बलुतं..दया पवार..(भाग ४१)

बलुतं..

आपल्याच एखाद्या मित्राला आपल्या बायकोबद्दल आसक्ती निर्माण झाली , तर ह्यात वावगं काय ?

आमच्या घरापुढील यहुदी मुसलमानांच्या क्लबमध्ये जुगार खेळायला येणारी माणसं सईला नोट दाखवीत . सई रात्री झोपेच्या वेळी माझ्याकडे तक्रार करायची . पण मी तिची गोष्ट केव्हाच मनावर घ्यायचो नाही . आपला नवरा आपलं ऐकत नाही , हे पाहून तिनं क्लबमधील यहुदी – मुसलमानांची तक्रार वडीलधाऱ्या मंडळींकडे केलेली . आपण त्या काळात एवढे नेभळटासारखे का बरं वागलो , याचं कारण मात्र आजही कळत नाही .

सई आली आणि आपल्या एकुलत्या एका मुलाचा तिनं ताबा घेतला , हे काही आईला तितकंसं आवडलं नाही . मी घरात असेपर्यंत सई खूपच गोड वागायची . पण माझं पाऊल बाहेर पडलं , म्हणजे सासू – सुनेच्या भांडणाला तोंड फुटत असे . आपल्याशी एवढी चांगली वागणारी सई आपल्या बहिणीशी आणि आईशी असं विपरीत का वागते , हे कोडं सुटायचं नाही . संध्याकाळी कामावरून आलो , म्हणजे आई सईच्या वागणुकीचा पाढा वाचायची . अर्थात , गुन्हा म्हणजे तसा काही मोठा नसायचा . घरातील कामकाजासंबंधीच त्या तक्रारी असत . आईचा सुरुवातीचा प्रेमळ स्वभाव बदलत चाललेला . सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात ती मला ” बैला ! ” म्हणून पुकारायची . ‘ मी बायकोच्या फार आहारी जात चाललोय , मी बैल झालोय ‘ असा ती पाणउतारा करायची . माझी अवस्था एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी व्हायची .

लहानपणापासून आईनं तसं मला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं आणि कालची ही गोरीगोमटी सई आली आणि तिनं आपल्या लेकाला आपल्यापासून ओढलंय , हा आईचा खरा संताप होता . पण आईची मानसिकता काही समजू शकत नव्हतो . सुशिक्षित झाल्यामुळं किंवा थोडंफार वाचन झाल्यामुळं आमच्या मागच्या पिढीतील पुरुषांपेक्षा मी बायकोला सौजन्यानं , आदरानं वागवीत होतो आणि त्यामुळंच घरात भांडणाचा डोंब पेटला होता . पायातली वहाण ही पायात ठेवावी , हा बायकोबद्दल भोवताली समज . आई कळवळून सांगायची , ” लेका , बायकोला डोक्यावर घेतलंस , तर उद्या ती डोक्यावर हगायला कमी करायची नाही ! ” आई एवढी मला नरकातून काढायची , पण सईला मी फुलासारखा जपायचो . तिला किंचितही दुखवावंसं वाटायचं नाही . आपल्यासाठी ती किती वेडीपिशी होते , आपला सहवास मिळावा म्हणून घरी आलो म्हणजे कशी जवळ जवळ रेंगाळते आणि तिच्या सहवासात मनाचे विविध रंग कसे उलगडत जातात ! तिचा सहवास म्हणजे स्वर्गसुख ; वेगळं काही नाहीच , असं मनोमन वाटत होतं आणि आई तर तिचा दुस्वास करीत होती .

आता मला नोकरी लागलीय , तेव्हा आईनं मार्केटमध्ये कागद वेचायला जाऊ नये , असं मला वाटे . आई मार्केटमध्ये कागद वेचते , हा आपल्या प्रतिष्टेला धक्का आहे , असं खूपसं आईला सांगून पाहिलं . “ मी ; लेका, कागद वेचायला जाणार नाही ” असं आश्वासन द्यायची . पण मी नोकरीवर गेल्याबरोबर पाटी डोक्यावर घेऊन आई मार्केटचा रस्ता चालू लागायची . संध्याकाळी घरी आलो म्हणजे बायकोकडून सारा वृत्तांत कळायचा . आईला ह्या संदर्भात विचारायचो . आई लेकीच्या लग्नाचं कारण पुढं करायची . “ तू लेकीच्या लग्नाची काळजी करू नकोस ” असं तिला खूप बजावलं , तरी ती ऐकायची नाही .

एका संध्याकाळी माझ्या मनाचा खूपच तोल गेलेला . घरातील बायको – आईची भांडणं . मानसिक शांतता कमालीची ढासळलेली . सालं , आपण उगीचच लग्न केलं . लग्न करून माणसं सुखी होतात , म्हणतात ; पण आपल्या आयुष्यात तर भांडणांनी विषारी चुबुकाटे पसरलेले . सकाळी झाडावं , तर संध्याकाळी पुन्हा उगवणारे . घरात भिंतीवर एक मोठा आरसा होता . तो हातात घेतला . वेड्यासारखे अंगाला झटके देऊ लागलो आणि रागानं तो खाली फरशीवर आदळला . ” लेकाला मह्या येड लागलं ” म्हणून आईनं आकांत केलेला . पुन्हा तुम्ही दोघी भांडणार नाही , असं त्या रात्री दोघींकडून कबूल करून घेतलं , तेव्हाच माझा भडका शांत झालेला . भांडणाला तसं काहीही कारण पुरे असे . “ तू बायकोला उंच उंच लुगडी घेतोस , मला साधं लुगडं घेतोस- ” ही आईची नेहमीची तक्रार . आईला पाच – दहा रुपयानंही भारी लुगडं घेतलं असलं , तरी ही गोष्ट आईला खरी वाटत नसे . साड्या घेताना मग आईला दुकानात न्यावं लागत असे .

सईला गोल पातळ नेसवावं असं मनापासून वाटे ; पण आईचा ह्याला सक्त विरोध होता . गोल पातळात सई कशी वाण्या – बामणासारखी दिसेल , ही माझी कल्पना . पण ती केव्हाच वास्तवात उतरवता आली नाही . आपले काही मित्र तर बायकोला किती मॉडर्न सजवतात आणि आपल्याला तसं काही करता येत नाही , याची खंत वाटायची .

एकदा डबेवाला डबा नेण्यास घरी वेळेवर आला नव्हता . आपला नवरा ऑफिसात आज उपाशी राहणार , ह्या चिंतेत सई . तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक . तिनं माझ्या बहिणीला सोबत बरोबर घेतलं आणि चक्क डबा घेऊन ऑफिसवर आली . डबा घेऊन सई ऑफिसमध्ये आली , हे काही मला आवडलेलं नसतं . एकीकडे तिच्या भाबड्या प्रेमामुळं भारावून गेलेलो असतो, तर, दुसरीकडे बाकीचे ऑफिसचे मित्र काय म्हणतील , हा प्रश्न सतावत होता . पण कुणी ओळखलं नाही , की डबा घेऊन येणारी माझी बायको होती म्हणून . काहींनी मात्र टोमणा मारला , की ” काय रे , घरी कामवाली माल ठेवलीस ! ” मी मनातून ओशाळलो . खरं सांगण्याचं धारिष्ट मात्र मला झालं नाही . ऑफिसमधल्या मित्रांना कधी घरी घेऊन आलो नाही किंवा तिला घेऊन कधी पांढरपेशा मित्रांकडे चहालाही गेलो नाही .

कावाखान्यात जाधव नावाचा माझा एक मित्र राहत असे . सुरुवातीला तो काकूकडेच खानावळी होता . महा वल्ली . तासन् तास गप्पांत रंगायचा . खूप हसवायचा . मॅट्रिक झाल्यावर तो असाच कारकून म्हणून – स्टैप व्हेंडॉर म्हणून कोर्टात नोकरीला होता . चार – सहा वर्ष मध्ये गॅप पडली असल्यामुळं त्यानं बऱ्याच उशिरा कॉलेज सुरू केलेलं . जीवनाचा सारा तळचा अनुभव त्यानं घेतलेला . ह्याच्या पोतडीत खूपच विलक्षण चिजा . जाधवच्या स्वभावात एक कमालीची आक्रमकता होती . ती पाहून मी तर दिपून जायचो . जीवनात वागताना समाज काय म्हणेल याचं मोठं ओझं डोक्यावर घेऊन आपण वागत होतो आणि जाधव बिनधास्त आयुष्य जगत होता .

एकदा तर त्यानं ऑफिसमध्ये धमालच केली . कोर्टात दहा – पंधरा हजारापर्यंत स्टँप त्याला विकावे लागत . त्या कोर्टात एक प्रसिद्ध वकील होता . स्वत : जज्जही त्याचा सन्मान करायचा . असा हा वकील हातात नोटांची थप्पी घेऊन जाधव ज्या स्टॉलवर स्टॅम्प विकत होता तिथं येतो . जाधव चिंचोळ्या खिडकीतून बाहेर बघतो . वकील रांगेत मुळीच उभा नसतो . सर्वांच्या आधी त्याला स्टॅम्प हवे असतात . लवकर स्टॅम्प द्यावेत म्हणून वकील गुरकावत असतो . त्यानं साऱ्या नोटा फळीवर ठेवलेल्या . जाधवाचा पारा एकाएकी चढ़ता . तो साऱ्या नोटा हातात घेतो आणि क्षणात साऱ्या बाहेरच्या फरशीवर पत्त्यांसारख्या उधळून देतो . नोटा जमा करण्याकरिता वकिलाची धावपळ होते . हातात रूळ घेऊन जाधव आक्रमक बनलेला . सारी रांग जाधवच्या कृत्यामुळं दिङ्मूढ होऊन बघत असते . जाधव सांगत असतो , ” अर्थात , जज्ज मला बोलावतात . झालेल्या प्रकारांमुळे नोकरी जाण्याची भीती असतेच . मी लगेच जज्जसाहेबांचे पाय धरतो . रडू लागतो . अर्थात , जज्ज मला माफ करतात . हा सारा प्रकार रंगवून सांगत असतो . ” जज्जांपांशी रडलो , हे खर ; पण तिथं कोण बघायला होतं ? साऱ्या कोर्टात तर आपण शौर्य गाजवलं ना ? ‘ जाधवच्या ह्या युक्तिवादानं मी चाट पडलो .

जाधवचं ह्या दरम्यान लग्न झालं . चिनी मातीची एखादी सुबक बाहुली असावी तशी त्याची बायको होती . त्याच्या लग्नाला मी पुण्याला गेलो होतो . मी राहत होतो त्याच्या बाजूला जसा कामाठीपुऱ्याचा स्लमभाग होता , तशाच वस्तीत त्याचं घर हातं . दहा – बारा भावंडं उंच माळ्यावरच्या जागेत आपल्या आईबापांबरोबर राहत होती. त्याचा बाप हा चांगला कीर्तनकार . सतत तोंडात रामनामाचा जप . त्यांचा मुलगा जाधव हा तर अगदी वेगळ्या टोकाला . जाधव आपल्या बापाबरोबर एखाद्या जिवाभावाच्या मित्राशी वागावं तसा वागे , आपला लग्नाचा वुलनचा कोट बापाच्या अंगात घालावा . सांगावं , ” बाप , आज तू हीरो दिसतोस ! ” बापही एखादी शिवी हासडून गालातल्या गालात हसू लागे . जाधवचं घरातील थोरल्या किंवा धाकट्या भावाशीही असंच नातं . पण मी पाहिलं ; एकदा का मंडळी दारू पिऊन भांडायला लागली म्हणजे सात जन्माच्या दुश्मनासारखी वागत . सकाळी उठून बघावं तर रात्रीचं भांडण – मारामाऱ्यांचं सावट घरावर मुळीच नसायचं . ह्या घरात आनंद आणि द्वेषाचं मजेदार मिश्रण होतं .

जाधव लग्नात धमाल वागला . हळद लावणं , खोबरं थुंकणं , मुंडावळ्या बांधणं हा प्रकार मला स्वत : ला जंगलीपणाचा वाटायचा , तर जाधव ह्या प्रकारात तन्मयतेनं रस घ्यायचा . करवल्यांत एखाद्या कृष्णासारखा शोभायचा . त्याच्या लग्नात त्याची सारी तरुण मित्रमंडळी खांद्यावर रुमाल टाकून भगवानच्या स्टाइलनं नाचत आहेत , सोबत बॅन्ड आहे , हे न विसरता येणारं दृश्य . ‘ अंगणात फुलल्या जाईजुई , जवळी गणपती माझा नाही . ‘ ह्या गाण्याचं त्याच्या एका मित्रानं केलेलं विडंबन आणि श्रोत्यांच्या त्यानं मिळविलेल्या टाळ्या आठवतात . मित्र आपल्या दर्दभरी आवाजात गातोय ‘ अंगणात हगल्या गाईम्हशी – जवळी ग पती माझा नाही …

लग्न झाल्यावर जाधवची राहण्याची अडचण असते . ह्या महानगरीत सहज खोली मिळणं म्हणजे दिव्यच . तो कुलाब्याला राहायचा . तिथं एका बंगल्यात त्याची थोरली बहीण आया म्हणून कामाला . बड्या ऑफिसर मंडळींची ती अलीशान इमारत . सर्व्हट्स क्वार्टरमध्ये ही जोडी राही . रात्रीवेरात्री सईट्स क्वार्टरमध्ये पहारेकरी येऊन चेक करायचा . तिथं नातेवाइकांना राहण्याची परवानगी नव्हती . त्यामुळं पहारेकऱ्याला चिरीमिरी देणं हा प्रकार सतत करावा लागे . “ सालं , आपल्याला साहेबाची लिफ्ट वापरता येत नाही . मागच्या दरवाज्यानं चोरून – लपून यायला लागतं . ” असं सांगून तो एखादी सणसणीत शिवी हासडायचा .

इथं राहत असताना त्यानं एकदा कमालच केली . बहीण घरी नाही हे पाहून एका कामवाल्या मुलीच्या साह्यानं त्यानं एका खिश्चन मडमेचा पोशाख घरी मागून आणलेला . त्यानं आपल्या बायकोला स्कर्ट, उंच टाचेचे बूट घालायला भाग पाडलं. चांगला मेकअप करायला सांगितला आणि तिला समुद्रकाठी फिरावयास घेऊन गेला. साहेबासारखा कमरेला हात घालून तोंडात शीळ घुमवताना तो आम्हाला दिसला. आम्हाला पाहून बायको गोरीमोरी झाली. बहिणीला जेव्हा हे समजलं , तेव्हा तिनं खूप शिव्या दिल्या. असा हा जाधव मनात येईल तसं करणारा , पण मी मात्र बायकोला साधं गोल..

क्रमशः
स्रोत:(दया पवार यांच्या बलुतं या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading