बलुतं..दया पवार.(भाग ३९)

बलुतं..

मी हळद लावणार नाही ; पोळ्याच्या बैलासारखं भलं मोठं बाशिंग बांधणार नाही ; तोंड दिसणार नाही एवढ्या खोबऱ्याच्या , मोत्यांच्या मुंडावळ्या बांधणार नाही , इत्यादी माझ्या मागण्या पाहून लग्नाला जमलेली वहाडी मंडळी चक्रावली . एवढा सुधारक नवरा ते बहुधा प्रथमच पाहत होते . मला विरोध करावयास सुरुवात झाली . आईनं पुढ्यात येऊन तोंड झोडून घेतलं . शेवटी फक्त हातापायाला हळद लावावयास कबूल झालो . मोत्यांच्या एक – दोन मुंडावळ्या बांधल्या . आईच्या समाधानासाठी ह्या तडजोडी स्वीकारल्या .

हळदीच्या दिवशी सर्व महारवाड्यातील भाऊबंदांना पंगत देण्याची प्रथा होती . ह्या वेळी मागच्या काही पंगती बाकी असतील , तर त्यांचाही हिशोब इथंच चुकता व्हायचा . तेवढ्या जेवणावळी उठवाव्या लागायच्या . लग्नाच्या वेळी भाऊबंदांचा भाव खूप वधारायचा . नाही तर लग्नाला येणार नाही , अशी तंबी दिली जायची . भाऊबंदांनी लग्नाला येणं म्हणजे माणूस खानदानी असल्याची पावती मिळे . नाही तर लोक अयऱ्यागयऱ्याचे संबोधित . आमच्यावर तशा काही जुन्या पंगती नव्हत्या . वडील – चुलत्यांचे दिवस आम्ही घातलेले असतात . जेवणाच्या पंगतीला कडाकण्या आणि गुळवणी फार मोठं जेवण समजलं जाई . कडाकण्या म्हणजे तेलात तळलेल्या खुसखुशीत पुऱ्या .

हळदीच्या दिवशी पंगतीचा प्रसंग आठतोय . ह्या पंगतीचा सारा बाजार भाऊबंदांच्या सल्ल्यानं तालुक्यातून करून आणलेला . चावडीत मोठं चुलाण खोदलेलं . कढईत मंडळी पुऱ्या तळीत आहेत . आजोबा तानाजी कावळ्यासारख्या नजरेनं मालावर पहारा ठेवतो आहे . कसं कुणास ठाऊक , तान्याबाबाला भाऊबंदांचा संशय आला . त्यानं चावडीच्या पोटमाळ्यावर जाऊन पाहिलं . तिथं गुळाची ढेप , पिठाच्या उंड्या चोरून ठेवलेल्या .. तान्याबाबा संतापतात . आईमाईवरून शिव्या घालतात . कार्याचा नाश करावा , जेवायला बसल्यावर ज्याच्या घरी लग्न आहे त्याचं हसू व्हावं हा ह्या मागे भाऊबंदांचा कुटिल डाव . ही परंपरा मी लहानपणापासून पाहत आलेलो . पंगत जेवायला बसली म्हणजे विचारायला नको . कुणी मांड्याखाली पुऱ्या लपवतात , तर कुणी ” महा मुलगा ममईला आहे , त्याचाही वाटा टाक . ” , ” मह्या मुलाच्या लग्नात कसं वघळ जाईपहोतर खालं ? ” हा बायकांचा पंगतीतला संवाद . माझं माथं विचारानं खूपच ठणकत असतं . पण बोलावं तर आपल्याच लग्नाचा खेळखंडोबा , म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी अवस्था . ह्या जेवणानंतरच मुलीच्या गावी लग्न लावण्याकरता मंडळी निघणार असतात . अर्थात , एकुलती एक बैलगाडी भाड्यानं ठरवलेली . सारं वऱ्हाड कसं जाणार ? महारवाड्यातील मंडळी खळून बसलेली . आमच्या घरात कुणी कर्तसवरतं नाही . आजोबा तानाजी सर्वांची समजूत काढत असतो . ‘ रांडमुंडच्या मुलाच्या लग्नाला असा आडदांडा का ? ” म्हणून विनवत असतो . पण मंडळी जागची हलायला तयार नसतात . शेवटी तान्याबाबा एस.टी.चा सर्वांचा गाडीखर्च देतो , गाडीखर्च मिळाल्याबरोबर मंडळी हरखतात . माझ्या गावापासून नवरीच्या गावात दहा – बारा मैलांचं अंतर असतं . नवरदेवाची गाडी निघते , तेव्हा तान्याबाबा नारळ फोडायला विसरत नाही .

माझं ध्यान मजेशीर दिसत असावं . हातातील कट्यार नीट सांभाळण्यासाठी करवल्या सारख्या सूचना करत असतात . हळदीच्या अंगाला भूत लवकर भिडतं म्हणतात . त्यासाठी हाती कट्यार . टोकाला लिंबू खुपसलेलं . गाडीत करवल्यांची गाणी चालू असतात :

” घोड्या , फदडाक फदडाक तुझी चाल

घोड्या , चाबूक चाबूक हाले शेप …

‘ लग्नात तशी खूपच धमाल येते . अर्थात याचं श्रेय जातं ते माझ्या विनोदाला . आज तसा मी खूपच गंभीर आहे . तोंडावर क्वचितच हसू फुटतं . पण त्या वयात किती चेकाळलो होतो , याला काही सुमार ? साऱ्या वऱ्हाडाला सारखा हसवत होतो . लग्नानंतर बैलगाडीतून गावात मिरवणूक निघालेली . हळदीचं अंग असलेली बायको शेजारी बसलेली . कुणाच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं बायकोला चिमटे काढण्याची लहर आलेली. बायको गालावरच्या मुंडावळ्या सारून रागानं पाहते आहे , एवढ्या माणसांत हा चहाटळपणा कशाला , हा तिच्या नजरेतला आशय . जावजीबाबा मध्येच जवळ येऊन ” जरा रुबाबात बस ” असं सांगून जातोय . ” पोराला पोरगी लई मोठी झाली , हे लोढणं माझ्या पोराच्या गळ्यात उगाच बांधलं ” हे त्यांचं मत . तो काय बोलतो आहे हे त्या काळात मला विशेष कळलं नाही . एक मात्र खरं , की एक वर्षापूर्वी जेव्हा आपण सईला पाहिलं , तेव्हा तिची अंगकाठी किती किरकोळ होती ! सडसडीत वेताच्या छडीसारखी . पण आज मी लग्नात पाहत होतो , तो ती अंगानं चांगलीच भरलेली . आपल्यालाच प्रथम तिला ओळखता आलं नाही .

रात्री जेवणखाण आटोपल्यावर विहीणबाईचा रुखवताचा खेळ सुरू झाला . ह्या खेळाचा अर्थ मला मात्र आजही कळत नाही . विहिणीच्या डोक्यावर कुरड्या फोडणे , चावट उखाणे घेणे हा प्रकार . त्यात सांडणीचा एक खेळ असायचा . चार पुरुषांनी प्राण्यासारखे खाली वाकायचे . त्यांनी लाकडी बाज अंगावर घ्यायची . तिच्यावर विहिणीला बसवून नाचवायची , हा एक प्रकार . वाजंत्री वाजवीत आहेत , त्यांच्या गोंगाटात विहीणबाईच्या टिरीला खालून पुरुष मंडळी चिमटे घेत आहेत आणि या कल्लोळात विहीणबाईचा सुटकेचा आवाज कोणीच ऐकत नाही , हा सारा प्रकार .

सकाळी नवरा – नवरीला पाण्यावर नेणं आलंच , प्रत्येक ठिकाणी मात्र वाजंत्री हे लागतच . नवरा – नवरीला आंघोळ घालणं , सुपारी सोडविणं , खोबरंखाऊन एकमेकांच्या तोंडावर थुकणं हा प्रमुख कार्यक्रम . सईच्या हातातील सुपारी आपल्याला सुटणार नाही आणि मंडळीत आपलं हसं होणार , याची जाणीव होते . सर्वांना ऐकू जाईल अशा पद्धतीनं मी बायकोच्या कानात सुपारी सोडून देण्यास सांगतो आणि सारं वऱ्हाड माझ्या संवादामुळं हसू लागतं . आंघोळ झाल्यावर बायकोला उचलून घेणं ही प्रथा . आपण बायकोच्या थोडं जवळ जायचो आणि आपल्याला बायको उचलणार नाही असा आविर्भाव करून पुन्हा परत फिरायचो . ह्यामुळं तर हास्याचा कळस होतो . आपण बायकोला उचलून घेऊ शकू की नाही ह्याबद्दल मीच साशंक असतो . वऱ्हाडानेही असा गमत्या नवरा बहुधा आजवर पाहिलेला नसावा . जावजीबाबा मात्र उदासपणं म्हणाला , ” काय होतंय कुणास ठाऊक , पोराच्या संसाराचं हसू तर होणार नाही ना ? ” जावजीबाबा त्या आनंदाच्या क्षणीही असं का बरं बोलला , याचं गूढ मात्र मला कळलं नाही .

वरातीच्या रात्री धेडगा नाचवणं हा एक आणखी प्रकार . हा भलताच तर्हेवाईक . धेडग्यात नवरा – नवरीला वेगवेगळी माणसं उचलून घेत . बिगरतेलाच्या चपात्या नवरीच्या हाती देऊन वाजंत्र्याच्या तालात गोल गोल नाचणं , म्हणजे धेडगा नाचवणं . या वेळी बायको नवऱ्याला चपलांनी बडवते आहे , हे दृश्य मला वाटतं , पुढील काळात पुरुष स्त्रियांना आयुष्यभर बडवीत असतो , त्यामुळं तर लग्नाच्या दिवशी का होईना , नवऱ्याला वडविण्याची परवानगी ह्या रूढीनं दिली नसावी ना ?

मराठी सिनेमात दाखविला जातो , तसा काही माझ्या लग्नाचा मधुचंद्र साजरा झाला नाही . धडधडत्या काळजानं हाती दुधाचा तांब्या घेऊन जिना चढणारी नायिका . नायक खिडकीतून उगवलेला चंद्र पाहत असतो. सारा पलंग फुलांनी सजवलेला . हे दृश्य माझ्या स्वप्नात राहतं . नवरी जेव्हा नवऱ्याच्या घरी येते , तेव्हा तिची खडूस आजी तिच्याबरोबर आलेली . रात्रीची झोप येत नाही . बायको आजीच्या पुढ्यात झोपलेली . घरात घरभर माणसं . बायकोशी दोन शब्द बोलणंही कठीण . मनात चुरमुऱ्याचे लाडू खात होतो . एक – दोन दिवसांत बायको पुन्हा आजीबरोबर माहेरी चाललेली . खट्याळ नजरेनं ती बघते आहे आणि आपण मात्र भुकेलेल्या माणसाच्या तोंडचा घास काढून घ्यावा , अशा मानसिक अवस्थेत .

सात – आठ दिवसांनी बायको पुन्हा येणार असते . त्यावेळी सारा वचपा काढावा या मन : स्थितीत असतानाच मुंबईहून नातेवाइकाची तार येते . नोकरीचा कॉल येतो . मागील सर्व अनुभवामुळे मुंबईला इंटरव्हयूसाठी जाणं जिवावर येत असतं .

” पोरगी लई गुणाची . तिचा पायगुण चांगला ठरला . ” खूश असते . आम्ही सर्व मुंबईला परततो . आठ दिवसांनी होणारी बायकोची भेट आता अनिश्चित काळापर्यंत लांबलेली असते .

शेवटी एकदाची नोकरी लागते . पण नोकरी खूपच तऱ्हेवाइक असते . परेल येथील व्हेटरनरी कॉलेजात क्लार्क – कम – लॅबोरेटरी असिस्टंट असा माझा लांबलचक हुद्दा असतो . पहिल्याच दिवशी नोकरीवरच्या अनुभवानं मी कमालीचा कोसळतो . मला इथंच का नोकरी लागते , याचं कारण समजतं . कोणताच उच्चवर्णीय माणूस इथं नोकरी करणं शक्य नसतं. महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यांतून छोट्या बाटल्यांतून आजारी जनावरांचं शेण यायचं . सकाळीच ही महाराष्ट्रातून आलेली पार्सलं फोडणं , त्यांची रजिस्टरमध्ये नोंद करणं , मग ती काचेच्या जारमध्ये काचेरी रॉडनं घुसळणं , त्याचं तासातासानं पाणी बदलणं , त्यातील गाळ नाहीसा करणं , शेवटी स्वच्छ पाणी राहिलं म्हणजे जारच्या तळातील भाग एका काचेरी कुपीत गोळा करणं , हे माझं काम. डॉक्टर दुपारनंतर येत. मायक्रोस्कोपखाली जमवलेला द्रव घेऊन ते तपासणी करीत , जनावराला कोणता रोग झालाय , याची जंत्री वेगवेगळ्या कागदांवर ते करीत. हा सर्व रिपोर्ट मला पाठवावा लागे.

असंच दुसरं एक खातं होतं . त्याचं नाव अॅनॉटमी . त्यात जनावरांची चिरफाड व्हायची . हुकाला लावलेली , साल काढलेली प्रचंड धुडं . ती नासू नयेत म्हणून त्यांच्या नसानसातून अल्कहोल भरणं हे माझं काम . हाताखाली काम करणारा क्लास फोरही महारच . ही मंडळी कोकणातली . व्हेटरिनरी डॉक्टरांपेक्षा जनावर सोलण्यात ही मंडळी एक्स्पर्ट . त्यांचा हा वडिलोपार्जित धंदा . दुपारी मानस सरोवरातील हंसासारखे पांढरेशुभ्र गाउन घालून शिकाऊ डॉक्टरांचा जथा यायचा . त्यांच्याबद्दल कमालीची चीड वाटायची . वाटायचं , ह्यांचे हे शुभ्र गाउन जनावराच्या रक्तानं भरवावेत . खरं म्हणजे ह्यात त्यांचा काहीच दोष नव्हता . पण असंतोषाला मोकळं करण्यासाठी माझ्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता . विचारानं डोकं फुटायची वेळ यायची . वाटायचं , साले आपण एवढे शिकलो , तरी पण शेवटी आपल्या वाट्याला बापजाद्यांचाच धंदा का बरं यावा ? हे आपलं संचित तर नसावं ना , अशीही शंका चाटून जायची . समाजातील व्यवस्थेविरुद्ध खरी चीड निर्माण झाली ती या वेळी . आजचा माझ्या मनात जो विद्रोही कल्लोळ आहे , त्याची बीजं या अनुभवात सापडतील . वाटायचं , मुडदेफरासांनी उकरलेल्या मातीसारखी उलथापालथ व्हावी .

ह्याच दरम्यान मी रुपारेल कॉलेजात जात होतो . सकाळचं कॉलेज . दहा वाजता धावतपळत ऑफिस गाठावं लागे . कॉलेजमधील रोमँटिक जीवन कधीच वाट्याला आलं नाही . मागच्या बाकावर बसायचो , ते केवळ सोयीसाठी . केवळ हजेरी लावणं , एक – दोन तास कसे तरी पुरे करणं , मागच्या मागं पळून जाणं , हा मागं बसण्याचा उद्देश होता . रुपारेलमधले देसाई नावाचे संस्कृत शिकविणारे प्रोफेसर आठवतात . खूपच उजळ . भव्य व्यक्तिमत्त्व . उंच धडंग . कालिदासाचं ‘ मेघदूत ‘ शिकवायचे . त्यातील शृंगारिक श्लोक ऐकून मुलं – मुली चेकाळायची . त्यांना हसण्याच्या उकळ्या फुटत .

क्रमशः
स्रोत:(दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading