बलुतं.दया पवार (भाग ३६)..

बलुतं..

पडतो , ही सर्वांची समजूत . देवगडावर लंगर तोडायचे . अंगात आलेले वाध्ये लोखंडी साखळी तोडायचे . मुरळ्यांचा नाच हा बघण्यासारखा असे . ‘ भंडार भोग्या रं – भोग्या , मलूदेवा ! ‘ हे गीत . सारंच त्या वयात थ्रिल वाटायचं .

तर काय सांगत होतो ? अशा त्या यात्रेत सई भेटलेली . भेटली म्हणजे काय , पाहिलेली . टोपपदरी भडक लुगड्यात तिला पाहिलेलं . लुगड्याचा बोंगा , नाकात नथ . मला पाहून ती चक्क लाजत असे . तिच्या वयाच्या पोरी तिला म्हणायच्या , ” हा बघ तुझा नवरा . ” ती दूरवर पळून जायची . तिला मी आवडलो आहे , याची खूण तिची नजरच सांगायची . लग्नाच्या आधी नवऱ्याशी बोलावं , हा काही रिवाज नव्हता . त्यामुळं बोलण्याचं धाडस व्हायचं नाही . एक मात्र खरं , की मी जिथं जाईन तिथं ती रेंगाळताना दिसायची . नुकतंच लग्न झालेला एखादा नवरोबा आपल्या बायकोला कडेवर घेऊन गडाच्या पायऱ्या चढताना दिसायचा . वाटायचं , आपल्यालाही सईला घेऊन अशाच पायऱ्या चढाव्या लागतील का ? आपल्याला सईला उचलता येईल काय ?

एकदा तर तिच्या गावी जाण्याचा प्रसंग येतो . आजी मुंबईहून आलेली . तिच्याबरोबर मी सईच्या गावी जातो . संध्याकाळ झालेली असते . माझी नजर सईला धुंडाळीत असते . रात्रीचं जेवणखाण आटोपतं , तरी सई दिसतच नाही . रात्रभर बेचैनी वाटते . सकाळी उठून बघतो , तो सई अंगणात कोकराशी खेळत असते . मला पाहून ती लाजून घुमाट घरात पळून जाते . मुंबईत पाहिलेला ‘ शंकुतला ‘ चित्रपट आठवतो . त्यात शकुंतला हरणा – पाडसाशी अशीच खेळत असते . ह्या दोन्ही दृश्यांची पुढं बराच काळ मनात सरमिसळ होत असते .

सईच्या घरी बराच मोठा बाडदाना असतो . चार – पाच भावांचं एकत्र कुटुंब असतं . घरी मुबलक मेंढ्यांचं खांड . हे गावच्या शेतकऱ्याच्या शेतात बसवलं म्हणजे शेत खतामुतानं रंगत असे . ह्याच्या बदल्यात त्यांना शेताच्या कडेला असलेला बाभळीचा पाला मिळायचा . त्यावर मेंढ्या जगवायच्या . वर्षाच्या शेवटी यांच्या पदरात लोकर पडायची . एकत्र कुटुंब असल्यामुळं जो तो वेगवेगळ्या पद्धतीनं उत्पन्नावर हात मारायचा . त्यामुळे सतत बेबनाव . सईचा बाप त्यांच्यापेक्षा वेगळाच होता . रंगानं खूपच काळा . डांबरासारखा . हसायचा तेव्हा त्याचे दात जास्तच चमकताना दिसायचे . अंगानं चांगलाच मजबूत . बगळ्यासारखा राहायचा . शेतातली कामं करायचा नाही . पी.डब्ल्यू.डी.मध्ये रस्त्यावरच्या कामावरचा तो मुकादम होता . रस्त्याला पावसाळ्यात खड्डे पडले म्हणजे बुजविण्याचं त्याचं काम . त्याच्या काळेपणाकडे पाहून वाटायचं , एवढ्या काळ्या माणसाला एवढी गोरी पोरगी कशी बरं झाली असावी ? त्याचं उत्तर आईकडे पाहिलं म्हणजे मिळायचं . आई सईसारखीच उजळ होती . पण सईचे घारे , निळसर डोळे हे तिचं वेगळं व्यक्तिमत्व होतं . कोब्रा मुलगी दिसावी ना , तशी ती दिसायची . आपला नातू एवढ्या गोकुळात पडला म्हणून आजी हरखून जायची .

ह्या सर्व मानसिकतेचा निचरा म्हणून की काय , मी एस.एस.सी. नापास झालो . नापास होण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ . रिझल्ट लागतो तेव्हा मी मामाच्या गावी असतो . मी हमसून रडू लागतो . आई , मामा धीर देतात . एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही , असं समजावतात . नापास कसा झालो याचं कोडं वाटत असतं . वर्गात एवढा काही मी ‘ ढ ‘ नसतो . मार्कशीट हातात पडते , तेव्हा नापासाचं कारण समजतं . इंग्रजीत अवघे २८ मार्क असतात . पाच – सहा विषय सुटलेले असतात . इंग्रजीचा तसा मी आठवीपासूनच धसका घेतलेला . इंग्रजीत दरवर्षी काठावर पास होत होतो . पुढं आयुष्यभर इंग्रजीनं छळलं . साहेबाची भाषा कधी जमलीच नाही . म्हणतात , की एकदा बी.ए.चे सारे पेपर जळाले . सर्वांना पास केलं . जळकी बी.ए. म्हणून ते विद्यार्थी ओळखले जाऊ लागले . तसं थोडंफार आमचंही झालं . सारी पिढीच बरबाद झाली . आठवीपासून चार वर्षांत इंग्रजी शिकलेलो . एक वाक्य धड बोलता यायचं नाही किंवा लिहिता यायचं नाही . श्रीमंतांची मुलं शिकवण्या लावून ही तूट भरून काढीत . आम्हाला हे शक्य नव्हतं . मोरारजीभाईना मनात लाखोली वाहू लागलो . ते त्या वेळी महाराष्ट्राच्या सरकारात होते . म्हणतात , की त्यांनीच ही शिक्षणपद्धती सुरू केली . हा जसा त्यांच्या संदर्भात राग होता , तसाच आमच्या हातातील बंदूक काढून घेतली , हाही राग होता . शाळेत असताना एक वर्षभर एन.सी.सी.त होतो . तिथं बंदूक चालवायला मिळायची . एन.सी.सी.चा कॅम्प एकदा लोहगावला गेलेला . ” पुढील वर्षी या , तुम्हाला आम्ही विमानात बसवू ‘ असं आश्वासन तेथील संचालकांनी आम्हा विद्यार्थ्यांना दिलेलं . एन.सी.सी.चं पुढील वर्ष उगवलंच नाही . एन.सी.सी. मोरारजीभाईंनी बंदच केली . विमानात बसण्याचं स्वप्न वाऱ्यावर उधळून गेलं .

नापास झाल्यामुळं एक झालं . साऱ्या आयुष्याची उभारी संपलेली . आपण पुढं फार शिकू , ही ऊर्मी गोठून गेली . जिथं तिथं इंग्रजीची भीती आडवी यायची . घुसमट वाढत चाललेली .

नापास झाल्यावर करणार काय ? पुन्हा संस्थेच्या संचालकांच्या हातापाया पडलो . नापास झालेला मुलगा बोर्डिंगमध्ये ठेवण्याची परवानगी नव्हती . बाहेर तर कुठलाच सहारा नव्हता . आपलं आयुष्य आता असंच पाला पाचोळ्यासारखं भरकटत जाणार . डोळ्यांपुढे अंधारी आली . याला बाहेर काढायचं म्हणजे याची आईही जाणार , हा बहुधा संचालकांनी विचार केला असावा . स्पेशल केस म्हणून राहण्याची परवानगी मिळाली .

