बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर (भाग १७).

बनगरवाडी..

विचारली, आणि ती सविस्तर हकीकत लोकांनी सांगितली. वाडीच्या आसपासच्या रानात एकदोन लांडगे नेहमी असत. एकटेदुकटे खांड बघून ते मेंढरू धरीत आणि पळवीत. नेटके असले तर मेंढका पाठलाग करी. लांडग्याला तोंडातला घास टाकायला लावी. नरडे फोडलेले ते मेंढरू व्हरल, महार थोड्या किमतीला विकत घेऊन खात. पण पुष्कळ वेळा लांडगा मेंढरू घेऊन जाई आणि मेंढका परत येई. असे प्रकार वरचेवर होत. फार त्रास होऊ लागला म्हणजे एखादे दिवशी गावातली पाचपंचवीस पोरे काठ्या – कु – हाडी घेऊन बाहेर पडत. रख्ख उन्हातान्हातून माळ तुडवत, फरा काढून लांडगा उठवायची खटपट करत; पण बेरकी लांडगा त्यांना सापडत नसे. दिवसभर वणवण फिरून, कुणाच्याही रानातला हरभरा, भुईमूग उपटून खात ही शिकारी मंडळी हात हलवीत परत येत. पुन्हा चारआठ दिवसांनी एखादे मेंढरू मारल्याची वर्दी येई. इतका त्रास होऊनही लांडगा मारण्याची विशेष खटपट कुणी करत नसे. खायचे सावज नसल्यामुळे रामोशी या शिकारीविषयी उदासीन असत. आणि मेंढक्यांची अशी समजूत होती की, खांडातले मेंढरू लांडग्याने धरले, म्हणजे मेंढरांना साथीचा रोग होत नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या समजुतीमुळे लांडगे चांगले धट होते, आणि दिवसाउजेडी रानातून हिंडत. माणूस बघून माती उकरत. बिरा धनगराला काही काम परगावी निघाले, म्हणून त्याने पोराला मेंढरांमागे पाठविले होते. डहाळे – कु -हाड घेऊन सता माळावर मेंढरे चारीत होता आणि संध्याकाळच्या सुमारास लांडग्याने रानाच्या ढेपणीवर चढून खांड हेरले. तरवडा – नेपतीच्या झुडपाचा आडोसा घेत वगळीवगळीने तो खांडाजवळ आला, तरी सताला पत्ता नव्हता. शेवटी खांडातून बाजूला असलेले एक बांडगे हेरून लांडग्याने झडप घातली. त्याचे नरडे धरून तो पळू लागला. सताचा धनगरी कुत्रा चवताळून भुंकत धावला, तेव्हा सताचे लक्ष गेले. लांडगा वगळ धरून सुसाट पळत होता. मोठमाठ्या शिव्या देत सता मागून धावला. कुत्राही धावला. हा हा म्हणता कुत्रा लांडग्याला भिडला आणि उडी घेऊन त्याने लांडग्याच्या मागच्या फऱ्याला धरले.

ती कळ येताच तोंडातले मेंढरू टाकून लांडगा मागे वळला. दात विचकून कुत्र्याची मानगूट धरायला बघू लागला. फर सोडविण्यासाठी धडपडू लागला. पण लांडगा वळत होता तसा कुत्राही वळत होता. तोंडात धरलेल्या फऱ्याशी ओढ घेऊन सरकत होता आणि दोन्ही अंगांना सारखे वळूनही लांडग्याला त्याची मान सापडत नव्हती. दोघांची चांगली झटपट झाली. धुरोळा उडाला. कुत्र्यापेक्षा लांडगा ताकदीने भारी असल्यामुळे त्याने कुत्र्याला दरारा ओढले, झिंजाडले. दाताची पकड सुटून कुत्रा मुंडीवर कुचून उलटा झाला आणि चवताळलेल्या लांडग्याने उडी घेऊन त्याचे नरडे फोडले. कुत्रा विलक्षण केकाटला. दरम्यान सता तिथे पोचला आणि कुत्र्याच्या उरावर बसलेल्या लांडग्याच्या मानेवर त्याने कु -हाड हाणली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. लांडगा उलटा होऊन पाय झाडू लागला आणि रागाला गेलेला सता कचाकच घाव घालत राहिला. लांडगा मेला. कुत्रेही मेले.

वगळीतल्या वाळूत खड्डा उकरून सताने कुत्रे पुरले. डोळे पुसले. ते मेले मेंढरू खांद्यावर टाकून, लांडग्याच्या पायाला दोरी बांधून त्याला ओढत दिवेलागणीच्या सुमारास सता वाडीत माघारी आला. आणि झाली हकीकत आईला सांगताना धसमसून रडला. कुत्रा गमावला, मेंढरू गमावले, म्हणून रडला. स्वतः रडत रडत आईने त्याला समजावले. पोटाशी धरून म्हटले, ” जाऊ दे. कुत्रा मेला, त्यो लांडग्याचं रगत घेऊन मेला. मेंढरू त्याच्यावरनं ववाळून टाकलं मी. रडतोस कशापायी?” ही हकीकत ऐकल्यावर सता शाळेत येतो कधी, आणि त्याला मी शाबासकी देतो कधी, असे मला झाले. पण चारसहा दिवस झाले तरी तो शाळेत आला नाही. निरोप पाठवले तर सांगावा आला की, तो मेंढरांमागे जातोय, शाळेत येणार नाही.

मग सवड काढून मी मुद्दाम त्याच्या रानातल्या वस्तीवर गेलो. दिवस मावळून गेला होता आणि फिक्कट चांदणे पडले होते. वस्ती जवळ आली तशी कुने अंगावर येईल म्हणून सताला हाक मारावी असा विचार मनात आला आणि मी मोठ्याने हाक मारली, ओ सता वस्तीकडून हाक आली. ‘कोन हाय? “मी मास्तर. कुत्रं धर रे. अंगावर येईल. ‘सताचा आवाज एकदम खाली आला, ” कुत्रं न्हाई, मास्तर. या. ” आणि माझ्या एकदम ध्यानी आले की, सताचे कुत्रे तर परवाच लांडग्याच्या झटापटीत मेले. मला अपराध्यासारखे झाले. वस्तीपुढे छान सारवलेले अंगण होते. मातीचे ओबडधोबड वृंदावन होते. त्यात डेरेदार तुळस होती. त्या कट्ट्यावर घोंगडे टाकून सता म्हणाला,” बसा. फिक, चांदण्याच्या प्रकाशात गुरेढोरे सटक्याने चारा खाताना दिसत होती. सताचा बाप बिरा शेर लाची धार काढत होता. बाहेरच्या वाड्यात मेंढरे कोंडली होती. गुरांच्या गळ्यांतल्या घंटा किण कणत होत्या. चिपाडे मोडल्याचा खसपसाट येत होता. “मोठी बहादुरी केलीस गड्या तू. मला कळलं सगळं.” सता म्हाणाला. “पर लांडग्यानं कुत्रा मारला, मास्तर. “हो, समजलं मला. “मग क्षणभर मी गप्प झालो. सताही झाला. दुधाची चरवी घेऊन बिरा माझ्यापुढे आला.’ धार काढत हुतो.

रात करून आला ? ” मी म्हणालो, ‘ आलो फिरत. ” ” बसा. आमच्यात काय च्या न्हाई, काय न्हाई. दूध पेता का ? ” नको. काही जरूर नाही चहादुधाची. ‘तसं कसं म्हणून भागतं ? घ्या की. उलिसं आमचा मान म्हणून. जा रं पोरा, पेला आन आतनं. ‘बिरा माझ्यापाशीच कट्ट्यावर टेकला. मी विचारले, “शाळेत का नाही आला सता चार दिवस ? ” ‘न्हाई आला. मीच म्हनलं, जा मेंढरांमागं.”मग नड संपली असली तर आता पाठवा उद्यापासून. ‘बिरा थोडासा हसला. पेल्यात ओतून त्याने दूध माझ्यापुढे ठेवले आणि सताला चरवी आत न्यायला सांगितले. ते चविष्ट दूध मी चाखत चाखत पिऊन टाकले. शेरडाच्या दुधाला थोडासा वास येतो, पण तो सवयीने येईनासा झाला होता. मग सावकाशपणे बिरा म्हणाला, “सता आता शाळला न्हाइ याचा मास्तर – म्हणजे का, तर मीच नको म्हनून सांगटलंय . बास झाली शाळा. आता आपलं आपल्या उद्देगाला लागा. “

“पण एकाएकी असा का काढता त्याला? शिकू द्या की सातवीपर्यंत. ‘मानेला झोका देऊन बिरा म्हणाला, “का करायचं हाय ? अवं त्याचा आता चांगला नेटका गडी झाला. एकट्यानं लांडगा तोडला त्येनं. पोरठोर न्हाई राह्यला त्यो. मग आता शाळा कशाला अन् पाटी कशला ? लागू द्या आपल्या उद्देगाला! “मी पुष्कळ सांगून बघितले, पण पोराची आणखी चार वर्षे वाया घालवायला बिरा तयार झाला नाही. पुन्हापुन्हा त्याने निश्चयपूर्वक सांगितले की, ‘आता मी पोराला शाळेत पाठवणार नाही. माझ्या संगतीला आणखी एक गडी झाला. तेवढाच माझा कामधंदा लवकर उरकल. तुम्ही आग्रह धरू नका. ‘आणि शाळेत येण्यासंबंधी सतानेही विशेष हट्ट धरला नाही. तास

क्रमशः

स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading