मिनिनाथ गिरमकर
घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. सहा महिन्यांचे असताना पितृछत्र हरपले. लहानपणी गोळ्या बिस्कीट विकून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या काठच्या अजनुज गावातील मिनिनाथ रघुनाथ गिरमकर यांनी देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होणे पसंत केले. कारगील युद्धात ऑपरेशन रक्षकमध्ये अतिरेक्यांशी कडवी झुंज दिली. यामध्ये अजनुजच्या भूमीपुत्राला वीरमरण आले .
अजनुज वळणेश्वर महाराजांची पावनभूमी. या भूमीत रघुनाथ व नर्मदाबाई यांच्या पोटी ६ डिसेंबर १९७४ रोजी मिनिनाथ यांचा जन्म झाला. मिनिनाथ अवघे सहा महिन्याचे असताना पितृछत्र हरपले. प्रतिकूल परिस्थितीत नर्मदाबाई यांनी दीड रुपया रोजाने काम करून मिनिनाथ यांना लहानाचे मोठे करण्यासाठी लढाई लढली.
मिनिनाथ आठवीत असताना त्यांच्या मावशीने खाऊ घेण्यासाठी २५ रुपये दिले. पण मिनिनाथ यांनी या पैशातून स्वत:साठी खाऊ न घेता २५ रुपयांचे दोन गोळ्यांचे पुडे आणले. या गोळ्या विक्रीतून दुप्पट पैसे जमले. गोळ्या विक्रीतून पैसे दुप्पट झाल्याने मिनिनाथ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याच पैशातून आईला मराठी शाळेजवळ गोळ्या – बिस्कीट विक्रीचा व्यवसाय सुरू करुन दिला. माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात प्रवेश घेतला. अजनुज ते श्रीगोंदा असा बसने दररोज प्रवास करावा लागणार होता. बारावीत असताना १२ फेब्रुवारी १९९६ रोजी मिनिनाथ सैन्यदलात भरती झाले. जबलपूर (मध्यप्रदेश) येथे नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण यशस्वी पार पाडल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग नोव्हेंबर १९९६ जोधपूर (राजस्थान) रोजी झाली .
एकदा सुट्टीवर असताना शेजारील विठ्ठल घाडगे व पांडुरंग घाडगे यांचे छप्पर पेटले. मिनिनाथ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जाळात उडी मारुन घाडगे यांचे संसारोपयोगी साहित्य बाहेर काढले. जोधपूर येथून मिनिनाथ यांची १९९९ मध्ये जम्मू काश्मीर राज्यातील रामबन येथे बदली झाली. त्याचवेळी कारगील युद्धाला तोंड फुटले होते . कारगिल युद्धात मिनिनाथ गिरमकर यांनी पाकिस्तानी सैनिका विरोधात जोरदार लढा दिला. पाकिस्तानने आपले सैन्य माघारी घेतले. त्यानंतरही सीमेवर छोट्या – मोठ्या चकमकी झडत होत्या .
रामबन हा भाग पाकिस्तानी सीमेलगत आणि हिमालय पर्वत रांगेत वसलेला आहे. त्यामुळे या भागात अतिरेक्यांना प्रवेश करण्यास सोपे जाते. २००१ मध्ये पाकिस्तानी हद्दीतून भारतीय सीमा ओलांडून अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमाबन भागात घुसल्याची माहिती लष्कराला मिळाली. या घुसखोरांपासून भारतीय सीमांचे आणि स्थानिकांचे रक्षण करण्यासाठी सैन्याकडून ऑपरेशन रक्षक मोहीम हाती घेण्यात आली. तो रविवारचा (१८ नोव्हेंबर २००१) दिवस होता. रामबनच्या दिशेने घुसखोरांचा एक लोंढा येत असल्याची माहिती लष्कराला मिळाली. हिमालयाच्या पीर पांजल डोंगररांगेत लष्कर व घुसखोरांमध्ये धुमश्चक्री झाली. घुसखोर उंच डोंगरावरुन भारतीय जवानांवर गोळीबार करीत होते. वरच्या दिशेने गोळीबार करणे, सैन्याला कठीण जात होते. तरीही, हिमालयाचे जिगर घेऊन मिनिनाथ या घुसखोरांवर तुटून पडले होते. आपल्या बंदुकीत मिनिनाथ यांनी अत्यंत वेगवान मारा घुसखोरांच्या दिशेने सुरु केला. त्यामुळे काही वेळ थांबून घुसखोरांनी मिनिनाथ यांना टार्गेट करुन पहाडावरुन त्यांच्यावरच निशाणा साधला. घुसखोरांच्या बंदुकीतून निघालेल्या एका गोळीने मिनिनाथ यांचा वेध घेतला. ही गोळी त्यांच्या थेट डोक्यातच घुसली अन् ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
तब्बल सातव्या दिवशी मिनिनाथ यांचे पार्थिव गावात आले. मिनिनाथ यांचे पार्थिव पाहताक्षणी नर्मदाबाई बेशुद्ध पडल्या. शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात वीरपुत्र मिनिनाथ यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र, अनेक दिवसांच्या उपचारानंतर नर्मदाबाई शुद्धीवर आल्या. आजही त्यांना मुलाची आठवण आली की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते , एव्हढा गंभीर आघात नर्मदाबाईंवर झाला.
लग्नासाठी यायचे होते
आले पार्थिव…मिनिनाथ यांचे लग्नाचे वय झाल्याने त्यांच्या आईने एक मुलगी पाहिली. मुला – मुलीचे एकमेकांना पाहणे झाली. मुलगी पसंत असल्यामुळे मिनिनाथ यांनी लग्नास होकार दिला . आईने लग्नाची तारीखही काढली होती . २१ नोव्हेंबर रोजी ते लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी काढून येणार होते. पण १८ नाव्हेंबर रोजीच घुसखोरांच्या गोळीने मिनिनाथ यांचा घात केला. अन थेट मिनिनाथ यांचे पार्थिवच अजनुज गावात आले. ते पाहून वीरमाता नर्मदाबाई बेशुद्ध पडल्या. चार वर्षेत्यांच्यावर उपचारच सुरु होते.
शब्दांकन : शिवाजी साळुके, सार्वमत
(स्रोत:अग्निपंख फौंडेशन)
