बलुतं..
चांगला – वाईट समजण्याचं ते वय नव्हतं . एखाद्या लाटेत केरकचरा सापडावा आणि तो वाहत जावा , अशी माझी अवस्था . पुढारी बोलतील ते कवितेत उतरविण हा छंद लागला . शेक्सपिअरनं हे चित्र – आणि ते चित्र ‘ असं हॅम्लेटच्या तोंडातून वदविलं . तसं मी कवितेत दुरुस्तांचं उदात्तीकरण सुरू केलं . नादुरुस्तांची बाजू जादा काळी कशी दिसेल , याचं कवितेत चित्रण झालं . पार्टीकडून पेपर चालवला जायचा . त्यात ह्या आशयाच्या अनेक कविता मी पाडल्या .
रिपब्लिकन पुढाऱ्यांचं जे जवळून दर्शन होत होतं , ते काही समाधानकारक नव्हतं . ह्यातली बरीचशी पुढारी मंडळी बाबासाहेबांची सहीसही नक्कल करीत . बाबासाहेब कुत्रं पाळीत , तर हेही घरात कुत्रं पाळीत . बाबासाहेब उंची पेन बाळगीत , हेही असंच करीत . सूट वापरण्याचं खूपच प्रस्थ होतं . एखाद्याच्या शोकसभेला किंवा प्रेतयात्रेलाही ही पुढारी मंडळी सुटात येत , तेव्हा त्यांचा उबग यायचा . खेड्यापाड्यातील जनता रस्त्यावरच्या धुळीत पत्रावळीवर लापशी जेवते आणि पुढारी घरात कोंबड्या , दारू चापतात , ही विसंगती खूपच खटकायची . अर्थात , पुढाऱ्यांचे हे जे लाड चालत , ते लोकांच्या वर्गणीवरच .
एकदा एका नादुरुस्त पुढाऱ्याच्या सभेला गेलेलो . भाषण झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारण्याचं आवाहन श्रोत्यांना केलेलं . दबा धरून बसलेला माझा मिस्किलपणा उचंबळून आलेला . मी त्यांना प्रश्न विचारला , ” लोक म्हणतात , की फोर्टमधील बाबासाहेबांचा पुतळा हा तुमच्यासारखा दिसतो म्हणून ! ” खरं म्हणजे प्रश्नातील खोच त्यांना कळायला हवी होती . ते खूपच भडकले . सांगू लागले , ” बाबासाहेबांसारखं माझ नाक आहे म्हणून ते कापून टाकू काय , किंवा त्यांची उंची आणि माझी उंची सारखी आहे , तर मी ती कमी करू काय ? ” साहेबांच्या ह्या उत्तरानं सभेची त्या दिवशी खूपच करमणूक झाली .
दुरुस्त पार्टीचे असेच एक पुढारी होते . ‘ घटना पंडित ‘ म्हणून त्यांचा भोवताली खूप बोलबाला . दुरुस्तांचे सारे पुढारी यांची जाहीर तारीफ करीत . ‘ भारताचे केनेडी ‘ म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा . संयुक्त महाराष्ट्राचे ते दिवस . दगडाला शेंदूर लावला तरी तो निवडून येईल , अशी अवस्था . साहेब निवडून आले तेव्हापासून त्यांचा रुबाब जास्तच वधारलेला . त्या वेळी आम्ही संध्याकाळी भाटिया बागेत जमत असू . साहेबांबरोबर आपलाही फोटो निघावा , ही कार्यकर्त्यांना तळमळ लागलेली . साहेब एकदाचे फोटोला तयार होतात . फोर्टमध्येच एका फोटोवाल्याकडे आम्ही सारे चाललेलो . साहेबांना एकाएकी मुंगी डसल्यासारखं होतं . ते कडाडतात , “ एक तर तुम्ही पुढं चला , किंवा मला पुढं जाऊ द्या . ” अनुयायांचा खूपच हिरमोड होतो . अनुयायांनी – तेही फाटक्या तुटक्या पेहेरावातील- आपल्यावरोबर चालावं हे तर साहेबांना खटकत नसावं ? हे साहेब तसे खूपच कडक . कुणाशीही बोलताना तोऱ्यात बोलत . कुणी चुकूनच घरी गेलं , तर दरवाज्यातूनच हाकलून लावीत . कुणी जाण्याचं धाडस केलंच , तर त्यांना वकिली डावपेचाचे अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत .
असाच मी अलिकडे ह्या साहेबांकडे घरी गेलेलो . सोबत एक मोठे दलित लेखक होते . गेल्याबरोबर साहेबांनी आमचा जिल्हा विचारला . अर्थात , जिल्हा विचारण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही कोणत्या गटातील , हे साहेबांना शोधून काढायचं असतं . चर्चा चालू असतानाच दलित लेखक मित्राच्या तोंडातून ‘ समाज ‘ हा शब्द निघाला . ह्यावर थोडं थांबून एकदम ते आम्हाला विचारतात , की ” सांगा वर , समाजाची व्याख्या काय म्हणून ? ” लेखक सांगत असतो , ” समाजाची अनेक प्रकारे व्याख्या होऊ शकते . डॉक्टर , इंजिनीअर वेगळी व्याख्या करतील . पुढारी मंडळी निराळी करतील आणि लेखक वेगळ्या पद्धतीनं समाजाची व्याख्या करतील ! ” ह्यावर साहेब वैतागले . म्हणाले , “ समाजाच्या अशा अनेक व्याख्या असतात , असं सांगणारे तुम्हीच आजवर मला भेटलात ! ” असे हे साहेब .
कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचं यांना काहीच कळत नसावं . हवं तेव्हा कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावर हे कढोर टीका करतील ; पण निवडणूक आली , की मग मुस्लिम लीग किंवा कम्युनिस्ट असं कुणीही यांना चाले.
दुरुस्तवाल्यांचे तत्त्वज्ञानाच्या संदर्भात हे एकमेव म्होरके . संसदीय लोकशाहीचं यांना असंच भरतं यायचं , “ मोर्चा म्हणू नका , ‘ पिटिशन ‘ म्हणा . अमूक साली इंग्लंडमध्ये लोकांनी पार्लमेंटवर नेलं , ते पिटिशन होतं . मोर्चा नव्हता . संयुक्त महाराष्ट्राच्या राजकारणात कम्युनिस्ट मंडळी पॉवरफुल आहेत . आपण त्यांच्यात राहिलो तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञान फोफावेल , असा आक्रमक मुद्दा घेऊन मंडळी संयुक्त महाराष्ट्र समितीतून बाहेर पडली . ” देशादेशांतून कम्युनिस्टांचे रोपटे आम्ही उखडून टाकू ” साहेबांच्या या विधानाला हेडलाइन मिळालेल्या . ह्या वेळी दादासाहेब गायकवाड जाहीरपणे म्हणाले होते , की ” मी हाडाचा कम्युनिस्ट आहे . आम्ही कचासारखे कम्युनिस्टांच्या पोटातून बाहेर पडू . ” ह्या एका वाक्यामुळं दलितांच्या , बौद्धांच्या राजकारणात किती रण माजलेलं . दादासाहेब गायकवाड हे कम्युनिस्ट आहेत , ही ओरड काल – परवापर्यंत केली जात होती .
” दादासाहेबांनी भूमिहीनांचा देशव्यापी सत्याग्रह केला , तेव्हा दुरुस्त मंडळींनी त्यांची खूपच चेष्टा केली . अर्थात , ही चेष्टा मलाही आवडत होती . पण हळुहळू ह्या सत्याग्रहाला अभूतपूर्व असं यश मिळालं होतं . तुरुंगभरतीचं राजकारण म्हणजे काय असतं , याचा वेगळा साक्षात्कार होत होता . ह्या लढ्यात केवळ बौद्ध मंडळी नव्हती , तर तळागाळाचा सारा थर जमिनीच्या प्रश्नावर एकत्रित होत होता . दुरुस्तांची सुरुवातीची टवाळी त्यांनाच नडली . पुढाऱ्यांत मतभेद असतानासुद्धा दादासाहेबांनी नगर जिल्ह्यात सत्याग्रह केला . ह्या सत्याग्रहाच्या अनेक गमतीदार बातम्या कळत होत्या . सोलापूरच्या काही मंडळींनी अचानक कलेक्टरच्या घराचा ताबा घेतला होता . कलेक्टरांच्या पलंगावर जाऊन झोपायचं स्वप्न एका स्वयंसेवकानं खरं करून दाखवलं होतं . त्याबद्दल झाली ती सजा त्यानं आनंदानं स्वीकारली होती.
दुरुस्त पुढारी मंडळी आकर्षक घोषणा देण्यात तशी खूपच पटाईत . ‘ पार्टीचे हत्ती हे निवडणुकीचे चिन्ह परत आणणे ‘ ही अशीच एक आकर्षक घोषणा . ” देशातील सारी बौद्धलेणी ही आमच्या मालकीची करावीत . सारा भारत बौद्धमय करावा . ” अशा स्फूर्तिदायक भाषणांनी ही मंडळी सभा गाजवीत . दर ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या निधनाचा गुप्त अहवाल सरकारने जाहीर करावा , ही अशीच एक थ्रिल घोषणा . बाबासाहेबांचा मृत्यू हा संशयास्पद झाला आहे , त्यात नादुरुस्तांचे काही मान्यवर पुढारी आणि त्यांची ब्राह्मण पत्नी ह्यांचा हात आहे , असं व्हिस्परिंग पॉलिटिक्स करून साऱ्या समाजात संतापाची चीड निर्माण करीत . बाबासाहेबांचं त्यांना शोभेल असं तोलामोलाचं स्मारक उभारावं , त्यांच्या नावानं अलीगड किंवा हिंदू युनिव्हर्सिटीसारखी युनव्हर्सिटी उभारावी , डॉ . आंबेडकर अध्ययन केंद्र काढावं , अशा कल्पना सातत्यानं जाहीर सभेत मांडत . ह्याकरता बँकेत रांगा लावून लोकांनी पैसे भरावेत , हे आवाहन लोकांना मन : पूर्वक आवडले . आजवर पुढाऱ्यांच्या हाती दिलेला पैसा गिळंकृत होतो , ह्या अनुभवामुळं ही कल्पना त्यांना रास्त वाटली . सात – आठ दिवसांत उत्स्फूर्तपणे ६२ हजारांपर्यंत आकडा गेला . पुढाऱ्यांचाही ह्या आकड्यावर विश्वास बसेना . समाजातील इतर फंडाचं जे शेवटी झालं , तेच ह्याही फंडाचं झालं . पुढाऱ्यांत बेबनाव झाला . सारी रक्कम फ्रीज झाली . चैत्यभूमीवरील स्तूपावर मार्बल बसण्याची कल्पना नादुरुस्त मंडळींनी अशीच पॉप्युलर केली . लोकांनी , म्हणतात , पैशाचा पाऊस पाडला . पण शेवटपर्यंत मार्वल बसवला गेला नाही . हे सारे पैसे पुढे पाऱ्यासारखे उडून गेले . त्याचा हिशोब समाजाला कधीच मिळाला नाही . कनिष्ठ गाव – कामगारांनीही साऱ्या महाराष्ट्रातून प्रत्येक गावापाठीमागे मनीऑर्डरी केलेल्या . महार वतन नाहीसे झाले , पण तो सारा पैसा आज बँकेत कुजत आहे . समाजाच्या विधायक कामाकरता हा पैसा खर्च होऊ शकला नाही.
हळुहळू समाजात उदासीनता येत चाललेली . साऱ्या चळवळी चुलीसारख्या थंडगार होऊ लागल्या . राजकारणाचं सावट समाजातील सांस्कृतिक , सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांवरही पडत गेलं . एवढंच काय , लग्नविधी , मरणोत्तर प्रेतयात्रा ह्यांतही ह्या गटबाजीचा प्रभाव दिसू लागला . कोणताही का सामान्य माणूस मेला असेना , स्मशानात त्याच्या गुणगौरवपर बोलणं ही प्रथा . ह्या सभेत बोलणं हा वॉर्डातील कार्यकर्त्यांना मानसन्मान वाटे . त्या वेळी ज्या गटाचं प्रेत असेल , त्यांनाच सभेत बोलण्याचा मान मिळत असे , अध्यक्ष त्या गटाचा . दुसऱ्या गटाला कटवलं जायचं . “ आम्ही आमच्या गटाचा कुणी मेला म्हणजे याचा वचपा काढू ” असं दुसरा गटही घरी जाता जाता ठणकावून सांगायचा .
एकदा असाच जिल्ह्याच्या ठिकाणी मी सभेला गेलेलो . संध्याकाळी जाहीर सभा असते . दुपारी पुढाऱ्यांसमवेत कार्यकर्त्यांचा मेळावा होता . एका हॉलमध्ये काही पुढारी मंडळी राजकीय चर्चा करीत असतात . मी मोठ्या भक्तिभावात भाष्य श्रवण करीत असतो . बहुधा जेवणाची वेळ झाली असावी . जेवताना मला कसं कटवावं ह्याचा विचार तेथील सभेचे सूत्र – संचालक करीत असतात , त्यांनी मला जवळ बोलावलं आणि “ ह्या वेळी मुंबईहून एक मान्यवर पुढारी एस.टी.नं येणार आहेत , त्यांना उतरून घ्यावयास जा ‘ असं कानात सांगितलं . मी खूपच गोंधळलेलो . एक तर हे काम स्थानिक कार्यकर्त्यालाच सांगायला हवं होतं . मान्यवर पुढाऱ्याला तशी सर्व मंडळी ओळखत असतात . मी बाहेर पडतो . आपल्याला जेवायच्या पंगतीला बसवायच नाही , म्हणून निश्चितच आपल्याला कटविण्याकरिता हा प्रयोग केला , याची मनोमन खात्री पटते . एखाद्या मारलेल्या पक्ष्यासारखी माझी मानसिक अवस्था होते . स्टँडवर मी जातच नाही . दिवसभर गावात भटकत असतो . रात्रीच्या सभेला हजर न राहता मुंबईची गाडी पकडतो . पुढारी मंडळी म्हणजे दुसरे संस्थानिकच वाटायचे . अनुयायांना गुलामासारखे वागविण्याची त्यांना काहीच क्षीती वाटायची नाही.
हळुहळू पुढारी मंडळींच्या काही खाजगी गोष्टीही कळू लागल्या . ज्यांना आपण खूप मोठी माणसं समजत होतो , ती म्हणजे आपल्यासारखीच शेणामातीची माणसं आहेत , आपण जेवढं , अफाट वागणार नाही , तेवढी ही मंडळी स्वार्थाकरिता कुठल्याही पातळीवर येऊ शकतात , याची प्रचीती येत चालली . ह्यापूर्वी पुढाऱ्यांच्या अनेक गमतीजमती ऐकलेल्या . एक पुढारी तर इंग्लंडवरून बॅरिस्टर होऊन आलेला . तो कधी काळी खेड्यात सभेला गेला , म्हणजे त्याला उघड्यावर आंघोळ करण्याची लाज वाटायची . साहेबाला इंग्लंडमध्ये बंद बाथरूमची सवय झालेली . लोक सांगत , ” साहेब आंघोळीला बसले , म्हणजे चार अनुयायी त्यांना आंघोळीला आडोसा व्हावा म्हणून चार दिशांनी धोतर ताणून धरत . ‘ अशी त्यांची ‘ बाथ ‘ चाले . पुढे ह्या बॅरिस्टरसाहेबांनी एका खानावळ्या बाईलाच पळवून नेलं . ह्या प्रकरणाचा समाजात खूपच गवगवा झाला . त्यांना पार्टीतून गचांडी मिळाली .
क्रमशः
(दया पवार यांच्या बलुतं या आत्मचरित्रातुन)
