दिनांक २६ जुलै,बेल्हे/श्रीगोंदा:
पैसा हा मानवाचे सर्वस्व झाला असतांना अशा काळातही अजित वाघमारे आणि संग्राम कांडेकर या दोन तरुणांना सापडलेले ५० हजार रूपये परत दिल्याने त्यांच्या प्रमाणिकपनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सविस्तर बातमी अशी की, तालुक्यातील देवदैठण येथील अजित काशीनाथ वाघमारे हे नारायणगाव येथील अहमदनगर जिल्हा बँकेत लिपीक म्हणून कार्यरत आहे. तर संग्राम प्रकाश कांडेकर हे दूध डेअरीचे अध्यक्ष आहे. हे दोघे गुरुवारी नारायणगव्हाण गावांवरून वाडेगव्हाण कडे कामानिमित्ताने चालले होते.दरम्यान नगर-पुणे महामार्गावर त्यांना एक पिशवी पडलेली दिसली.
थांबून त्यात पाहिले असता ५० हजार रुपयांची रक्कम आढळली.त्यासोबत महाराष्ट्र बँकेचे पासबुक आणि काही गोळ्या/औषध होती. याविषयी चौकशी केली असता, शांताबाई अलभर यांची ती पिशवी असल्याचे समजले. नमूद पैसे महाराष्ट्र बँकेतून काढले होते. शिरूर येथे स्वतःच्या ऑपरेशन करता त्या जावया सोबत चालल्या होत्या. गडबडीत त्यांची पैशाची पिशवी पडली.ही घटना दिनांक २५ जुलै रोजी घडली.
सदर घटनेची माहिती अजित वाघमारे व संग्राम कांडेकर यांनी नारायण गव्हाण येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके आणि बबनराव फुले यांना सांगितले. त्यांच्या माध्यमातून संपर्क साधला आणि ही रक्कम शांताबाई यांना सहीसलामत परत करण्यात आली.त्यामुळे या दोन तरूणांच्या प्रामाणिकपणाचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहेत.
स्रोत:(सामाजिक माध्यम)
