बलुतं..
पण मी मात्र बायकोला साध गोल पातळ शेवटपर्यंत नेसवू शकलो नाही, ही खंत होतीच .
जाधव अलीकडे क्वचितच भेटतो . एकदा भेटला असताना दारूच्या खूपच आहारी गेलेला दिसला . त्याची आठवण खूपच तीव्रतेनं झाल्यामुळं मी त्याच्या ऑफिसवर गेलो . तो आता एका सरकारी खात्यात हेडक्लार्क आहे , खूपच नॉर्मल . समुद्राची भरती जावी आणि समुद्र खूप शांत दिसावा , तसा वाटला . त्याचं परिवर्तन पाहून मी खूपच चाट पडलेलो . सारखा अध्यात्माविषयी बोलत होता . बाकीची ब्राह्मण कारकून मंडळी आपल्याला ‘ पंडित ‘ म्हणून कसं संबोधतात , हे कौतुकानं सांगत होता . आपण एकदा पैजेवर हातात घेतलेल्या टाचण्यांचा आकडा कसा नेमका करेक्ट ठरला , आपल्याला दिव्य ज्ञान कसं प्राप्त होत चाललंय , याचं वर्णन तो करीत होता . उद्या ओढवणारी संकटं आज जरी माहीत झाली तरी करायचं काय , ह्या माझ्या प्रश्नाला तो उडवाउडवीची उत्तरं देतो . आरंभीच्या काळात भोगाकडे झुकलेला त्याच्या व्यक्तिमत्वाचा लंबक आता अध्यात्माकडे झुकला , हे पाहून मला गंमत वाटते आहे . एखादा आर.एस.एस.मधला तरुण अचानक मार्क्सवादी व्हावा , तसं त्याच्यातील परिवर्तन मला वाटत होतं . दारूच्या थेंबालाही आपण अलीकडे शिवत नाही , हे सांगताच तर माझ्या आश्चर्याला पारावार राहत नाही .
ज्या चळवळीत मी लहानाचा मोठा झालो , तिथं राजकारण आणि समाजकारण ह्यांच्या रेषा एकमेकीत गुंतलेल्या , जन्माला आल्यावरोबरच पार्टीचं कार्ड मिळे . सोशल फोर्सच एवढा होता , की तुम्हाला इच्छा असूनही वेगळी पार्टी निवडता येत नव्हती . ज्यांनी निवडली ते बहिष्कृत झाले . त्यांच्या प्रेतयात्रेलाही जात हजर राहिली नाही . विंचूरचे रणखांबे , बाबासाहेबांचं चरित्र लिहिणारे खैरमोडे व कॉ . मोरे ही ठळक उदाहरणे . गावी शिकत असताना एकदा निवडणुकीचं काम केल्याचं चांगलं स्मरणात आहे . शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि पी.एस.पी.चा निवडणूक करार होता . पी . एस . पी.चं झाड हे निशाण होतं . निवडणुकीच्या दिवशी बाकीच्या समाजवादी कार्यकर्त्यांबरोबर एका खेड्यात मी प्रचाराला गेलो होतो . अर्थात बोर्डिंगमधील प्रत्येक मुलाला वेगवेगळी गावं नेमून दिली होती . जेवायची वेळ झाली तेव्हा मला महारवाड्यात जेवायला पाठविलं गेलं . वाकीचे समाजवादी मित्र कुठं वरं जेवायला गेले असतील , ह्याचा शोध मी मनाशी घेत असतो .
तसा आमचा जिल्हा म्हणजे कम्युनिस्ट चळवळीचा बालेकिल्ला . गावाशेजारची काही गावं कम्युनिस्ट म्हणून ओळखली जायची . तेलंगणाच्या लढ्याच्या वेळी जिल्ह्यात साऱ्या कम्युनिस्ट पार्टीवर बॅन आलेला ; त्यांच्या बंदोबस्ताकरिता पोलिसांचा राखीव फोर्स उभा केलेला . ठायी ठायी त्यांचे कॅम्प . त्यांच्यावर जो खर्च व्हायचा , तो सारा जी गावं कम्युनिस्ट आहेत , त्यांच्यावर सामुदायिक दंड बसवून वसूल केला जात.
ब्राह्मणी संस्कृतीचीच तरफदारी केली . ह्यांच्या लग्नकार्याला ब्राह्मण लागायचा , यांचं पिंडदान ब्राह्मणाकडून पुरं केलं जायचं . गावातील जत्राखेत्रा , सत्यनारायण , श्रावण महिन्यातील पारायणं यामुळं यांची मानसिकता परंपरागतच होती . गावातील श्रीमंत माणूस समाजवादी असला काय किंवा कम्युनिस्ट असला काय , अस्पृश्यांच्या मजुरीच्या प्रश्नाकडे ते पूर्वीसारखंच मग्रुरीनं पाहत . गावातील परंपरागत कामं अस्पृश्यांनी नाकारली , म्हणून त्यांच्यावर पूर्वीसारखेच बहिष्कार पडत . त्यांची कमालीची नाकेबंदी होई . गावातील जत्रेची वर्गणी दिली नाही , पोळ्याचा बैल देवळापुढून आधी सजवून नेला , वाजंत्री वाजवावयास आले नाहीत , इत्यादी लहानसहान गोष्टींवरूनही रणकंदन होई . ह्या प्रश्नाकरता डाव्या पक्षानं एखादा मोर्चा काढल्याचा त्या वेळचा अनुभव नाही . एकीकडे महार समाज आपली जुनी परंपरा सोडतो आहे ; सापानं कात टाकावी तसा सळसळतो आहे , देवधर्म नाकारतो आहे आणि दुसरीकडे गावातील उत्पादनाच्या साधनांत त्यांचा कोणताच वाटा नाही . येसकर – पाळी गेली . बलुतं गेलं . नावावर असलेल्या टीचभर हाडकी हाडवळ्याच्या जमिनीही नाममात्र पैशासाठी श्रीमंत शेतकऱ्यांकडे गहाण पडल्या आहेत . त्यामुळे महारवाडा ओस पडत चाललाय . पोटाची खळगी भरण्याकरता ते शहराची वाट धरत आहेत , उसाच्या कारखान्यावर मळी वाहत आहेत , हे गावोगावचं दृश्य .
त्या वेळी जिल्ह्यात एक वाद चांगलाच रंगलेला आठवतोय . महारांची परंपरागत हाडकी हाडवळ्याची जमीन उसाच्या कारखान्यासाठी ९९ वर्षांच्या करारानं श्रीमंत शेतकऱ्यांनी नाममात्र खंड देऊन अडकवून ठेवलेली . ही जमीन परत मिळावी म्हणून दादासाहेब , राम पवार , इत्यादी मंडळी जिल्ह्यात आंदोलनं करीत आहेत , हे दृश्य . सदर जमिनीची श्रीमंत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं डागडुजी केली . ती पुन्हा मजुरांना दिली , तर ते तिची हेळसांड करतील . महार मंडळीनी कधी शेती केलीय काय ? – हा त्यांचा अभिप्राय ! पुढं हे आंदोलन वाळूत पाणी मुरावं तसं जागच्या जागीच का बरं जिरलं , हे कळण्यास आज मार्ग नाही .
बाबासाहेब जिवंत होते , तोपर्यंत ह्या राजकारणाला एक जिवंत धग होती . तप्त ज्वालामुखीसारखा हा समाज खदखदत होता . वतनं झुगारण्याचं आंदोलन गावोगाव पेटत होतं . “ महारकी म्हणजे गुलामगिरी . ही कामं आम्ही करणार नाही ” असं स्वाभिमानाचं वारं महार मंडळीत सळसळत होतं . खडकालाही भिडण्याची धमक ह्या चळवळीत होती . पण बाबासाहेबांचं निर्वाण झालं . एकखांबी तंबू तसा झंजावाती वाऱ्यानं सैरभैर व्हावा , तशी चळवळीची शोकांतिका होऊ लागली . ” दुसऱ्याच्या महालाला भुलू नका , आपली झोपडी टिकवा ” हा बाबासाहेबांचा आदेश वाऱ्यावर विरू लागला . गुळाला माशी चिकटते तसे हे सत्तेला चिकटू लागले . काँग्रेस – रिपब्लिकन युतीनं तर ही चळवळ स्लो पॉयझनिंगसारखी खतम केली .
बाबासाहेबांना तसं मी खूप लहान असताना पाहिलेलं . पण आठवत नसतं . बोर्डिंगमध्ये असताना बातमी येते , की बाबासाहेब नासिक येथे येणार आहेत . तेथे त्यांची जाहीर सभा असते . बातमी ऐकताच अंगावर रोमांच पसरतात . बाबासाहेबांचे शब्द एकदा तरी आयुष्यात ऐकावेत , ही ऊर्मी बळावते . काही मुलं नासिकला सायकलवरून निघतात . मीही तयारी करतो . तसं लांबवर सायकल हाकण्याचा सराव असतोच . ४०-५० मैलांचा परिसर आम्ही दुपारपर्यंत सहज काटतो . संध्याकाळी थांबावं कुठं , हा प्रश्न पडतो . किस्मत बागेत दादासाहेब गायकवाड यांचं , मुलींचं वसतिगृह असतं . आम्ही बिचकतच तिथं जातो . गायकवाड यांना ह्यापूर्वी केव्हाच पाहिलेलं नसतं . डोक्यावर निळी टोपी , धोतर , कोल्हापुरी वहाणा , अंगात जाडजूड कोट ह्या पेहरावालच ते आम्हाला दिसतात . नुकतेच सायकलवरून बाहेरून आलेले असतात . आम्ही बोर्डिंगची मुलं म्हणून त्यांना कोण कौतुक ? आम्हाला आग्रहानं खाऊपिऊ घालतात . बोर्डिंगच्या मुली चोरून – लपून आम्हाला पाहत असतात . दादासाहेबांचं त्या वेळचं दर्शन हे कधीही न विसरता येणारं , स्वत : झाडू मारत आहेत . आम्हाला वसायला अंथरूण घालतात , मुलींना जेवण वाढण्यास मदत करतात , असा हा प्रकार . एवढा मोठा पार्टीचा पुढारी आम्हा पोरासोरांशी एवढ्या सौजन्यानं वागतो आहे , हा आम्हाला गोड धक्का .
रात्री बाबासाहेब नासिकमध्ये येऊनही सभेला येऊ शकत नाहीत . सभेच्या ठिकाणी माणसं मुंग्यांसारखी जमा झालेली . स्टेजवर काही बडी पुढारी मंडळी , शांताबाई दाणी माइकवरून लोकांना सूचना देत असतात . ” बाबासाहेबांची तव्येत एकाएकी बिघडल्यामुळं आज ते सभेला येऊ शकणार नाहीत . ” ते कुठं उतरलेत , याचाही खुलासा करतात . आम्ही मुलं खूपच निराश होता . बाबासाहेबांचा आवाज , त्यांची ओजस्वी वाणी . नाखालाखांना गुलामगिरीच्या खातेऱ्यातून बाहेर काढणारी ही वाणी कानांत साचवावी , तिचा प्रतिध्वनी आयुष्यभर मनात वागवावा , ह्या तळमळीनं एवढा लांबचा पल्ला तोडून आलो होतो . पाण्यात ढेकूळ विरावं तशी मनाची अवस्था झाली . सायकल हाकून थकलेल्या पोटऱ्या आताशी कुठं दुखू लागल्या . आलोच आहोत तर उद्या सकाळी बाबासाहेबांना पाहून तरी जावं , असं मनोमन वाटलं . आम्ही मुलं पुन्हा मुलींच्या वसतिगृहात आलो . एका वळचणीला रात्र काढली .
ज्या बंगल्यात बाबासाहेब उतरले होते, त्याच्या आसपास आम्ही सकाळी रेंगाळत होतो. तितक्यात एकानं बंगल्याच्या पुढील पटांगणातल्या लॉनवर खुर्ची टाकून बसलेले बाबासाहेब पाहिले . आम्हाला त्यानं खुणावताच आम्ही त्या दिशेनं गेलो. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाबासाहेब बसलेले . महार जातीत जन्माला येणारा माणूस एवढा तेजस्वी असू शकतो , ह्यावर माझा तरी विश्वास बसेना . खूपच उजळ व्यक्तिमत्व,..
क्रमशः
(स्रोत:बलुतं..या दया पवारांच्या पुस्तकातुन)