नापास झालेला विद्यार्थी- ह्याला बोर्डिंगात राहण्याचा अधिकार नाही . त्यामुळं मुलं जादाच कुचेष्टा करू लागली . गोळाभर अन्नासाठी आपण किती लाचार झालोय म्हणून स्वत : वरच वैतागायचो . मी मुलांच्या नजरा टाळू लागलो . जेवणासाठी फक्त बोर्डिंगात जायचो . जवळच माणसाच्या उंचीएवढं कोंबड्यांचं खुराडं होतं . ते तसं रिकामंच होतं . त्यात राहू लागलो . अभ्यासाला ती निवांत जागा वाटली . शनवारच्या बाजारात जाऊन सईला बघण्याचंही सोडून दिलं . इंग्रजी पुस्तकाचं पीठ पाडलं . माझं पाठांतर तसं चांगलं . नाटकाचे संवाद सहजच पाठ करायचो . ती सवय उपयोगी पडली . राहिलेल्या विषयाकरिता पुन्हा नगरला जावं लागलं . ह्या वर्षी , म्हणजे ऑक्टोबरात मी सुटलो . गंमत म्हणजे इंग्रजीत साठाच्या पुढे मार्क पडले होते . इंग्रजी सुधारलं , असं काही नव्हतं . ही पाठांतराची कमाल होती . एवढे मार्क पडतील याची स्वप्नातही कल्पना आली नव्हती .

बोर्डिंगमधील आमचा शेर आता खऱ्या अर्थान संपलेला . एखाद्या तुरुंगातील सक्त मजुरीच्या शिक्षेनंतर वाटावं , तसं वाटत होतं . पण कैद्याला बाहेरच्या जगात कोण विचारणार ? आपण मार्ग कसा काढावा , हा प्रश्न भेडसावत होताच . मुंबईचं लहानपणचं आकर्षण उफाळून आलेलं . मुंबई आपल्याला खुणावते आहे . ह्या मोहनगरीत आपल्याला मार्ग मिळेल , असं वाटलं . आपलेच काही मित्र कचेरीत कारकून झालेले . तगाई कारकुनाला तर ‘ मायंदाळ ‘ कमाई . कारकुनाचा रुबाब केवढा ! सारे त्याला ‘ भाऊसाहेब ‘ म्हणत . लोक त्याची थुंकी झेलत . पान , स्पेशल चहा पुढ्यात तयार . ह्या गोष्टीचं मात्र मला कधीच आकर्षण वाटलं नाही . तसंच मास्तरकीचंही . खेड्यात काय किंवा जिल्ह्यात काय , आपला जीव कोंडला जाई . ह्या साचलेल्या जीवनात काहीच खळबळ नव्हती , सारं कसं मृतवत् असं वाटायचं .

आई आणि बहिणीला सोबत घेऊन एकदाच मुंबईची वाट धरतो . कावाखाना आमची जणू वाटच पाहत असतो .

असं रक्तात भिनलेलं मुंबईचं आकर्पण . एवढ्या वर्षांनी विचार करतोय . खरंच , ह्या शहरानं आपल्याला काय दिलं ? कृष्णानं जरासंधाच्या देहाच्या दोन चिरफळ्या दोन दिशांना फेकल्या म्हणतात . तसं ह्या शहरातही आपण दोन जगांत फेकलेलो . जिथं आपण रात्री डोकं टेकायला येतो ते एक रौरव नरकाचं जीवन , आणि जे जीवन दुरून पाहतो , ज्या विलासी जीवनाचं दुरून का होईना दर्शन घेतो , ती वेगळीच मोहनगरी . अंगठीतील खड्यासारखी . ती डोळे दिपवीत असते . खुणावत असते . पण हा खडा आपल्याला सतत हुलकावण्या देत आलाय , याचीही प्रखर जाणीव होते .

संगमनेर सोडताना काडीमात्र वाईट वाटलेलं नसतं . आईनं बोर्डिंगात किती कष्ट उपसलेले . तिनं थापलेल्या भाकरीची चवड रचली , तर डोंगराएवढी होईल . आणि ह्या भाकरीनंच आम्हाला आयुष्यभर छळलेलं . पोटाची आग बुझविण्यासाठीच आईन हे दिव्य केलेलं . आता तिला दम्याचा आजार उपटलेला . थोडंसं चालतानाही धाप लागायची . चुलाणाच्या ढणढणत्या उजेडात विस्तवाच्या धगीपाशी ती बसलेली . अंगात फोपरी वाढलेली . बहुधा तिला ब्लड प्रेशरचा त्रास होत असावा .

आम्ही मुंबईला आलो ते पुन्हा कावाखान्यातच . मुंबईत डोकं टेकायला आम्हाला तेवढीच हक्काची जागा होती . आजी तोपर्यंत जिवंत होती . ती आम्हाला कशी दूर लोटणार ? काकूला मात्र आम्ही त्याच घरात राहावयास आलो ते आवडलं नाही . कावाखान्यात आल्यामुळं पुढं आपल्या जीवनात दु : खाचं किती विचित्र ताट पुढ्यात आलं , याची जाणीव मात्र सुरुवातीला येणं शक्य नव्हतं .

पुढील आयुष्यात कधीमधी गावाला गेलो , तर जाताना संगमनेर स्टँडवर उतरत असे . गावात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसे . शाळासोबती जीवनात स्थिर झालेले .

एकदा असाच संगमनेरच्या स्टँडवर उतरलेलो . बोर्डिंगवर जाण्याची ऊर्मी येते . सायकलवर टांग टाकून धाकट्या संगमनेरात जातो . दुरून बोर्डिंगची इमारत दिसत असते . मनात भावनांची गर्दी असते . आयुष्यातील चार – पाच वर्षे इथं घालविली . आईची आठवण छळत असते . बोर्डिंगवर जावं , आई ज्या स्वयंपाक खोलीत काम करत होती , ती जागा पाहावी ; आपण जिथं झोपत होतो , अभ्यास करत होतो , त्या जागेला भेट द्यावी ; मुलांशी गप्पा माराव्यात – अशा अनेक विचारांची मनात दाटी झालेली . बोर्डिंगवर मला कोणीच ओळखत नाहीत . दोन – चार मुलं पत्त्यांचा जुगार खेळत असतात . मला पाहून सारेच बिचकतात . बोर्डिंग तपासणीसाठी सरकारी अधिकारी आलाय , अशी त्यांची समजूत होते . जेवणाच्या हॉलमध्ये जातो . जमिनीला जनावरांच्या गोठ्यात पडतात तसे वीतभर खड़े पडलेले . स्वयंपाकखोलीही तशीच उदगाळलेली . बोर्डिंगच्या मधल्या दालनातनं वलाणीवर मुलांच्या गोधड्या लोंबत असतात . आपल्या वेळी बोर्डिंगात एवढा बकालपणा केव्हाच नव्हता . मनानं खूपच उदास होतो . कुणाही मुलाशी बोलण्याची इच्छा होत नाही . विषण्ण मनानं बोर्डिंगची पायरी उतरतो . बोर्डिंग चालवतानाचा सुरुवातीचा ध्येयवाद गेलेला असतो . हा काहींचा धंदा झालेला . राजकीय पक्षाचेही हे अडे झालेले .

पेटिट हायस्कूलचा प्रसंग मात्र खूपच रोमांचित करणारा . रावसाहेब कसबे संगमनेरच्या कॉलेजात लेक्चरर असतो . त्यामुळे गावात कधी उतरलो तर त्याला भेटावयास कॉलेजवर जात असतो . एकदा संगमनेरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेनं पेटिटवर कवितावाचन , दलित साहित्य चर्चा असा माझा कार्यक्रम ठेवलेला . हायस्कूलचा माजी विद्यार्थी आहे याची गावात कुणालाच माहिती नाही . दगडू नावानं तर मला आता कुणीही ओळखीत नसतात . सभेच्या ठिकाणी जातो , तो मन्हाळकर हे अध्यक्षस्थानी असतात . ज्यांनी मला मराठी कविता शिकवली , ते गंधेमास्तर पुढ्यात बसलेले . भाषणाला सुरुवात करतो , तेव्हा आज मी किती गांगरलोय , याचा खुलासा

क्रमशः
(स्त्रोत:दया पवार यांच्या बलुतं पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading