बनगरवाडी..
जगन्या तिला उठवू लागला आणि पोरे जवळ येऊन भिडल्याचे त्याने बघितले. मग कोसळलेल्या मादीला सोडून काळवीट जसा जीव घेऊन पळतो तसा जगन्या बाईला तशीच सोडून धावू लागला. बाईपाशी येताच पोरे थबकली, प्रण आनंदा मात्र जगन्याच्या पाठोपाठ पळू लागला. बराच वेळ त्यांची ही शर्यत चालू राहिली. पण जवान जगन्या आनंदाला आवरेना. शेवटी अंतर आटोक्यात आलेले बघून आनंदाने हातातली कुऱ्हाड फेकून मारली. पळते हरण व्हलपाडून पाडावे तसा जगन्याला कुऱ्हाडीच्या व्हलपाड्याने पाडला. पळून पळून दमछाट झालेला जगन्या गुरासारखा ओरडून खाली पडला. आनंदाने गाडीत घालून त्या दोघांना वांगीला नेले. पायातून रक्त जाऊन जाऊन जगन्या पांढराफटक पडला होता. ती बाई आपल्या मरणानेच मेली होती. आनंदा म्हणाला, “ही तुमची बाई आन् हा आमचा पोरगा. मी माज्या हातानं त्याला मारलाय. शिलकी असलेला जीव तुमाला घ्याचा असेल तर घ्या ! “

जगन्या भानावरसुद्धा नव्हता. त्याचे धोतर, अंगरखा रक्ताने भिजून गेली होती . लोकांनी बाईला दांडक्याने मारीत घरात नेले आणि आनंदाला म्हटले, “ ने, जा तुझ्या गावी नेऊन जाळा त्याला ! ” जगन्याला घेऊन आनंदा वाडीला आला. झाडपाला वापरून या अडाण्यांनी जगन्याच्या पायाची जखम बरी केली. वांगीच्या लोकांनी त्या बाईचे सुरेख नाक कापून टाकले, आणि तिला गावातून हाकलून दिले. नाकाला पट्टी बांधून ती जगन्याच्या घरात आली आणि रडरड रडली. तिला कुणी रामोसवाड्यात ठेवून घेईना. मग एके दिवशी उठून ती निघून गेली. त्यावर पुन्हा कुठे दिसली नाही.
जून आला. मृग निघाला. हे नक्षत्र केव्हाच नीट न पडणारे ते याही वर्षी वाडीच्या भागात पडले नाही. दर वर्षी निदान भीजपाऊस पडतो, पण तोही पडला नाही. नक्षत्र कोरडेच गेले. लोक आडदराची वाट पाहू लागले. आता सर्वत्र उजाड दिसत होते. रानातून फिरून मेंढरे उपाशीपोटी माघारी येत होती. सुगीच्या वेळेला साठवून ठेवलेला वाळला पाला, भुस्कट, असले काहीबाही पुढे टाकून मेंढके मेंढरांची पोटे भरत होते. पाऊस पडून हिरवळ केव्हा होते याची वाट बघत होते. याच सुमारास कारभाऱ्याला उजाडता उजाडता एक वाईट स्वप्न पडले. कमरेला कडूलिंबाचे डहाळे बांधलेली, केस सोडलेली, मळवट भरलेली एक बाई आली. म्हणाली, “ मी तुला नेण्यासाठी आले आहे. तयारी कर. “
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
