बनगरवाडी-व्यंकटेश माडगूळकर (भाग २).

बनगरवाडी..

पायावरचा भार उजव्या पायावर टाकून तो म्हणाला,” मास्तर? “त्याचा विश्वासच बसला नाही. मळका लेहंगा आणि रेघारेघांचा धुवट शर्ट घातलेले हे गुडघ्याएवढे पोर मास्तर कसे असेल ? लंगोटी लावून ज्याने शाळेत जावे आणि थुकीने पाटी पुसावी, अशा पोराला मास्तर म्हणेल कोण? जरी म्हणाले तरी त्याला मास्तर करील कोण ? छे ! काहीतरीच सांगणे । मला आपल्या लहान वयाबद्दल, धोतर – कोट न घातल्याबद्दल विषाद वाटला. भाषेत जोर आणून मी म्हटले, “ हो. माझी नव्यानं नेमणूक झाली आहे. आजपासून मास्तर म्हणून मी इथं रुजू झालो आहे! ” हातात आडवा घेतलेला भाला त्याने झेंड्यासारखा समोर टेकला आणि तुच्छतेने म्हटले, ” हं, हतं काय करायचा गा मास्तर ? साळा चालतीय कुटं हतं ? पोरं हायती कुटं वाडीत? सरकारला काय ठावं न्हाई व्हय?

https://bit.ly/bspmycityshrigonda

रिक्कामा फाजीलपणा… “आणि पटका नीट खोचीत तो निघूनही गेला. जाता जाता पुन्हा एकवार धुळीत थुकला. अरुंद गल्लीतून तो जाईपर्यंत मला तिकडे बघत राहण्याचे धैर्य झाले नाही. मी फार ओशाळलो. शाळेत फाटकी चड्डी घालून जाताना जसे मेल्याहून मेले व्हायचे तसे झाले. तेवढ्या एकाच प्रसंगाने माझे धैर्य, उमेद, उत्साह वितळून टाकला. असेच माघारी जावे आणि या नोकरीचा राजिनामा द्यावा, हे आपल्याला जमणार नाही, इथे शाळा भरणार नाही, मुले येणार नाहीत, मास्तराचा, शाळेचा, शिक्षणाचा इथे काही उपयोग नाही, असे मला वाटू लागले; आणि उदासवाणा चेहरा करून मी लिंबाच्या पारावर बसून राहिलो.

मघा लागलेल्या तहानेचा, भुकेचा, काही वेळ मला विसर पडला. उन्हात तळपणाऱ्या त्या गावात या वेळी मी कशाला आलो, असे वाटून मला फार एकाकी वाटू लागले. आणि मग, मिशा पांढऱ्या झालेला एक म्हातारा हातातली काठी टेकीत रानाकडून आला. त्याच्या भुवयासुद्धा पांढऱ्या झाल्या होत्या. खांद्यावरचे जाडजूड कांबळे त्याने रुप्याचे कडे असलेल्या हातांनी बळकट धरले होते. जोड्यांतले पाय ओढीत ओढीत तो आला. माझ्यापुढे थांबला. कपाळावर हात घेऊन त्याने मला न्याहाळले, खाणाखुणा पटण्यासाठी चुकले मेंढरू न्याहाळावे तसे न्याहाळले. म्हटले, ” हतं का बसला रे बाळा ? ” मी म्हणालो, ” मी मास्तर आहे.

आजपासून माझी नेमणूक इथं झाली आहे. ” ‘अरे, मग मास्तर असून हतं का बसतूस ? शाळंत बस. म्हाताऱ्याच्या या बोलण्याने मला थोडा धीर आला. मघाच्या भालाइतासारखा हा नाही असे वाटले. ‘ मला शाळेची इमारत कुठाय तेही नीट ठाऊक नाही ! “यावर समोरच्या लांबलचक चावडीकडे हातातली काठी करून म्हातारा म्हणाला, “ ती नव्हं का शाळा – चावडीतलं दोन खण शाळंचं ! ” ” ही ? ” ” हां. जा बस ततं ! ” “ एकटा बसून काय करू ? पोरं कुठं आहेत ? “ पोरं गेली गा शेरडांमागं. पर येत्याली.

काय रानातच व्हात्यात? ” “पण शाळा भरण्याइतकी आहेत तरी का ? ” ‘हायेत, बक्कळ हायेत. आन् हुत्याल की. दरसाल दहाईस लगीन उभं हातंय. पोरं ” हुत्याल. तू शिकवायचं काम कर म्हंजे झालं. ” त्या बोलण्याचे हसू आले. पाराखाली उडी टाकून मी पिशवी घेतली आणि म्हटले, ” मला पाणी कुठाय ते सांगा, म्हणजे जेवण करीन. भाकरी आणल्यात बरोबर.” म्हातारा म्हणाला, “पाण्याची वरड हाय गा वाडीला. उन्हाळ्यात पार वाळवण हुतं. एक हेळ हाय त्यो तिकडं बग- ” मी गल्लीतून समोर पाहिले. गावाबाहेर दगडचुन्याने बांधलेला हेळ दिसला. आमच्या धनगराचं पानी चालत असलं तर बग, देतो. ” मी म्हणालो, “ न चालायला काय झालं ? पण तांब्या मिळाला तर मी घेऊन येईन. ‘ पण म्हाताऱ्याने तिथे उभ्या राहिल्याच हाक मारली, ” अग ये अंजे, पान्याचा तांब्या आन भरून मास्तराला. ‘लांब, गल्लीतून एका घरातून कुणीसे बाईमाणूस डोकावले.

