बलुतं.दया पवार.(भाग ३३)..

बलुतं..

धंद्यानं त्याची किती परवड केली बरं ! आज माझा सहा वर्षांचा मुलगा खुर्ची वाजवताना पाहिला- तोही तालासुरात – तर मी चक्रावून गेलो आहे . आपल्यापासून तुटलेली संस्कृतीची नाळ हा असा जोडणार काय ?

आम्ही गावी नसल्यामुळे आमच्या राहत्या घराची खूपच आबाळ झाली होती . दारापुढं चुबुकाट्याचं रान वाढलेलं . घराची काही कौलं निखळलेली . समोरच्या पाख्याचे वासे कुणीतरी उपसून नेले होते . आम्हाला न विचारता गावचा वडारी आता घरात गाढवं बांधत होता . आपला जन्म झाला , तिथं गाढवं बांधली जावीत याचं वैषम्य वाटत होतं . खूपच संताप आला होता . घर कुणाच्या ताब्यात द्यावं हे कळत नव्हतं . घराशेजारी जावजीबाबाचं टोलेजंग घर . कडीपाटाचं . त्याच्या दबदव्यामुळं घर शिल्लक राहिलंय , असं त्याचं म्हणणं , मधल्या घराची चौकट मात्र त्यांनीच उपसून नेलेली . कुणी चोरून नेऊ नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतलेली. पुढे त्यांनी जेव्हा स्वत : च्या घराला दार पाडलं , तेव्हा ही चौकट आणि दरवाज्याच्या फळ्या झळकताना दिसल्या . पण ‘ बूंद से गयी , सो हौज से नही आती ‘ ह्या न्यायानं आम्ही गप्पच राहिलो .

जावजीबाबाच्या घरी दूधदुभतं , आमच्या घरी तर खुडूक कोंबडीही नसायची . मी गावी आलो म्हणजे जावजीबाबा बायकोला म्हणायचा , ” लेकराला दूध वाढ . मोठ्या आग्रहानं जेवायला बोलवायचा . दूध मात्र मला केव्हाच आवडलं नाही . मोठ्या मुश्किलीनं घास घ्यायचो .

जावजीबाबाचं घर तसं जुन्या वळणाचं . त्याचा दराराही तसाच . तो घरात आला म्हणजे सारी चिडीचूप . जावजीबाबा तालुक्याचा पुढारी होता . सकाळ झाली म्हणजे पांढरीफटक कापडं घालायचा . त्याचा फेटाही तसाच उजळ , बगलेत छत्री मारली की तो तालुक्याच्या गावी जायचा . भोवतालच्या गावची पुढारी मंडळी अशीच तालुक्याला जमत , कुणी ‘ ममईवाला ‘ आला , की त्याच्याभोवती जमत , चहा उकळणं हा त्यांचा धंदा. दररोज कुणी ना कुणी भेटे . पुढं जेव्हा मी नोकरीला लागलो आणि कधीकाळी गावी आलो , तर हे असेच गिधाडासारखे जमत . म्हणत , “ याचा बाप काय माणूस होता ! फार माणुसकी . त्याच्या मानानं पोरगा काहीच नाही ! ” हा सारा संवाद माझ्याच पुढ्यात चाले . चहा पाजला म्हणजे ही मंडळी कटायची .

” जावजीबाबाची आई हयात होती . दोन्ही डोळ्यांची ठार आंधळी . नाव चंद्राव . केसांच्या अंबाड्या झालेल्या. भुवयांचे केसही पिकलेले . हाताच्या कातडीला झिरमिळ्या पडलेल्या . चंद्रावचा मला मात्र खूपच लळा लागलेला . म्हातारीला घरातील सारे सतावीत . तिचे हाल मला पाहवत नसत . तिला कुणी वेळेवर जेवण द्यायचं नाही . घरातील कुणी पोरसोरही तिला परसाकडे घेऊन जात नसे . तिला पाहिलं की माझं आतडं तुटायचं . मी तिच्याशी तासन् तास गप्पा मारयचो . तिला काठीला धरून परसाकडे घेऊन जायचो . तिच्याकडे गोष्टींचा खूपच स्टॉक होता . एखादी गोष्ट सुरू केली तर ती आठवडाभर चालायची . ती गोष्ट सांगत असताना मी तिच्या खाचा पडलेल्या डोळ्यांत खोलवर पाह्यचो . नुसता अंधार दिसायचा . तिच्या बोलण्याचीही गंमत वाटायची . तिचा आणि माझा मजेशीर खेळ चालायचा . तिला सिनेमा हा शब्द उच्चारता यायचा नाही , सिनेमाचा उच्चार ती ‘ सिडीमा ‘ अशी करायची . अनेकदा प्रयत्न करूनही ह्या शब्दाचा उच्चार तिला करता यायचा नाही . तिला मातीआड लोटलं तेव्हा मी गावी नव्हतो . मरण्याच्या वेळी तिनं माझा खूपच धावा केला, म्हणतात . तिच्या मरणाच्या वार्तेनं मी गलबलून गेलो होतो .

जावजीबाबा आणि त्याचा एकुलता एक मुलगा बबन ह्यांच्यात कमालीचा तीव्र संघर्ष होता . बापाबद्दल बबन खूपच कडवटपणं बोले . बाप सांगे , “ जुनी कामं सोड ” , तर बबन नेमका चोरून – लपून कातडी फाडी . बापाला वाजंत्र्याचा गुलामीचा धंदा आवडत नव्हता , तर बबन सनई खूपच छान वाजवी . त्याचा तापा तालुक्यात मशहूर . नेहमी बापाच्या विरोधी वागणं हा मुलाचा खाक्या . जावजी तसा अंगापिंडानं खूपच मजबूत . त्यांची अंगकाठी पोलादासारखी , बबन बापापुढं खूपच किरकोळ दिसे . मोठ्या झाडाखाली लहान झाड खुरटत जावं , तसं बबनचं व्यक्तिमत्व खुरटत गेलेलं . बाप खूपच चारित्र्यवान , पण बबनला काहीच वर्त्य नसे . तो जुगार खेळे ; बाई – बाटलीची त्याला संगत . त्याचं लग्न लहानपणीच बापानं केलेलं . पण बायको वयात आली , तरी बबनला बायकोला भेटता येत नसे . म्हातारा अंगणात काठी घेऊनच बसे . मुलाची बॉडी खराब होते , असं यावर त्याचं म्हणणं . पुढं बबनला तीन – चार मुली झालेल्या . त्या कमालीच्या देखण्या. ह्या मुलींची लग्न जावजीबुवानंच लावून दिलेली . आपल्या एकाही मुलीचं बापानं चांगलं केलं नाही, ही बबनची आयुष्यभराची तक्रार .

पुढं बबन आपला सारा बाडदाना घेऊन मुंबईला आला . फूटपाथला झोपडं बांधून राहिला . जुने कागद विकायचा धंदा करायचा . म्हातारी होती तोपर्यंत जावजीवावांची गावी ठेप चांगली होती . पण म्हातारी मेल्यावर म्हातारपणात जावजीबाबांचे हाल होऊ लागले . बबन बापाला एका पैशाचीही मदत करीत नसे. एखादी मुलगी आपल्या जवळ ठेवावी , तेवढीच भाकरी थापून देईल , हि साधी गोष्टही बबननं कधी मान्य केली नाही . म्हातारा मात्र खूपच जिद्दीचा होता . मरेपर्यंत त्यानं स्वाभिमान सोडला नाही . केवळ खाण्याकरता म्हाताऱ्यानं घरातलं सारं काही किडूक – मिडूक विकलेलं . पुढे भागेना , तेव्हा जमिनीचा एकेक तुकडा विकून त्यानं गुजराण केली . मेला तेव्हा घरात कुणीच नव्हतं . सकाळी मोलानं पाणी देणारी शेजारची बाई आली, तेव्हा म्हातारा मरून पडलेला तिनं पाहिला . म्हाताऱ्याच्या अंत्ययात्रेचं वर्णन ऐकून तर माझं काळीज फाटलं होतं . आता महारवाड्यात तसं कुणीही नव्हतं . सारी मुंबईला पोट भरायला गेलेली. म्हातारा मेला तेव्हा महारवाड्यात एक – दोन विधवा म्हाताऱ्या . बाकी सर्व घरं बंद . त्यांनी काय करावं ? जवळ जवळ म्हाताऱ्याला खासेपर्यंत फरफटत नेलं . गावची मराठा मंडळी गंमत पाहत होती. महाराच्या प्रेताला ती हात कसा लावणार ? नवं कोरं कफन कुठलं ? जुन्या बारदानातच म्हाताऱ्याला गुंडाळलं.

मुंबईत कधी कधी बबनतात्या भेटतो . ऑफिसवरही येतो . आला म्हणजे चक्क झिंगलेला असतो . झोकांड्या जात असतात . कपडे मळलेले . कधी पायताण आहे , तर कधी नाही . तो ऑफिसात आला म्हणजे सारी कारकून मंडळी माझ्याकडे टवकारून पाहतात . “ पुन्हा अशा अवस्थेत ऑफिसात येऊ नको ” असं मला त्याला सांगवत नाही . तो आला म्हणजे नेहमी म्हाताऱ्याला शिव्या देत असतो . आपल्या बापानं साऱ्या इस्टेटीची वाट लावली , असं काहीबाही बरळत असतो … “ आता एकुलतं एक माडीचं घर आहे . ते विकलं , म्हणजे मी मोकळा झालो ! ” शेवटच्या मुलीच्या लग्नाकरता खरंच त्यानं ते विकलं . गावची मंडळी ह्या घरावर तशी टपलेली . सागवानी लाकडाच्या अजस्त्र अशा तुळ्या घराला होत्या . बहुधा गावच्या मंडळींनी हा सारा मलमा मातीमोलानं विकत घेतला असेल .

मुलीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तो अलिकडे आला होता . बबनचं सर्वच मुलींवर मनस्वी प्रेम . त्याच्या मनात एक खंत मात्र होती , की आपल्या एकाही मुलीचं धड बरं झालं नाही. त्याची थोरली वेणू हिच्या शोकांतिकेच्या वेळी तर मी साक्षीदार होतो . वेणूचं लग्न गावी फारच धूमधडाक्यानं झालेलं असतं . वेणू खूपच देखणी असते . नक्षत्रासारखी . रंग आई बापांसारखाच उजळ असतो . तिला जे घराणं मिळतं ते खूपच तालेवार. मुलाचे वडील मुंबईत कुठल्या तरी कंपनीत फोरमन असतात . नवरा मुलगा दिसायला धिप्पाड . घरी शेतीवाडी पाहत असतो . वेणूला नवऱ्यापासून कमालीचा जाच सुरू होतो . नवरा रात्र रात्र तिला झोप येऊ देत नाही. तिच्यावर इसळतही असतो . बाहेर शेतावर गेला म्हणजे तिला कडी – कुलपात बंद करीत असे . शाळेत असताना एकदा – दोनदा मीही तिचा जाच वाचावा म्हणून प्रयत्न केलेले . नवरा क्षुल्लक कारणावरूनहीं चिडत असे . गुराढोरासारखं बडवत असे . शेवटी मुलीला बबननं एका सणाच्या निमित्तानं माहेराला आणलं , आणि मुलगी पाठवायची नाही असा निर्णय घेतला . जावई वेडापिसा झाला . हातात नंगा चाकू घेऊन मुलीच्या बापाच्या घरापुढं येऊन उभा राहिला . बबन तसा फाटका माणूस ; पण डगमगला नाही . पुढं तर त्यानं रामोश्यांची टोळीही आणली . मुलगी कचेरीत फौजदारापुढं उभी राहिली . “ साहेब , मला समोरच्या आडात ढकलून द्या . पण जीव गेला तरी मी नांदायला जाणार नाही ! ” तिची सुटका होते . पुढे ती खूपच वयस्कर माणसाशी लग्न करते . एवढं वैभव सोडून वेणू का बरं यावी ? म्हातारा नवरा का करावा ? हालअपेष्टांत जगण्याचा बिकट मार्ग तिनं का बरं निवडावा ? हे मला कळू शकलं नाही . आज म्हाताऱ्या नवऱ्याची नोकरी सुटली आहे . बंगल्यात आयाचं काम करून वेणू नवऱ्याला आणि आपल्या ” कच्च्यावच्च्यांना पोसत असते. वेणूच्या आयुष्याची परवड बबनतात्या आयुष्यभर विसरला नव्हता .

बबनतात्यानं लग्नाला येण्यास आग्रहानं सांगितलेलं असतं . ” तू एकटा येऊ नकोस . बायको – पोरांनाही सोबत घेऊन ये . ” हे सांगण्यास तो विसरला नव्हता . लग्न मुलुंड येथील गौतमनगर इथं होतं . नावाला ते गौतमनगर होतं ; पण तिथं प्रचंड मोठी झोपडपट्टी वसलेली . कामाठीपुरा – नागपाडा येथून उठलेली मंडळी आता ह्या झोपडपट्टीत दाटीवाटीनं राहतात . एखादं बेट असावं , तशी . स्थलांतर करायचं , तर बेटच उठतं. यंत्रयुगातही हे बेट तुटलं नाही . घरी येऊन बायकोला हे तात्याचं निमंत्रण सांगतो , तेव्हा बायको वैतागते. म्हणते , ” तुम्ही हवं तर एकटे जा . माझ्या मुलांना मी चुकूनही झोपडपट्टीत नेणार नाही ! ” तोही तिचा भूतकाळ विसरायला पाहत होती . मला मात्र माझे बंध तुटता तुटत नव्हते . त्या दिवशी मी एकटाच लग्नाला जातो , “ एकटाच आलास ? ” म्हणून काकू कष्टी होते . तात्या मात्र मला सावरून धरतो . तात्याचं लग्नातलं रूप मी कधी विसरू शकत नाही . लग्नाला पुष्कळ अवकाश असतो . पण तात्या खूप पिऊन टाईट असतात. सारखं तोंडानं बडबडत असतात . मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे , ” तात्या , आज तरी प्यायला नको होतं. अजून लग्न लागायचंय . ” तात्या माझ्याकडे पाहत नवऱ्याकडच्या मंडळींना शिवी हासडतो . ” त्याच्या आईच्या वरातीत मी नाच … मला हसू फुटलेलं असतं . सटवाची शिवी पुन्हा तात्याच्या तोंडून ऐकलेली असते. तात्याचं दारू पिणं हे वऱ्हाडात कुणालाच खटकत नाही . बऱ्याच मंडळींचीही अवस्था तशीच.

तात्याचे एक नातेवाईक स्वत : ची स्टेशनवॅगन घेऊन आलेले असतात . नातेवाईकाची गाडी म्हणजे आपलीच गाडी , ह्या भावनेनं तात्या गाडीकडे पाहत असतात . तात्या वऱ्हाडात भाव खातात . पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण , तसा . नवरदेवाची त्या गाडीतून मिरवणूक निघते . मी मात्र मनात विचार करतो, दलितांच्या काही काही पिढ्या भौतिक दृष्टीनं खूपच पुढं गेलेल्या . बाकीचा समाज मात्र गुहाजीवन जगतो आहे. जाणिवेच्या दृष्टीने या दोन विभागांत दरी पडलेली . मिरवणुकीत तात्या सर्वांच्या पुढे असतो . गावी असतो तसा वाजंत्र्याचा तापा तात्यांनी लग्नात आणलेला . तात्या जेव्हा सनईची सुरावट ऐकतो , तेव्हा आपण मुलीचे वडील आहोत हे साफ विसरतो . आता त्यांनी वाजंत्र्याची सनई हातात घेतलेली . मोठ्या झोकात जुन्या गाण्यांची सुरावट ते वाजवित असतात . दुसरा सनईवाला त्यांचं गीत उचलीत असतो . मला एकाएकी वाजंत्र्याच्या ताप्यात पाहिलेले माझे वडील आठवू लागतात .

पावसाचे दिवस असतात . साऱ्या झोपडपट्टीत चिखल झालेला . मुलामुलीचं बौद्ध पद्धतीनं लग्न लागतं. जेवणाच्या पंगती जवळजवळ चिखलातच बसतात . तात्याच्या आग्रहाखातर मलाही जेवायला बसावं लागतं. पत्रावळीवर लापशी आणि उसळ दिली जाते…

क्रमशः
(स्रोत:दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading