बनगरवाडी…
“म्हाताऱ्याने भिऊन विचारले, “कुनीकडं ? ”बाई म्हणाली, “देवाच्या घरी. तयारी कर. उद्या जायचं. ‘आणि कारभारी दचकून उठला. घामाघूम होऊन अंधारातच अंथरुणावर बराच वेळ बसून राहिला. भल्या सकाळी, मी अजून जागा होतो आहे – नाही तोवर माझ्याकडे आला. अंथरुणाच्या कोपऱ्यावर बसून माझ्या पायाला हात लावून त्याने नमस्कार केला. मला काही कळेना. कारभारी म्हणाला, “शेवटचा रामराम, मी चाललो! ‘मी आल्यापासून या म्हाताऱ्याने गाव सोडल्याचे मला माहीत नव्हते. “कुणीकडं चालला ? येणार कधी ? “म्हातारा म्हणाला, ” चाललो आता – माघारी येणं न्हाई !” ” म्हणजे ?” ‘उद्या सकाळपातूर मी मरणार ! “ही काही थट्टा नव्हती. म्हातारा खरोखरच गंभीरपणे बोलता होता.

मी हसून चेष्टा केली तेव्हा त्याने पडलेले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, “वेडे की काय तुम्ही कारभारी ! स्वप्नं कधी खरी होतात का ?” कारभारी म्हणाला, “होतात लेकरा. माजी झाल्यात.” ” छे, उगाच काहीतरी डोक्यात घेतलंय तुम्ही पोराठोरासारखं. कळत्या माणसानं असं केल्यावर कसं व्हायचं? “म्हातारा वरचेवर निरवानिरवीच्या गोष्टी करत होता; पण मी त्याचं काहीच मनावर घेतले नाही. शेवटी ” मी माजं सगळं अंजीला देनार हाय. तिला शेकूबाच्या हवाली करतो. तो तिला सांभाळील. तिचं लगीन करील. तुमचं ध्यान असू द्या …. असे सांगून तो उठला आणि बाहेर दिवसभर हिंडून कारभाऱ्याने ही गोष्ट सर्वांना सांगितली.
सर्वांचा निरोप मागितला. या खुळेपणावर कोण विश्वास ठेवणार ? पुष्कळांनी चेष्टा केली. म्हाताऱ्याचे बोलणे कुणीच मनावर घेतले नाही. असला भोळसट शेकू, पण तोसुद्धा म्हणाला, ” नाना, मरायला काय धाड झालिया तुला ? अजून पाच वर्स ङग न्हाई तुला – जा घरी. ‘कुणी काहीही म्हटले, टवाळी केली, चेष्टा केली, तरी जी जी लोभाची माणसे होती त्या पडला.
त्याला सर्वांना भेटत कारभारी त्या दिवशी सर्व दिवस हिंडत होता. शेवटी संध्याकाळ झाली, मेंढरे रानातून परत आली आणि कुणी तरी मला सांगत आले. “चला, कारभाऱ्याला ढाळवांत्या होऊ लागल्यात. “धावतपळत मी गेलो. म्हाताऱ्याची पार दशा दशा झाली होती. डोळे ओढले होते. तोंड वाळले होते. बोलणेसुद्धा सुधरत नव्हते. मी जाताच तोंडातल्या तोंडात तो म्हणाला, “खोटं न्हाई बाबा, मला बोलावणं आलंय. “मी दटावून म्हणालो, “हॅ : ! काही नाही बोलावणं आलं. उद्या सकाळपर्यंत खडखडीत बरे व्हाल.” घरगुती इलाज सुरू झाले. हे दे, ते पाज, ते चाटव – पण मध्यान्हरात्र झाली तरी काही उपयोग नाही. मग सर्वांचा धीर सुटला.
अंजी, शेकू रडू लागली. म्हाताऱ्याच्या नातलगांच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून, ते रडणे ऐकून कारभारी म्हणाला, ‘अरे, रडता कशापायी ? माजं काय व्हायलंय? एवढा मोठा पंतसरकार, त्यानं सुदीक मला ‘काय पाटील’ म्हनलं. माज्या पाठीवर हात ठेवला . माजं काय व्हायलं न्हाई आता. सूर्योदयाला म्हातारा कारभारी मरून गेला! एक म्हातारा माणूस गेला आणि वाडी सुनी दिसू लागली. माझ्यामागे आता कोणी राहिले नाही असे उगीच मला वाटू लागले. ती शाळा, ती तालीम – यांविषयी उदासीनता वाटू लागली. घरी गेलो म्हणजे आठआठ दिवस मी शाळेला येईनासा झालो. “
एकदा, कधी नव्हे ती शेकूची मुंडाहात उंच बायको माझ्याकडे आली. दुपारची वेळ होती. जेवण करून मी वाचत बसलो होतो. शेकूची बायको आली आणि दारापाशी अंग चोरून उभी राहिली. मी सावरून बसलो. ती म्हणाली,” काय चाललया मास्तर ? ” मी म्हणालो , “काही नाही. जेवण झालं आत्ताच . वाचीत बसलो होतो. बसा की. ” माझ्या या बोलण्याने तिचा संकोच थोडाफार कमी झाला असावा. पदरात आणलेल्या शेरभर भुईमुगाच्या शेंगा तिने खाली ओतल्या आणि म्हटले, “शेंगा खावा. दुसरं काय हाय देन्यासारं आमापाशी ?” ” पण मास्तराला काहीतरी दिलंच पाहिजे, असं कुठं आहे ! बसा की. ”तरीही शेकूची बायको बसली नाही. तिला काही बोलायचे आहे, हे मी ओळखले.

म्हाताऱ्या कारभाऱ्याने मरताना अंजीला शेकूच्या हवाली केले होते.“ हिचे सरळे लावून दे” असे सांगितले होते. म्हातारा मेल्यापासून अंजी शेकूच्या घरी राहत होती. त्याच्या घरी राहून अंजीने त्याला घेरात घेतले होते. वयाने पस्तिशी ओलांडलेला शेकू अंजीच्या नादी लागला होता. ही कुणकूण माझ्या कानी आली होती. पण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. ही कुणीतरी उगीच वावडी सोडली असावी, असे वाटत होते. हेच काही सांगण्यासाठी ही बाई आली नसेल ना, असा एक विचार माझ्या मनी येऊन गेला. पण असल्या गोष्टी कोण दुसऱ्यापाशी बोलेल ? शेकूची बायको बसतही नव्हती आणि काही बोलतही नव्हती. त्यामुळे मला मोठे अवघडल्यासारखे झाले. आपण होऊन काही विचारावे, तर तेही सुचत नव्हते.
शेवटी उगीचच म्हटले, ” काय म्हणते शेतीवाडी ? ” मग मात्र शेकूची बायको उंबऱ्यालगत दोन पायांवर बसली आणि हाताचा मुटका गालावर टेकून म्हणाली, ‘आमच्या मालकांस्नी का करावं वं मास्तर ? ” मी म्हणालो, “का , काय झालं ? “वास्तविक मला सगळे कळले होते; पण तसे कसे म्हणू ? निदान ही गोष्ट चारचौघांत झाली नाही, एवढे समाधान तरी तिला लाभले असते. यावर भुईकडे नजर लावून ती म्हणाली, “ मान सांगावा लोकाला, अपमान ठिवावा आपल्याशी. पर ह्येनी अगदी ताळच सोडला हे असलं वागणं काय खरं का ह्येचं ? ” मी म्हणालो, ” काय कुरबूर झाली का ? ” बघा.
क्रमशः
स्रोत:(व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी या कादंबरीतुन)