म्हाताऱ्याने परत ओरडून तेच सांगितले आणि मग आम्ही दोघेही शाळेपाशी आलो. तालुक्याच्या मास्तरांनी माझ्यापाशी चावी दिली होती. ते म्हणाले होते, ” चार्ज देण्यासारखं काही काम नाही. पोरंच नाहीत तिथं तर शाळा कसली ? ही चावी घेऊन जा आणि चार्ज दिला म्हणून मी रिपोर्ट करतो. ‘ कुलूप काढून मी शाळा उघडली. कुबट भपकारा आला. खालची उंचसखल जमीन उखणली होती. धुळीने आणि चिमण्यांच्या पांढऱ्या विष्ठेने भरून गेली होती. खांद्यावरचे घोंगडे काढून म्हाताऱ्याने त्यानेच तो कचरा लोटला, तो आम्हा दोघांच्याही अंगावर आला. त्या खाटाने मला ठसका लागला. थोडीशी जागा स्वच्छ झाल्यावर, त्यावर म्हाताऱ्याने घोंगडे टाकले. अंथरले नाही, तसेच आपले टाकले, आणि म्हटले, ” बस.” आणि मग हात खाली टेकून तोही बसला. काठी बाजूला आडवी ठेवीत म्हणाला, “ हां, सोड भाकरी. पानी आनील आत्ता पोरगी । “मी पिशवी घेतली. जुन्या धोतराच्या फडक्यात बांधलेल्या भाकरी सोडल्या. ” तुम्ही खाता का बाबा ? ” आपला सुरकुतला चेहरा हसरा करून म्हातारा म्हणाला, ” आमी आतापातूर हातू व्हय ? दोन बार होऊन तिसरा वखत आला. खा तू ! ‘ मला थोडे संकोचल्यासारखे झाले. पण भूक संकोचाला जुमानणारी नव्हती. कुणीतरी एक काळीभोर पोरगी आली. बाहेरूनच तिने उंबरठ्यात पाण्याचा तांब्या ठेवला” आणि माझ्याकडे थोडे बघून ती निघून गेली. एक गुडघा उभा करून बसलेला म्हातारा कमरेची तमाखूची पिशवी काढून तीत बोटे घालू लागला. भुकेल्या पोटी मी भराभर घास घेत राहिलो. घेता घेता त्या म्हाताऱ्याकडे पाहू लागलो. डोक्याचे मुंडासे सोडले, अर्धे धोतर सोडले, तर त्याच्या अंगावर काही नव्हते.

ज्या मातीत तो दिवसभर मेंढरांमागे हिंडत असेल त्या मातीप्रमाणे, त्या मेंढरांप्रमाणे त्याचाही रंग काळाभोर होता. अंगकाठी सडसडीत होती. उघड्या पायांवर झाडेझुडपे लागून पांढरेधोट फरकाटे उठले होते. आणि म्हातारा फार पिकला होता. कबुतराच्या पिसाऱ्यासारख्या भुवया, पांढऱ्याधोट भरघोस मिशा, बोटबोट वाढलेली पांढरी दाढी आणि छातीवरचे पांढरे कुरळे केस. वयाचा अंदाज बांधणे कठीण होते, पण म्हातारा पार थकला होता. चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे होते. हातापायावरच्या शिरा फुगल्या होत्या, जागजागी गाठळल्या होत्या. तमाखू गालात धरून, पिशवी नीट बांधता बांधता त्याने विचारले, ” गाव कुठशीक तुजं ?” मी म्हणालो, ” आहे इथं जवळच – विभूतवाडी. ‘ ” तिथला कोन तू ? “मी जरूर ती माहिती सांगितली. त्याने कुणाकुणाची ओळख सांगितली. “मग तू आमच्यापैकीच आहेस ! ”असे म्हणून माझ्या पाठीवर हात टाकला आणि थुकायला यावे म्हणून तो बसल्याबसल्याच उंबऱ्यापाशी सरकला. मला पुष्कळच धीर आला. या धनगरी खेड्यात मी अगदीच एकाकी नाही, जवळ येऊन बोलणारे, आपुलकी दाखविणारे कोणीतरी आहे, अशीच दहापाच माणसे निघाली तरी मला इथे राहणे सुसह्य होईल, असे वाटले. जरा वेळाने निरोप घेऊन म्हातारा रानात निघून गेला. मी एकटा उरलो, शाळेच्या तुळयांवरून पूर्वीच्या मास्तरांनी निरनिराळ्या म्हणी खडूने लिहिल्या होत्या.

पूर्व – पश्चिम दिशांना त्या त्या नावाच्या रंगीत पाट्या डकवल्या होत्या. आढ्याला शेराची एका फांदी टांगली होती. तिच्यावर चिलटांचे पुंजके बसून राहिले होते. किलचांतून जागा मिळेल त्या ठिकाणी चिमण्यांनी घरटी केली होती. त्यांतून वाखाचे दोर, चिंध्या लोंबत होत्या. इथेतिथे फडफडून चिमण्या चिवचिवत होत्या. एक टेबल, एक खुर्ची, फळा हे साहित्य होते. टेबलाला लागून लाकडी पेटी होती, ती उघडून बघितली. फळा पुसायचे फडके, रूळ, जुने रजिस्टर, हजेरीबुक, खडूची रिकामी बाक्से, दौत, टाक – सटर नि फटर. पिशवीतून आणलेली चादर काढून खाली अंथरली आणि चिलटांचा कहार वाचविण्यासाठी डोक्यावर धोतर घेऊन पडलो. असे एकाकी पडणे काही नवीन नव्हते. पण माणूसकाणूस

क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतून )

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading