बनगरवाडी
ठेवलेले मीठ पाझरू लागले. पोपटी रंगाच्या गवताने जमिनीतून डोकी वर काढली. अंगणात, माळवदावर, छपरांवर – जिथे उगवू नये तिथे गवत उगवू लागले. सर्वत्र झगझगीत पोपटी रंग दिसू लागला. अंगठ्याच्या नखावर बसू शकतील एवढ्या बारक्या बेडक्या एकाएकी दिसू लागल्या. वाटेने चालताना टणाटण उडू लागल्या. त्यांच्यावर कावळे झडपा घालू लागले. छोटीशी पंखे असलेले किडे हजारो – लाखोंनी उडू लागले आणि साळुक्या – चिमण्यांनी त्यांचा फडशा पाडला. त्यातून वाचले ते दिवे लागताच त्यांवर झडप घालून मेले. दोन दिवसांनी त्यांची पातळ पंखे ठिकठिकाणी गळून पडलेली दिसली आणि पंख टाकलेले ते लहान अळीसारखे पिवळ्या रंगाचे किडे नाहीसे झाले. विटकरी रंगाचे लांबट वाणी एकमेकांच्या पालुंगळी बसून अनेक पायांवर चालू लागले. बोटाएवढे काळे वाणी आळशीपणाने इकडेतिकडे करू लागले. माणसा – जनावरांचा स्पर्श होताच वेटोळे घालून पडू लागले.

धनगरांची पोरे मुद्दाम हात लावून ते गोल पैसे तळहातातून नाचवू लागली. माशा फार झाल्या. झोपड्यांतून घोंगावू लागल्या. मेंढरांच्या नाकांवर बसू लागल्या. चिलटे फार झाली आणि धनगरांच्या डोळ्यांसमोर उडू लागली. नांगरून पडलेल्या जमिनीतील ढेकळे विरघळली. जमिनींनी पाणी पिऊन घेतले. ठिकठिकाणी लहानमोठी डबकी साचली आणि निळ्याकाळ्या आकाशाचे प्रतिबिंब त्यांत दिसू लागले. रानातून जाताना लोकांच्या, मेंढरांच्या, गुरांच्या पायांना चिखलाचे लपके चिकटू लागले. माळरान भिजले आणि हिरव्यागार माळावर काळीभोर मेंढरे हिंडू लागली. आणि त्यांच्या पाठीवर बसून काळे कोतवालपक्षी घोगरा आवाज काढू लागले. कुणाच्याही दृष्टीला न पडण्याची खबरदारी घेऊन चित्तर उंच स्वरात ओरडू लागले.एका ठरावीक वेळेला शाळा भरवणे, सोडणे, हे बनगरवाडीच्या शाळेबाबत नेहमीच जमत नसे.साऱ्या जगाला उन्हाळ्यात सुट्टी. तर,इथे सुगीला सुटी. मन मानेल तेंव्हा शाळा. मोटारसर्व्हिस जशी जागा भरल्यावर सुटते तसे मास्तराने शाळा भरल्यावर शिकवावे. त्यामुळे मास्तराचे क्षेत्र शाळेपुरते मर्यादित राहू शकत नव्हते.
कुणी पत्र लिहायला सांगत, कुणी अर्ज लिहायला सांगत. घरी जाण्यासाठी मी जेव्हा रविवारच्या सुटीत निघत असे, तेव्हा माझ्या कोटाचे खिसे पोस्टात टाकण्यासाठी दिलेल्या पत्रांनी भरलेले असत. ही कामे जेव्हा बिनतक्रार मी करू लागलो, तेव्हा कोणी काहीही विचारायला यावे असे झाले. नवराबायकोच्या भांडणापासून तो मेंढरांच्या चोरीपर्यंत सर्व तक्रारी मास्तराकडे येत. मास्तर शिकलेला, शहाणा माणूस. त्याला कायदा कळत असला पाहिजे, बरे – वाईट कोणते हे कळण्याची बुद्धी त्याच्यापाशी असली पाहिजे ! त्यामुळे शाळा नाही तरी या उलाढाली करण्यात वेळ जाऊ लागला. मुले कमी आहेत, अशी तक्रार खात्याकडून आली तर “शाळा नवीन आहे, सुगी सुरू आहे- ‘इत्यादी कारणे दाखवून मी गावाची शाळा संभाळू लागलो. शाळा म्हणजे कोर्ट, चावडी, पोलीसठाणे, म्युनिसिपालिटी – सर्व काही! आणि मास्तर म्हणजे जज्ज, पोलीसअधिकारी, पाटील – कुलकर्णी, आणि स्टॅपव्हेंडरसुद्धा ! पण वाडीचे भांडण वाडीबाहेर सहसा जात नसे. सारा निकाल तिथे चावडीपुढे दहा माणसे जमून दिला जाई. मास्तर आणि कारभारी, काकुबा, शेकुबा, असली वृद्ध मंडळी न्याय देत. दहा जणांनी सांगितल्या गोष्टीच्या पुढे अपराधी जात नसे. केलेला दंड, सांगितलेला न्याय तो मानी.
नाही पटला तर अपील करण्याची मुभा त्याला असे. हे अपील म्हणजे धनगरांचे महादैवत बोलवावे लागे. धनगरांची बरीच मोठी जातकुळी एकत्र येई आणि मग न्यायदान होई. पण असे कुणी करीत नसे. कारण महादैवत बोलवायचे तर त्याला जेवण करावे लागे आणि एवढे मोठे जेवण म्हणजे बराच खर्च करावा लागे. वाडीत लग्नेसुद्धा एकदम करण्याची पद्धत होती. दर वर्षी एक मुहूर्त बघायचा आणि त्याच दिवशी गावातली सगळी लग्ने उरकून घ्यायची. यामुळे सर्व गाव जेवू घालण्याचा भार एकावर पडत नसे. जी दहावीस लग्ने उभी राहत, त्यांच्या प्रत्येकाच्या वाटणीला दहावीस पाने येत. या लग्नाच्या दिवशी एखाद्या गरजूचे पैशाअभावी अडत असले, की सर्व गाव एकत्र जमा होई आणि ‘अमकातमका अडला आहे, त्याला धक्का देऊ या ‘असा विचार पक्का होई. सर्व जण त्याचा भार उचलत आणि त्या गरजूचे लग्न होऊन निघे. दादूच्या धमकीला न जुमानता मी बेधडक गावात मिसळलो होतो. वाडीच्या लोकांचे पान मास्तराविना हलत नाही अशी परिस्थिती झाली होती. वाडीत शेतकरी असे फार थोडे होते. मृगाच्या पावसाने जमिनीत गवताचे कोंब उठले. चांगले माजले. पेरण्याआधी कुळवाची एक पाळी घालून शेतकऱ्यांनी त्या भाकड गवताचा मोड केला. आणि मग पुष्यनक्षत्राचा पाऊस झाला. रानात चांगला चिखल झाला. लोक वापसा येण्याची वाट बघू लागले.
तो आला. चिखल वाळला. बैलांचे पाय रुतू नयेत, टिपणीची भोके लिपू नयेत, इतपत रान फडफडीत झाले. ओल खोल राहिली, आणि वरून जमीन हाडकली. मग पेरणीची गडबड सुरू झाली. बाजरीच्या, कडधान्याच्या पेरण्या सुरू झाल्या. बियाण्यांची ओटी घेऊन आणि टिपण जुंपून भल्या सकाळी लोक रानाकडे जाऊ लागले. या पेरणीच्या धामधुमीत शेकू माझ्याकडे आला. हा फारसा गावात दिसत नसे. त्याच्या दोनतीन एकरांच्या तुकड्यात राबणे एवढेच त्यास माहीत होते . सकाळच्या प्रहरी अंगावर धोतर पांघरून तो माझ्याकडे आला . त्याचे हात दिसत नव्हते. ते धोतर त्याने अशा रीतीने पांघरले होते की त्याचे वाळलेले तोंड आणि चालूनचालून राठ झालेली ओबडधोबड नखे असलेली पावलेच दिसावीत. मी बसलो होतो. आयबू बसला होता. शेकू उभ्या उभ्याच म्हणाला, ” मास्तर, एक बैल बगून दे की मला. पेरनी थटली गा! ‘मी शाळामास्तर होतो. माझ्यापाशी बैल कुठून असणार? पण हे शेकूला सांगण्यात अर्थ नव्हता. तो म्हणाला, “तू मागितलास म्हंजे मिळेल. माझ्यापाशी एकच हाय. एक मेला. दुसरा मिळाला तर पेरीन, न्हाई तर वरीसभर उपाशी मरन्याची पाळी हाय. “मी म्हणालो, ” पण कुणापाशी आहे ते सांग, म्हणजे त्याला मागीन. ‘ ” जेच्यापाशी हाय त्येची पेरनी हाये.
आपला खोळंबा करून कोन देनार? मी साशी “मागून आलो. “मग मी कुणापाशी मागू ? “ते तू काय बी कर, पण माजी नड भागव. सगळं गाव म्हणतं, मास्तर येळंला येतो, अडचण वळकतो. मग माझ्याएकीच का असं ? ” इतका वेळ आयबू गप होता. तो शेकूकडे तोंड फिरवून म्हणाला, “तू येडा काय रे शेकू? मास्तरापाशी बैल कुठला? ते काय शेतकरी का हेडे ? उगाच काहीबी मागायला याचं? जा घरी! “आयबून झिंजाडताच शेकू खाली आला. आपले चुकत तर नाही ना, अशी शंका त्याला आली. ‘घरी जायाचंच, पर बगा की मास्तर जमलं तर ! “तो नरम येऊन बोलला. आयबू नेटाने उठला. त्याने शेकूच्या बाव्हट्यांना धरून पायऱ्या उतरायला लावले आणि म्हटले, “शानाच हायेस शेकू! मास्तरनी बैल काय कडुसरीला लावलाय ? ”

आणि काकुळती येऊन काही पुटपुटत शेकू गेला. परत येऊन आयबू म्हणाला, “त्येचं काय मनावर घेऊ नका मास्तर. ते उगीच भोळसट हाय ! ” पण मला राहून राहून वाटले की ‘ ग – म – भ – न ‘ लिहायला शिकविणे एवढेच आपण करतोय, पण यांची गरज वेगळी आहे. आयबूला कुटुंब पाहिजे. आनंदाला भाकरी पाहिजे. शेकूला बैल पाहिजे. दोन दिवस शेकू चोहीकडे फिरला, पण त्याला बैल मिळाला नाही. तो घरी जाऊन मटकन बसला. बायकोला म्हणाला, “काय चालंना माझं. ‘ शेकूची बायको गावातील सर्व धनगरणीपेक्षा मुंडा हात उंच होती . तिच्या अंगात ताकदही चांगली होती. शेतीची सर्व कामे ती पुरुषाच्या बरोबरीने करत असे. डोक्याला हात लावून नवरा बसला तेव्हा ती म्हणाली, “कुणाकडे मागितला? “ सा गावभर फिरलो – बैल कोन देत न्हाई. “मग हो ? ” ह्या साली पोटानं मरायचं. उपाशी पाय घासून मरायचं. ‘ नवऱ्याचे हे बोलणे त्या बाईने ऐकले. त्याचे तेल संपत आल्या दिव्यासारखे डोळे बघितले.
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी कादंबरीतुन)
