बलुतं..दया पवार..(भाग ४३)..

बलुतं..

भव्य कपाळ , खरं म्हणजे ते पूर्ण सुटातच होते . त्यांच्या डोक्यावर हॅट होती . रात्री आलेल्या मंडळींना दर्शन घेता यावं , म्हणून ते तिथं बसलेले असावेत . त्यांचा चेहरा मात्र आजारपणामुळं खूपच मलूल झाला होता . त्यांना पायाचा आजार होता . चालतानाही त्यांना सोबत असलेल्या माणसाची मदत घ्यावी लागते .

पुढं मुंबईला आल्यावर एकदा कुलाब्याच्या बाजूला फिरत असताना बाबासाहेब हळुहळू काठीच्या आधारानं एका इमारतीचा जिना उतरत आहेत , सोबत माईसाहेब आहेत , हे दृश्य पाहिलेलं . आम्ही मुलं एक महान आश्चर्य पाहावं तसं बाबासाहेबांना पाहत असतो . ह्या दरम्यान कावाखान्यातील चंदर एका कार्यकर्त्याबरोबर त्यांच्या राहत्या घरी गेलेला . त्या काळी कामाठीपुऱ्यात कुणी तरी भेगूभाई आणि कंपनी ह्या नावाची बोगस सिनेमा कंपनी काढलेली . हीरो किंवा साईड हीरो होण्यासाठी तरुणांनी रांग लावून पैसे भरलेले . कामाठीपुऱ्यातील पार्टीच्या ऑफिसातच हा प्रकार घडलेला . पुढं ही कंपनी एकाएकी गायब झाली . भरलेले पैसे पाण्यात गेले . ह्या लोकांचं गार्हाणं घेऊन हा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या घरी गेलेला . लोक पार्टी ऑफिसात पैसे भरत आहेत , असा देखावा असलेला फोटोही सोबत घेऊन तो गेलेला . चंदरच्या सांगण्यावरून कळलं , की बाबासाहेब खूप भडकले . पार्टीच्या लोकांना त्यांनी शिव्याच घातल्या . पण त्याबरोबर त्या कार्यकर्त्यालाही त्यानी फैलावर घेतलं . कार्यकर्ता मराठवाड्याचा होता . बाबासाहेब म्हणाले , ” अरे , तू शहरात हे काम करतोस ? तुला कामच करायचं , तर मराठवाड्यात जा . तिथं आपल्या लोकांचे किती हाल होत आहेत . तुझ्या हुशारीचं इथं चीज काय ? ” बाबासाहेब नेहमी म्हणत , की “ मी शहरातल्या मंडळींसाठी बरंच काही केलं . पण खेड्यातील माझा समाज आजही हालअपेष्टांत दिवस काढतो आहे . ” हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरारत असे .

बाबासाहेबांचं पुन्हा शेवटचं दर्शन झालं ते निर्वाणाच्या वेळी . नेहमीसारखाच सकाळी मी कामाला निघालेलो . वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर बातमी वाचली . धरणी दुभंग व्हावी , तसं वाटलं . घरातील माणसाचं निधन व्हावं , तसा गलबलून गेलो . घराच्या चौकटीला धरून रडू लागलो . आईला , बायकोला कळेना , की मी पेपर पाहताच का असा रडतोय म्हणून . घरातील मंडळींना सांगतांच सारं घरच रडायला लागलं . बाहेर येऊन बघतो , तो लोक जथ्यानं चर्चा करीत आहेत . बाबासाहेबांचं निधन दिल्लीला झालेलं असतं . संध्याकाळपर्यंत त्यांचं शव विमानानं येणार असतं . नोकरीला लागून दोन – तीन महिन्यांचा काळ गेलेला . रजा काढण्याकरता व्हेटरनरी कॉलेजात गेलो . अर्जातील कारण पाहताच साहेब भडकले . म्हणाले , ” अरे , रजेच्या अर्जात असं कारण कशाला लिहिलंस ? आंबेडकर हे राजकीय पुढारी आहेत आणि तू एक सरकारी नोकर , काहीतरी प्रायव्हेट कारण लिही . ” तसा मी स्वभावाने खूपच शांत . पण त्या दिवशी त्या अर्जातील कारण बदललं नाही , एवढं निश्चित . साहेबांना उलट सांगितलं की , “ साहेब , ते आमच्या घरातीलच एक होते . कुठल्या अंधाराच्या गुहेतून त्यांनी आम्हाला बाहेर काढलंय , याची तुम्हाला कल्पना कशी येणार ? ” आपल्या नोकरीचं काय होणार , रजा पास केली की नाही , याची मुळीच काळजी न करता मी राजगृहाकडे धावलो . पाण्याचा लोंढा सारखा वाहात राहावा तसे लोक राजगृहाच्या पुढील मैदानात जमत होते . जाताना तिकीट खरेदी करावं , याचंही भान त्यावेळी त्यांना नव्हतं .

रात्रभर आम्ही घरी आलो नाही . राजगृहाच्या पुढील गवतावरच अंग टाकलं . सकाळी पाहतो तरी एखाद्या महासागराच्या लाटेसारखा लोकांचा लोंढा येतच असतो . सर्वांना रांगेनं दर्शन मिळणार असतं . एक – दोन तास रांगेत थांबून बाबांचं दर्शन झालं . झोपलेल्या अवस्थेत दिसावे तसे ते शांतपणे पहुडले होते . त्यांच्या नाकात कापसाचे बोळे घातलेले . त्यांच्या पायांवर लोक पान – फुलं वाहत होते .

दुपारी त्यांची शवयात्रा निघाली . वर सूर्य आग ओकीत होता आणि आम्ही भारावलेल्या अंत : करणानं शवयात्रेत मुंगीच्या गतीनं पुढं सरकत होतो . एका उंच पुलावरून गर्दीचा मागचा – पुढचा अंदाज घेतला . वारूळ फुटावं , तसे लोक . नजर ठरत नव्हती . लोकमान्य टिळकांच्या शवयात्रेला एवढी माणसं जमली होती , असं लोक सांगतात . पण त्या दिवशी लोकांच्या हेलावत्या भावनांचं जे दर्शन घडलं , ते कधीच विसरता येणार नाही . अनेक स्त्रिया – पुरुष दुःखाच्या आकांतानं आपलं ऊर पिटीत होते . तर काहींच्या डोळ्यांतून अश्रू आवरत नव्हते .

१९५६ सालात नागपूर इथं बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली . ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाला मी जाऊ शकलेलो नसतो . परंतु ह्या क्रांतिकारक बदलाची चाहूल घराघरात पोहोचली होती . अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील भिंतींवर असलेल्या देवादिकांच्या तसबिरी फोडल्या . देव्हाऱ्यावरचे देव कवड्या – गोट्यांसारखे भिरकावले . जत्राखेत्रा – मरीआई – म्हसोबा – खंडोबा ह्या परंपरागत देवांकडे पाठ फिरवली . त्यांनी बोकड – कोंबडं कापण्याचं थांबवलं . आमच्या घरी तसा नाममात्र देव्हारा होताच . चांदीचे खंडोबा – बहिरोबाचे टाक आईनं लहानपणी खास तयार करून घेतले होते . ते केवळ चांदीचे असल्यामुळं आईनं कुठं तरी चिंदकात बांधून ठेवले . आजही जेव्हा कधी मी अडगळीचं सामान उस्तरीत असतो , तेव्हा ते मला दिसतात . ह्या देवाच्या चांदीचं काय करावयाचं , हे मला समजू शकत नाही . त्यांना आता कुणी आमच्या घरात आंघोळ घालीत नाही किंवा त्यांची पूजाही करीत नाहीत . बाबासाहेबांनी दीक्षा देताना , “ मी हिंदू धर्मांचे ब्रह्मा , विष्णू , महेश आणि त्यांचे लटांबर तेहतीस कोट देव पुजणार नाही . ” ही दिलेली शपथ , तशी कळू लागल्यापासून रक्तात भिनलेलं . मुंबईत दीक्षेच्या वेळी स्त्रियांना पांढरी पातळं लागत . त्या काळी व्यापारांनी खूपच धंदा केला . पांढऱ्या साड्या म्हणून पुरुषांची धोतरं विकली गेली . दामदुप्पट किंमत देऊन आई आणि बायकोला पांढऱ्या साड्या उधारीनं विकत घेतल्याचं आठवतं .

धर्माचंही कसं कर्मकांड होऊ शकतं , याची आठवण इथं येते . कुलाब्याला अशाच एका साखरपुड्याला गेलेलो . मुलगी कोकणस्थ आणि नवरा देशस्थ . साखरपुड्याला कोकणस्थ मंडळी ‘ बोलघडा ‘ म्हणत . कोकणस्थ पंचायत हे तसं बर्ड प्रस्थ . पंचायतीची पावती असल्याशिवाय तुमचं लग्न लागणं शक्य नाही . ह्या पावतीसाठी पंचायतीच्या सभासदांना चिरीमिरी दिली जायची . दारूही पाजावी लागते . देशस्थ – कोकणस्थ विवाह क्वचितच होत . देशस्थांना पंचायतीचं सभासद व्हावं लागे . बौद्धाचार्य वेगळे . देशस्थांना यांची लग्नं लावण्याची परवानगी नसे . दोन्ही बाजूंकडून सभासदांच्या पावत्या पाहिल्या जात . देशस्थ मंडळींनी नवऱ्या मुलीसाठी रंगीत साडी आणलेली असते . साडी तशी भारी किमतीची असते . झालं , साडी पाहून कोकणस्थ मंडळी भडकतात . बोलघडा करण्यास राजी होत नाहीत . मीही भाषण करतो ; मिस्किलपणे बोलतो . एका नवरदेवाने काळे बूट घातले म्हणून लग्नात कसा अडथळा आणला गेला , ही सत्य घटना सांगतो . ” -तेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच . ” माझंही ऐकण्याच्या मन : स्थितीत मंडळी नाहीत . मला ठाकरांची आठवण येते . ” व्हते चारीही आणे.- ” बंदा रुपया दिला , तरी न घेणारे .

रात्रीची वेळ . भोवतालच्या दुकानात धावाधाव होते . पांढरी साडी कुठंच मिळत नाही . शेवटी धोतर आणलं जातं . मुलीला धोतर नेसवून बोलघड्याला आणलं जातं . त्या रात्री हसावं की रडावं कळत नाही .

ह्या प्रसंगाला काटशह देईल , असा वेगळा प्रकार पाहायला मिळाला . एका लग्नात वरानं डोक्यावर गांधीटोपी घातलेली . ” डोक्यावरची गांधीटोपी काढा ” हा कार्यकर्त्यांचा फोर्स . त्याचं म्हणणं , की ” तुम्हाला पांढरा रंग हवा ना ? ” “

पण ही टोपी पांढरी असली , तरी काँग्रेसची . तेव्हा ताबडतोब काढा . कार्यकर्त्यांचा आग्रह . अखेर वराला या हट्टापुढे मान तुकवावी लागते .

ह्या संदर्भात एका विनोद ( अर्थात सत्य घडलेला ) नेहमी ऐकायला मिळायचा . ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुली हौसेनं पांढऱ्या साड्या नेसून जात . पण पांढरी साडी नेसलेली मुलगी ही पूर्वाश्रमीची महार आणि आताची बौद्ध आहे , ही जेव्हा खूण म्हणून ओळखली जाऊ लागली , तेव्हा सवर्ण मुली पांढऱ्या साड्या वापरण्याचे कटाक्षानं टाळू लागल्या . ह्या प्रकारची खूपच गंमत वाटते . माणसाला जात ही कशी गोचडीसारखी चिकटलीय ! ती कितीही झाडा , तुमचं कातडीचं रक्त शोषल्याशिवाय ती निघू शकत नाही .

” हिंदू धर्म सोडून तुम्ही बौद्ध धर्म घेतला , तरी तुमची उडी ही शेवटी कुंपणातच पडली ” असं सावरकरांनी म्हणायचं आणि हिंदुभक्तांनी म्हणायचं की ” तुम्ही बौद्ध झालात , तरी शेवटी महारच . ” महार म्हणून ओळखण्याकरिता सरकार – दरबारी त्यांचं नाव नवबौद्ध असं घोषित केलं गेलं. एखादा हिंदू जेव्हा ख्रिश्चन किंवा मुसलमान होतो , तेव्हा त्याच्या वाट्याला हे ‘ नव ‘ असं विशेषण का बरं लागत नसावं ?

बाबासाहेबांनी देशाला उद्देशून एक ओपन लेटर ‘ लिहिलेलं . त्यात सत्तेला प्रतिस्पर्धी असा एकमेव विरोधी पक्ष असावा , ही कल्पना मांडलेली होती . शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून नव्या लोकशाही पायावर रिपब्लिकन पक्ष उभा राहावा , ही त्यांची तीव्र इच्छा होती . त्या अनुषंगानं पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला . ह्या पक्षाची धुरा वाहण्याकरिता त्यांनी प्रिसीडिअम स्थापन केलं. सामुदायिक नेतृत्वाची कल्पना त्यापाठीमागे होती. प्रिसीडिअमच्या पुढाऱ्यांत लवकरच बेबनाव झाला. बाबासाहेबांच्या पायाशी घेतलेल्या शपथेची अशी वाट लागली . ३ ऑक्टोबरचा मुद्दा घटनात्मक पेचप्रसंग म्हणून वापरण्यात आला . दुरुस्त आणि नादुरुस्त अशा दोन ठळक फळ्या पडल्या .

३ ऑक्टोबरच्या आत घटना लिहिली जावी ; पण ह्या घटनेवर नाव कुणाचं असावं ह्या वादात घटना अडकली. दुरुस्तांत सारी वकील मंडळी . नादुरुस्तांचे पुढारी दादासाहेब गायकवाड . पाटलोणवाले विरुद्ध धोतरं असा हा सरळ झगडा उभा राहिला . कागदाला कोण हुंगतंय , असं म्हणून दादासाहेब गायकवाड यांनी ह्या घटनाकारांची जाहीर टवाळी केली , तर याचं समर्थन करण्याकरिता माझ्या जिल्ह्याचे दादासाहेब यांनी जिवाचं रान केलं . पक्षाचा कलगी – तुरा कमालीचा रंगला . दादासाहेब हे माझ्या जिल्ह्याचे . त्यामुळे आपोआप मी दुरुस्तात काम करू लागलो . पक्षाच्या फळ्या बऱ्याचशा जिल्ह्यावार पडलेल्या . जिल्ह्याच्या राजकारणाला नको तेवढं महत्त्व आलं . पश्चिम महाराष्ट्रात असे जिल्हावार गट पडलेले , तर विदर्भात महार जातीच्या पोटभागावर आधारित गट पडलेले . बावणे , लाडवन आणि कोसरे ह्या विदर्भात पोटजाती , तर पश्चिम महाराष्ट्रात सोमवंशीय .

आवळे बाबूजी हे दुरुस्तांचे एक आधारस्तंभ . त्यांच्या बाजूला विदर्भातील त्यांच्या पोटजातींतील तेवढीच माणसं मागं उभी राहिली . याउलट खोब्रागडे यांची पोटजात मोठी . त्यामुळे त्यांचं बळ जास्त . महार मंडळी सोडून बाकीच्या अल्पसंख्य भूमिहीन शेतमजुरांना रिपब्लिकन पार्टीतील कोणताच गट आकर्षित करू शकला नाही . एकंदरीत दुकान तेच , पण पाटी बदलली . त्यातही पार्टीच्या दोन फळ्या . ही अवस्था…

क्रमशः
(स्रोत: बलुतं या दया पवारांच्या पुस्तकातून)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading