बनगरवाडी
दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिला होता. चांदण्या चमकत होत्या. समोर वळसे मारीत चाललेली गाडीवाट तेवढी फिक्कट अशी दिसत होती. रात्र किती आहे, किती वेळाने उजाडणार आहे, याचा निश्चित अंदाज बांधता येत नव्हता. मी फार लवकर तर निघालो नाही ना, अशी शंका वरचेवर मनात येत होती. माझ्याच पावलांचा आवाज मला मोठा वाटत होता. रातकिडे किरकिरत होते. गार वारा कानाशी आवाज करीत होता. बराच वेळ चालल्यामुळे अंगात एक लय भरली होती. वाट चुकण्याची भीती वाटत होती, कारण यापूर्वी मी कधी बनगरवाडीला आलो नव्हतो. हे गाव कसे असेल, काय असेल, तिथली माणसे माझ्याशी कशी वागतील, तिथे गेल्यावर राहायचे कुठे, असले प्रश्न मी स्वत: लाच विचारीत होतो. दोन दिवस रागरंग बघून मला परत फिरायचे होते.

कायम राहायचे म्हणजे काही सामानसुमान आणायला पाहिजे होते. आज केवळ धोतर – चादर, दोन कपडे, एवढेच घेऊन मी चाललो होतो. माळावरून गार झोंबरे वारे वाहू लागले. चांदण्यांचे तेज कमी झाले. धड चांदण्यांचा उजेड नाही, धड उजाडलेही नाही, अशी मधली अवस्था आली. बाभळी – तरवडासारख्या झुडपांचा ओळखू येणारा वास जाणवू लागला. वाटेवरची धूळ पायाला गार लागू लागली. बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले. झाडेझुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिसेनाशा झाल्या. रातकिड्यांचे गाणे थांबले. झोपेतून जाग्या झालेल्या कावळ्यांची जड कावकाव ऐकू आली.
तांबडापिवळा सूर्य माळाआडून वर आला. हिरवट प्रकाशाला पिवळी झळाळी आली. बोरीच्या झुडपात बसून राहिलेल्या सातबाया जाग्या झाल्या. शेपटी नाचवून कलकलू लागल्या. झुडपात पिसे फुलवून बसलेले होले पायांवर उभे राहून आवाज टाकू लागले. कावळे भराऱ्या घेऊ लागले. माळावर वाळून पडलेले गवत सूर्याच्या पहिल्या किरणांनी उबदारले. त्याच्या खाली असलेले कीटकांचे जग जागे झाले. मुंग्या तुरतुरल्या. टोळ उड्या हाणू लागले. सरडे सरसरले. माळावर लहान गर्दी करून आत राहिलेले गुंडीकिडे, घसरून आत पडणाऱ्या किड्यांना पकडून खाण्यासाठी अंगावर माती घेऊन तयार राहिले. मुरमुट्याच्या बुंध्यावर बसून राहिलेले हिरव्या झगझगीत रंगाचे भुंगे मुरमुटीची तुरट पाने खाऊ लागले.
माळावरच्या बिळांतून घोरपडींनी मुंडकी बाहेर काढली. गळ्याखालचा भाग हलवीत त्या जिभेच्या टप्प्यात येणाऱ्या कीटकांची वाट बघू लागल्या. झाडे सोडून होले रस्त्यावर आले आणि डौलदार माना हलवीत धुळीत पडलेले गवताचे बी टिपू लागले. सपाट झालेल्या धुळीवर त्यांच्या पायांचे ठसे नक्षीकाम केल्यासारखे उठू लागले. पाठीशी असलेली पिशवी हातात घेऊन मी भराभर चालू लागलो. अनवाणी पायांनी धूळ उडवू लागलो. लेहंग्याच्या फडकफडक आवाजाने वाटेवरचे होले बावरून उंच उडू लागले. लांब टांगा टाकीत मी चालत राहिलो. चालून चालून पोट खोल गेले.
पिशवीतील भाकरीचा, लसणाच्या चटणीचा, सांडग्यांचा वास फार येऊ लागला. पण मी नेटाने पाय उचलीतच राहिलो. बोटांच्या फटीतून धूळ वर येत होती. पावलांवर पुटे चढत होती. लेहंगा मळत होता आणि वाट लांबतच होती. आजूबाजूला पिवळ्याकरड्या रंगांचे माळ पसरले होते. पाहावे तिकडे उघडे माळ ! अगोदर भगभगीत असलेले हे माळ उन्हाळ्यामुळे अधिक भगभगीत दिसत होते. क्वचित कुठे खोलगट भागांत झाडाझुडपांचे हिरवे ठिपके होते. एरवी चोहीकडे दगडगोट्यांनी भरलेले माळ. नेपतीबोराटीची, बाभळमुरमुटीची खुरटलेली झुडपे आणि त्यांमधून जाणारी, धुळीने भरलेली, दगडांनी उंचावलेली, कुठे रुंद तर कुठे अरुंद अशी गाडीवाट. हळूहळू सूर्य वर चढला. पहाटे सौम्य वाटणारे माळरान रखरख करू लागले. सकाळच्या प्रहरी चाललेला पाखरांचा कलकलाट कमी झाला. क्वचित एखादी मातकट रंगाची माळचिमणी उंच उडून बाणासारखी खाली सूर घेऊ लागली. तिने घातलेल्या उतरत्या शिळेने उगीचच एकाकी वाटू लागले.
एक बहिरीससाणा खाली बघत जमिनीबरोबर तरंगत गेला आणि कोकाट्यांनी ओरडून गोंधळ केला. आता आसपास कुठे काळे कुठे तांबडे असे जमिनीचे तुकडे नांगरून पडलेले दिसत होते. न नांगरलेल्या पडीक जमिनी उन्हाच्या तडाख्याने उलल्या होत्या. पिंढरीएवढा पायजाईल अशा भेगा जागोजाग पडल्या होत्या. या जमिनी आल्या, त्याअर्थी वस्ती जवळ आली, असे समजून मी वरचेवर क्षितिजाकडे बघत होतो. पण घरे दिसत नव्हती. झाडी दिसत नव्हती. ऊन्ह टळटळीत झाले. सकाळी गार काल्यासारखी लागणारी धूळ तापली. माझ्या डोक्याभोवती बारीक माशांचा एक थवा घोंघावू लागला. त्या सतत आवाजाने वीट आला. डोक्यावरची टोपी काढून तिने तो पाठलाग करणारा घोळका हाकलण्याचा मी प्रयत्न केला, पण तो गेला नाही. शे – दोनशे माशा माझ्या डोक्याभोवती फिरत, बरोबर येतच राहिल्या. हा माणूस कुठेतरी अनेक माणसे राहणाऱ्या ठिकाणी चालला आहे, त्याला दिशा बरोबर माहीत आहे, त्याच्या सोबतीने गेलो तर आपण नेमक्या ठिकाणी पोचणार आहोत – घाण, राड, सांडपाणी असलेल्या ठिकाणी जाणार आहोत – हा समज असलेल्या माशा डोक्याभोवती घोंगावत माझ्याबरोबर येतच राहिल्या.
आजूबाजूला सपाट मोकळा माळ, बाजरीची तांबडी राने, आणि मध्येच गबाळे पडावे तशी पडलेली तीस पस्तीस घरे, अशी बनगरवाडी होती. बहुतेक घरांच्या भिंती मातीच्या होत्या आणि छपरे खपलीच्या काडाने शाकारलेली होती. काही थोडी घरे धाब्याचीही होती. हरेक घरापुढे लहानमोठे अंगण होते. सांडपाण्यावर वाढलेला लिंबारा, शेवगा होता. घराच्या मागच्या बाजूला मेंढरे कोंडण्यासाठी बाभळीच्या काट्यांचे कूड घालून केलेले वाडे होते. कुठे भिंतीला लागून गाडीचे मोडके चाक पडले होते. सगळे नेहमीप्रमाणेच. वाडीत रस्ते असे नव्हतेच. घरे बांधून उरलेली जागा चालण्यासाठी वापरली जात होती, इतकेच. बऱ्याच घरांच्या कवाडांना कुलपे होती. दोनतीन लहान मुले एका घरापुढे खेळत होती. घरांच्या सावल्या धुळीने भरलेल्या वाटेवर पडल्या होत्या. त्यांत कुठे कुत्रे तर कुठे पांढरीकाळी कोंबडी डोळे मिटून बसली होती. डावीउजवीकडे घरे होती. त्यांतून बायांनी डोकावून बघितले. पोरे आत पळाली.
थोडे पुढे गेल्यावर पटांगण लागले. लिंबाचे एक मोठे झाड लागले, त्याच्याभोवती पार होता. ती गार सावली बघताच, तापलेल्या कोंबड्यासारखा जाऊन मी तिच्यात बसलो. टोपी काढली. घाम पुसला. पाय आपटून धूळ झटकली. वरच्या थंड सावलीने घाम जिरला आणि बरे वाटले. भूक लागली होती, पण पाणी कुठे आहे ते ठाऊक नव्हते. विचारावे असे कोणी आसपास दिसत नव्हते. तसेच तुकडे खावेत, असा विचार मनामध्ये आला, पण भुकेइतकीच तहानही लागली होती. तोंडातला ओलावा सुकून खारट चव आली होती. ती गार सावली सोडून उठावे, असेही वाटेना, उंच केलेल्या गुडघ्याभोवती हातांचा विळखा घालून मी उगीच बसून राहिलो. आसपास कसलाही आवाज नव्हता. माझ्या डोक्यावर असलेल्या एका फांदीवर कावळ्याचे जोडपे बसले होते तेसुद्धा आवाज करीत नव्हते.
जरा वेळाने, मी आलो त्याच वाटेने कुणी माणूस येताना दिसला. बरे वाटले. हा माणूस येताच त्याला हाक मारावी, आपण का आलो ते सांगावे, पाणी विचारून घ्यावे, भाकरी खावी, असे मनाशी म्हणतो आहे, तोपर्यंत तो गडी गावात शिरला. समोर येऊन उभाही राहिला. त्याच्या डोक्याला तांबड्या रंगाचा पटका होता. अंगात गोल सदरा होता. धोतराच्या टोकाबरोबरच एक उंच भालाही त्याने हातात धरला होता. त्याचा चेहरा मोठा आणि लांबोडका होता. गालाची हाडे वर आली होती. नाक सरळ होते. मिशांतले केस काळेकरडे होऊन धुरकटल्यासारखे दिसत होते. मुळीच संकोच न दाखविता त्याने आपल्या तांबारल्या डोळ्यांनी मला पाहून घेतले आणि मिशांवरून बोटे फिरवून धुळीत थुक टाकली. तो मला तोंडावर आल्यासारखी वाटली. उगीच चुळबूळ करुन मी पाय खाली सोडले आणि इकडेतिकडे बघितले. दम देताना काढावा तसा आवाज काढून त्याने मला विचारले, ” काय अंडीवाला हायेस का गा ? ” त्या प्रश्नाने फटका बसल्यासारखा मी खाली आलो. क्षणभर काय उत्तर द्यावे हे मला सुधरेना. माझ्या या लेहंग्याने मला एकदम खाली ओढले होते. सुट्या आणेल्यांच्या थैल्या घेऊन खेडोपाडी अंडी खरीदणारा मुसलमान बनवून टाकले होते. मी गडबडलो. गोंधळलो. तोंडावर ओशाळवाणे हसू आले. सोडलेले पाय वर घेऊन टोपी नीट केली आणि म्हटले, ” नाही, मी मास्तर आहे. ” हा खुलासा ऐकून विचारणाऱ्याला आपण काही वावगे बोललो असे वाटले नाही. डाव्या
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
