बनगरवाडी..
“बाबा, पुरे झाली तालीम. मी जातो रजा काढून. तुमची तुम्ही बांधा, नाही तर नका बांधू. तुम्हा कुणाला जरुरी नाही, तर मी उगीच का रक्त आटवू ? “कारभारी माझी समजूत काढी,” लेकरा, तू गेल्यावर कुठली र इमारत ! केला एवढा आटापिटा पाण्यात जाईल. लाकडं कुजतील, दगडं पाडली ती लोक उचलतील. अरं, इमारत बांधायची म्हणजे सोपं न्हाई. तरास हुयाचाच. धा जणांचं काम म्हणजे त्यात म्हारकी आलीच. आता पत्करलंय ते कडंला नेऊ या ! “पण मी काय ते मध्येच सोडणार होतो ? छे, शक्यच नव्हते. आता तालमीची इमारत म्हणजे माझ्या स्वतःच्या यशापयशाची बाब होऊन राहिली होती. बनगरवाडीच्या अब्रूची बाब होऊन राहिली होती. आसपासची लहान खेडी कौतुकाने या वाडीकडे बघत होती. ही धनगरे, वेडी मेंढरे, यांच्या हातून असले काम कसे पार पडायचे ? मास्तर पुष्कळ हौशी आहे; पण नुसती हौस काय कामाची ? असे म्हणत होती. त्यांना दाखवायचे होते. आजूबाजूला दहापाच खेड्यांत नाही.

अशी सुरेख तालीम बनगरवाडीला बांधायची होती. या झाडे गोळा करण्याच्या मोहिमेत मी एकदा बाळा बनगराच्या रानात गेलो. बरोबर आयबू आणि आनंदा होता. विशेष गोष्ट म्हणजे बाळाच्या रानातले हे झाड आम्हांला पाहिजेच होते. तुळईसाठी त्याचा नेमका उपयोग होणार होता. आनंदाने वाटेतच बाभळीवर बसलेला व्हला गलोरीने मारला. तो तडफडू लागताच आयबूने जाऊन धरला. व्हल्याने मान टाकली. आनंदा पुन्हा झाडे हेरू लागला, आणि आयबू चालता चालता त्या मेल्या पाखराची पिसे काढू लागला. मी एकटाच त्यांच्यापुढे गेलो. दुपारी चार – साडेचारची वेळ होती. मी रानात पोचलो, तेव्हा एका जुन्या दाव्याला पड घालीत बाळा त्या लिंबाच्या सावलीला बसला होता. नुसत्या धोतराशिवाय त्याच्या अंगावर काही नव्हते. अरुंद कपाळ, पसरट नाक आणि सपाट हनुवटी असलेला बाळा एकाग्रचित्ताने तुटलेले दावे दुरुस्त करीत बसला होता. मी कशासाठी आलो आहे.
हे त्याने जाणले. आगतस्वागत केले नाही. बसासुद्धा म्हटले नाही. केवळ काही तरी बोलायचे म्हणून तो म्हणाला, “कुनीकडं दौड मास्तरसायेब? “मी हसत म्हणालो,” तुम्हांकडेच आलो होतो आवर्जून. ‘आणि खालची ढेकळे साफ करून बसलो. बाळा पुढे काहीच बोलला नाही. धीर करून मीच म्हणालो, ‘मग झाड केव्हा देताय तालमीला ? “कुठलं झाड ? “अशा उत्तराची मला आता सवय झाली होती. तरीपण कळ आली. ती चेहऱ्यावर दिसलीही असेल. वरच्या लिबाकडे बघून मी म्हणालो,”दुसरं कुठलं ? हे सावलीला बसलोय तेच द्या. मान हलवून बाळा म्हणाला, “हे मिळणार न्हाई ! “का बरं ? “माझी मर्जी. “असं म्हणून कसं चालेल ? “बघीन कसं न्हाई भागत ते. मनगटात नेट असेल तो झाड पाडील हे, आन न्हील. ‘बळजबरीनं न्यायचा प्रश्नच नाही. हा खुषीचा मामला आहे. ‘माजी खुषी न्हाई. मला गाव नको आन् तालीम बी नको. एवढं एक झाड हाय सावलीला माझ्या रानात.
माजी गुरंढोरं, मुलंमाणसं सावलीला बसत्यात घटकाभर, ते तुमी नेता ? मी देणार न्हाई. झाडावर कु-हाड घालायच्या अगुदर माझ्या नरड्यावर घाला अन् मग खुशाल न्या. “बराय ! “एवढेच म्हणून मी उठलो आणि गावाकडे चालू लागलो. वाटेत आयबू नि आनंदा भेटले. “मिळालं का झाड मास्तर बाळाचं ? “मी म्हणालो, “नाही. तो म्हणतो, आधी कुन्हाड माझ्या गळ्यावर चालवा आणि मग झाडावर!’ त्यानंतर कारभारी, रामा, आणखी चारचौघे जण मिळून आम्ही बाळाकडे गेलो, तेव्हाही तो तुटक्या दाव्याला पड घालीत लिंबाच्या सावलीला बसला होता. त्याची शेरडे आजूबाजूला कान हलवीत बसली होती. बायको – पोरे बसली होती.
त्याच लिंबाच्या सावलीत त्याने आपले दोन्ही बैल बांधले होते. त्याचा धनगरी कुत्राही अंगाचे वेटोळे करून बसला होता. आम्ही जाताच कु-हाड घेऊन बाळा उठला. आम्ही जागच्या जागी थांबलो. हा महाकाय माणूस थेट मारामारीवर येतो काय, या शंकेने मी सर्द झालो. आणि बाळा कु-हाड घेऊन आमच्याकडे आला. त्याला तसे येताना पाहून कारभारी पुढे झाला. बाकी कुणाचा पाय जागचा हलला नाही; पण वयाच्या उताराला लागलेला कारभारी जोडा ओढीत पुढे झाला आणि बाळाने जवळची कु-हाड त्याच्या हातात देऊन म्हटले, ‘काल मास्तराला सांगतलं होतं, झाड तोडन्याअगुदर माजी मान तोड. आता तुमाला सांगतो ‘एवढेच बोलून तो वळला आणि लिंबाखाली बसलेल्या आपल्या परिवाराकडे बोट करून म्हणाला, “ह्या इतक्या जनावरांच्या, मानसांच्या माना तोडा आन् मग झाड तोडा ! ” त्याच्या हाताला धरून कारभाऱ्याने त्याला सावलीत नेले, खाली बसवले. म्हणाला, “बाळा, गप बैस आन् माजं ऐकून घे.
“म्हाताऱ्याच्या हाताला हिसका मारून बाळा उठून उभा राहिला आणि हातवारे करून म्हणाला, “मी कुणाचं ऐकणार न्हाई. तुम्ही लोक मला मातीत घालाल. मी तालमीला बळ देणार न्हाई, झाड देणार न्हाई. मग काय होणार ते होईल ! “कारभारी अजूनही शांत होता. “तू उगीच उतू जाऊ नगंस बाळा. गावासाटनं एक झाड दिल्यानं तुझं घर बुडायचं न्हाई. “बुडू ना बुडू , पर मी झाड देणार न्हाई. “हे पक्कं का ? “हां, पक्कं. पंतसरकार आला तरी मी झाड देणार न्हाई, इंग्रजसाहेब आला तरी देणार न्हाई. काय कोन मला फासावर देणार हाय ते दिऊ दे! “एवढे ऐकल्यावर कारभारी म्हातारा परत फिरला आणि हात करून म्हणाला,” हां, चला माघारी ! “सगळेच जण बाळाच्या उर्मटपणाने तापले. त्याच्या रानात सावलीसाठी एवढे एकच झाड होते ही गोष्ट तितकीशी खरी नव्हती. बांधावर लहानलहान लिंबाची झाडे होती. त्याला अगदीच उन्हात बसायला लागणार नव्हते. कारभारी चला म्हणाला तरी रामा बनगर हलला नाही. तो जोराला येऊन म्हणाला, “बाळा, हे बरं न्हवं. तू पांढरीला डावलतोयस ! “बाळा ओरडून म्हणाला, ‘मला पांढरीची जरूर न्हाई. आज आठ साल मी माज्या जमिनीत हातोय. हितनं फुट हाईन. मला पांढरीचा धाक कशाला दाखवतोस ! बोडकीला बावाचा धाक काय रं राम्या? “हे ऐकून रामा, आनंदा चवताळून बाळाच्या अंगावर जाऊ लागले, तेव्हा कारभाऱ्याने हातातले दांडके हाणून त्यांना मागे ढकलले.
करारी आवाजाने तो बाळाला म्हणाला, “बाळा, बोललास हे कडंपतूर ने. पांढरीपाशी कदी येऊ नकस . ‘आणि एकमेकांशी काहीही न बोलता आम्ही सर्व जण रानातून गावात आलो. गावापाशी येताच म्हातारा म्हणाला, “या बाळ्याला कुनी इच्यारू नका, त्येची जनावरं आपल्या रानातून जाऊ दिऊ नका. त्येची नङ अडचण जाणू नका. बगू दे मला किती कड काढतो तो !” लवकरच ही बातमी सगळ्या वाडीत झाली. बाळा बनगराला वाळीत टाकले, ही बातमी पोराटोरांनासुद्धा समजली, आणि ती लगोलग अमलातही आणली गेली. बाळाचा पोरगा बकरे कापण्यासाठी आयबूला बोलवायला आला, तेव्हा आयबूने साफ सांगितले,
क्रमशः..
स्त्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन
