागला . मी मनात काय ते उमगलो . आधीची उभारी राहिली नाही . एकीकडे आपल्याला डावललं गेलं , हा अपमान ठसठसत होता ; तर दुसरीकडं अभ्यासाचा डोंगर दिसत होता . त्यावेळी एक मात्र झालं , मी ‘ राजा अशोक ‘ हा कार्यक्रम पाहावयास गेलो नाही .
शाळेतील सर्वच कार्यक्रमांत भाग घेण्यास धडपडत असे . विशेषण : भाषणं , निबंध , स्पर्धा , खेळ इत्यादी . गावात सार्वजनिक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होत . मी नाव दिलं की बोर्डिंगची मुलं चिडवीत , ” हा पाहा आला दुसरा आंबेडकर . सभेत भाषण करतोय ! ” मी दुभंगून जायचो .
अलिकडे कॉलेजमधील मुलांचा रॅगिंगचा प्रकार ऐकला असेलच . असंच एकदा माझं रंगिंग झालं . होळीचा दुसरा दिवस . बोर्डिंगमधील मुलांचा रंगाचा खेळ रंगत आलेला . रंग मिळालाच नाही तर चिखल वापरीत . ह्याच दिवशी माझी शाळेत संस्कृतची परीक्षा . अभ्यासाव्यतिरिक्त वेगळ्या विषयावर खास अशा परीक्षा तेव्हा शाळेत होत . ड्रॉइंग , हिंदी , संस्कृत असे काही विषय . मी कपडे घालून परीक्षेला जाण्याच्या तयारीत . बाहेर मुलं टपलेली . माझ्या अंगाला घाम फुटतो . शेवटी खोलीचं दार उघडून सुसाट पळालो . मुलांचा रंग वाचवला , याचंच समाधान .
ह्या रंगिंगमध्ये पुढं जादाच भर पडली . त्याचं कारण मीच ओढवून घेतलं . सुट्टीत गावी गेलो म्हणजे आईचे – बहिणीचे खाण्यापिण्याचे हाल बघवत नसायचे . सारखं काळीज तुटायचं . त्याच दरम्यान बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करणाऱ्या म्हातारीनं थकल्यामुळं नोकरी सोडलेली . मी संचालकांना आईच्या नोकरीसंबंधानं विनंती करतो . माझी विनंती मान्य होते . मी सुट्टीवरून परत येतो , तो आईला आणि बहिणीला घेऊनच .
आईला खाऊन – पिऊन तीस रुपये महिना पगार असतो . त्यात बहिणीचंही जेवण धरलेलं असतं . पन्नास – साठ मुलांचा स्वंयपाक करायचा असतो . पण आई म्हणायची , ” गावच्या गावगाड्यापेक्षा हे बरं . एका जागी बसून भाकरी थापायच्या . ” पण आमचा हा आनंद काही फार काळ टिकला नाही . आईच्या गळ्यातील गंडमाळेचं ठसठसणं माझ्याही मनात सुरू झालेलं . एकेक गाठ फुटावी आणि जखम चिघळत जावी , तशी अवस्था .
बोर्डिंगमधील मुलं माझा अधिकच द्वेष करू लागली . त्यात काही मुलं चांगली होती . त्यांची सहानुभूती मिळायची . पण दादा मुलं तशी आक्रमक होती . तीही वरच्या वर्गातली . कुणी माझ्याशी चांगलं बोलेना , याची आता खाण्याची चंगळ ; आई याला बहुधा चोरून खायला देत असेल , असा प्रवाद कानांवर येऊ लागला . त्यामुळं स्वयंपाकखोलीत जाऊन आईशी दोन शब्द बोलावे म्हटलं , तरी अंगावर काटा यायचा . आईच्यात आणि माझ्यात ही अदृश्य भिंत उभी राहिली . जेवावयास बसलो , म्हणजे साऱ्यांच्या नजरा माझ्याकडे – भात्यातील बाणासारख्या .
आईला तसं कष्टाचं काम पडे . हेच काम करायला लोकल बोर्डाच्या कोळी बोर्डिंगात दोन बाया होत्या . त्यात मुलंही कमी , शिवाय पगार जादा . त्यांचा फंड , सर्व्हिस कापली जायची . आईचं शोषण दिसत होतं ; पण हे सांगायचं कुणाला ? सांगितलं तर म्हणतील , “ करायची असेल तर करा ; नाही तर नोकरी सोडा . ” घाण्याच्या बैलासारखी आई राबत होती . आपली पिलं आपल्या डोळ्यांसमोर आहेत , एवढंच समाधान तिला असावं . पहाटे पाचला तिला उठावं लागे . तिला सकाळच्या न्याहारीला उसळ शिजवावी लागे . मुलं न्याहारी करत नाहीत , तो तीन – चार पायलींच्या बाजरीच्या भाकऱ्या तिला बडवाव्या लागत . बोर्डिंगमध्ये मात्र जेवणाचे विविध प्रकार नव्हते . भाकरी आणि पातेलभर कोरड्यास . पोरं म्हणायची , ” बाई , हे काय कोरड्यास ? त्यात वरचं आढं दिसतंय . ” आई बिचारी काय करणार ? दिलेल्या मालातच तिला हे सारं रांधावं लागे . तीन – चार वर्ष आई तिथं होती . ना कॅज्युअल लीव्ह , ना भरपगारी रजा . ढणढणत्या चुलाणापुढे बसलेली आई दिसते आहे . सारी स्वयंपाकखोली धुरानं कोंदटलेली . जशी काय गॅस चेंबर . आईनं ह्या मरणयातना केवळ आपल्यासाठी सोसल्या . शाळेला सुट्टी पडली म्हणजे तेवढीच आईची सुटका . एखादा कैदी पॅरोलवर सुटावा तसं .
आज माझ्या चेहऱ्यावर उदासीनतेचं जे शेवाळ दिसतं , ते तेव्हापासून जमा झाले . त्यामुळं एक झालं , मी बोर्डिंगमध्ये विशेष थांबत नसे . जेवणापुरता येत असे . गावातर सवर्ण मित्रांच्या बरोबर राहत असे . त्यांच्या घरी जात असे . खांबेकराच्या घरी अधिकच . त्याच्या घरी मला खूपच मायेनं वागवीत . माझी आई ह्याच गावात बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करते आहे , ही गोष्ट मात्र मी त्यांच्यापासून लपवलेली . पण माझ्या बहुतेक सवर्ण मित्रांना हे माहीत होतं . पण मला वाईट वाटेल म्हणून कुणी जाहीर उल्लेख करीत नसत . एकदा खांबेकरच्या आईनं अचानक मला आईच्या संदर्भातच विचारलं . माझा चेहरा गोरामोरा झाला . एखादा चोर पकडल्यावर दिसावा तसा बहुधा मी त्यांना दिसलो असेन .
दादासाहेबांनाही मी टाळू लागलो . ते ज्या दिवशी वसतिगृहात येत , तेव्हा हमखास मी गावात जायचो . तसं हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा माझा प्रकार होता . एकदा ते असेच वसतिगृहावर येणार असतात . तशी सूचना साऱ्या विद्यार्थ्यांना आधी दिलेली . मी मात्र त्या दिवशी हेतुपुरस्पर गावातच मित्राकडे थांबलेलो . ते परत गेले असतील , ह्या भावनेनं बोर्डिंगात जातो , तो ते निघालेले असताना दरवाज्यातच त्यांची आणि माझी गाठभेट होते . ते खूपच भडकतात . ” फुकटचं खाऊन संस्थेची शिस्त पाळायला नको ” असा उपदेश करतात . मी मात्र मनात हसत असतो . आपण दादासाहेबांच्या मोठेपणाला भीक घालीत नाही , असं मला सुचवायचं असतं . खरं म्हणजे माझा खरा राग हा परिस्थितीतून आलेला असतो आणि ते माझी अवस्था समजू शकत नव्हते , असं मोठं मजेशीर द्वंद्व होतं आमच्यात .
तोंड दाबून बुक्क्यांचा मार जरी मी सहन करीत होतो , तरी एकदा मात्र माझा हा कोंडमारा अचानक बाहेर पडला . जमिनीतून लाव्हा फुटावा , तसा वाटला . माझं मलाच नवल वाटलं . एके दिवशी शाळेतून येत होतो . पोटात कावळे कोकलत होते . बोर्डिंगपाशी येतो , तो एका बंद खोलीतून पोरांच्या गाण्याचा आवाज . सोबत पत्र्याची डबडी बडवली जात आहेत . बोर्डिंगमध्ये हे तसं नवं नव्हतं . मी सहजच कोण गातंय म्हणून फटीतून आत पाहतो . दृश्य पाहून मी कमालीचा हादरतो . नऊ – दहा वर्षांची माझी छोटी बहीण नाचत आहे आणि पोरं आनंदात गात आहेत , हे दृश्य . एका शृंगारिक लावणीवर बहीण नाचत असते- “ काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला ; राजसा , जाऊ या जेजुरीला ! ” ही लावणी असते . हे दृश्य पाहून माझा माथा भडकतो . शिरा ठसठसू लागतात . मी जोरजोरानं दारावर लाथा हाणतो . मला एकाएकी काय झालं म्हणून पोरं दार उघडतात . मी शिव्या देऊ लागतो , “ भोसडीच्यांनो , तुमच्या आया – बहिणीना का नाचवत नाही ? ” कुणीही मला विरोध करीत नाही . सारे उठून जाऊ लागतात . एवढ्या साध्या गोष्टीनं मी भडकावं , याचंच त्यांना नवल वाटत असतं . त्या दिवशी मी खूपच बेचैन असतो . बहिणीला पोटाशी धरून ढसाढसा रडतो .
आता जी घटना मी सांगणार आहे , तिच्या नुसत्या आठवणीनं अजूनही माझा थरकाप होतो . जी घटना घडली त्यात मुलांचा दोष किती , हाही प्रश्नच आहे . भारतीय संस्कार तसे सर्वांच्या हाडीमाशी खिळलेले ; त्यातून दलित मुलांचीही सुटका कशी होणार ? ह्या घटनेमुळे मात्र सारं जीवनच नासवून टाकलेलं . ज्या मुलांमुळं हे सारं रामायण घडलं , त्यांच्याबद्दल मात्र आज माझ्या मनात कणभरही द्वेष नाही . त्यातले काही मोठे ऑफिसर आहेत . त्यातला एक तर झेडपीचा सभापती ! ते आज भेटले तर आईची आठवण हमखास काढतात . तिच्याबद्दल आदरानं बोलतात . त्यांच्यापैकी काहींवर आईनं माझ्यापेक्षाही जादा माया दाखवलेली .
घडलं ते असं . आईला बोर्डिंगमध्ये येऊन महिनाभरही झाला नसेल . आईची मासिक पाळी आलेली . तिच्यावर तसे जुने संस्कार . विटाळात केलेला स्वयंपाक मुलांना कसा घालावा , ह्या विवंचनेत आई . आई आपली शंका सुपरिटेंडंटजवळ सांगते . काय करावं म्हणून तेही बुचकळ्यात पडलेले . बाहेरून चार दिवसांकरता मोलकरीण आणावी तर ही दर महिन्याला पोटदुखी व्हायची . त्यानं काय होतंय , असं म्हणून ते त्या दिवशी आईला स्वयंपाक करण्यास भाग पाडतात . आईचा नाईलाज होतो . अर्थात ही बातमी मुलांपर्यंत कशी जाते , कुणास ठाऊक ?
मी ताट आणि तांब्या घेऊन जेवणाच्या हॉलमध्ये येतो , तो सारी मुलं एका कोरस मध्ये गात असतात , ” पचका झाला , रंऽ . पचका झालाऽऽ ” कुणी जेवावयास तयार नाही . काय झालंय , हे मला कळत नाही . बहुधा कोरड्यास बिघडलं असेल , अशी माझी कल्पना . कारण कोरड्यास कधी खारट झालंय , तर कधी पुचाट – अशी मुलांची सतत तक्रार . माझ्यासमोर आईला बोलण्यात काहींना अघोरी आनंद मिळायचा . त्यातले एक – दोघे तर खूपच पाताळयंत्री . आईच्या नकळत एकदा – दोनदा त्यांनी मूठ मूठ मीठ पातेल्यात टाकलेलं . अशी छळणूक सतत चालू . सर्वांच्या नजरा टाळतच मी दोन घास ढकलत असे . भावना अनावर झाल्या , म्हणजे रात्रीच्या वेळी आईच्या कुशीत जाऊन रडायचो . आईच्याही डोळ्यांतील अश्रू थांबत नसत . त्या वयातही आपले अश्रू किती बरं जवळ होते ! थोड्याशा बोलण्यानंही हुंदका दाटून यायचा . सानेगुरुजींनी अश्रुंच सामर्थ्य वर्णन केलं आहे . पण ते एवढे वाहू लागले , की शेवटी डोळे कोरडे पडण्याची वेळ आली . मी ताटावरून उठतो आणि आईकडे काय प्रकार झालाय याची चौकशी करतो . ती झालेला प्रकार सांगते . धरणी दुभंगावी आणि आम्हा मायलेकरांना तिनं आत घ्यावं , असं वाटलं . समाज ज्यांचा विटाळ मानत होता , त्यांनीच स्त्री – देहाचा विटाळ करावा , ह्याचा संदर्भ कळायचं त्या वेळी वय मात्र नव्हतं .
एकदा आईवर चोरीचा आरोप आलेला . आई खूपच हादरली . तोंडचा घास जाणार , हीच तिला भीती . चोरी तरी काय , तर पिठाची ! तसा ह्या पिठाच्या चोरीशी आईचा काहीच संबंध नव्हता . सुपरिटेडंट हे तसे विधुर . त्यांचं नवं लग्न नुकतंच धाकट्या
क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं पुस्तकातुन)
