दिनांक २९ जानेवारी(बांगर्डे,श्रीगोंदा):
तालुक्यातील बांगर्डे याठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पॅनलला मतदान करण्याऐवजी विरोधी पक्षाच्या पॅनेलला मतदान केले. म्हणून, घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून येथील काही इसमांनी शिवीगाळ केल्याचा आरोप गावातील एका महिलेने केला असून, दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी अनिल बाबू थोरात व बाळू पिराजी थोरात हे दोघेजण आले. त्यांनी फिर्यादीस म्हटले की, तू आमच्या ग्रामपंचायत निवडणूकित पॅनलला मतदान केले नाही. यावर फिर्यादीने त्यांना सांगितले की, मी तुमच्या पॅनलला मतदान केले आहे. त्यावेळी अनिल थोरात व बाळू थोरात हे दोघे म्हणाले की, तुम्ही खोटे बोलत आहात असे म्हणत, त्याने महिला फिर्यादीस मिठी मारून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी पीडितेने मोठ्यामोठ्याने आरडाओरडा केल्यानंतर फिर्यादीचे पती घराबाहेर आले व त्यांच्या मिठीतून फिर्यादीची सोडवा सोडवा केली.
बाळू पिराजी थोरात यांनी हातातील गजाने पिडितांच्या हात, मनगट व पायाच्या पिंडरीवर गजाने मारहाण केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२३, ३२४, ३५४(अ), ३४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पितळे हे तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणात अद्यापही कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
स्रोत:(श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल तक्रार)

