बनगरवाडी
पुढच्या आठवड्याला निघालो तेव्हा रामाने बारा रुपये माझ्यापाशी दिले. ते मी अठरा आण्यांप्रमाणे मोडून आणून दिले. पानतमाखूला चार आणे घेण्याबद्दल रामाने पुन्हा आग्रह केला. मी नाही म्हटले. मग त्याने रात्री मला घराकडे बोलावले. त्या अंधाऱ्या घरात मी वाकून शिरलो. तेव्हा चुलीपुढे चिलीम ओढीत एक साठ – सत्तर वर्षांचा म्हातारा बसला होता. रामाची बायको आतबाहेर करत होती. बसायला कांबळे टाकून रामाने शेरडाचे दूध थाळीतून प्यायला दिले. ते निवण्याची वाट पाहत मी थांबलो, तेव्हा चुलीपुढच्या म्हाताऱ्याकडे बघून तो म्हणाला, ” ह्यो माजा बा. म्हाताऱ्याने अंगावर लपेटून घेतलेल्या पांघरुणातून गडबडीने हात काढले आणि रामराम केला. रामा म्हणाला, “ सत्तर वरसं झाली.

आठ वर्साचा हुता तवाधरनं मेंढरं राखतोय, त्याला दुसरं काय ठावं न्हाई ! ” वयाच्या आठव्या वर्षापासून आजतागायत या माणसाने मेंढरे राखण्यावाचून दुसरे काही केले नव्हते! आणि आजही तो तेच करत होता. नातवाबरोबर दिवसभर मेंढरांमागे हिंडत होता. तोंडावर सुरकुत्यांचे जाळे झाले होते. केस पार पिकून गेले होते, तरी हा म्हातारा हातात काठी घेऊन मेंढरांमागे जात होता. त्याला दुसरे काही ठाऊक नव्हते. बैलगाडी कशी जुंपतात हे त्याला सांगता आले नसते. पण कुत्र्याला यावा तसा लांडग्याचा वास त्याला येत असे. रानात रात्रीच्या वेळी मेंढरे खतासाठी बसवली असली म्हणजे एकाएकी म्हातारा नाक सुरू सुरू करून म्हणे, ” पोरानूं सावध व्हा रे, लांडगा हाय आसपास ! ” पोरे तयार होत. कुत्री कावरीबावरी होऊन बघू लागत आणि दूर उंचवट्यावर उभा राहून टेहळणी करणारा लांडगा दिसे! राखणीला सावध बसून बसून त्याला अशी सवय झाली होती की अंग पसरून झोपण्याचे तो विसरलाच होता! बैल, घोडा जसा बसल्याबसल्या झोप घेतो तसा हा म्हातारा बसल्याबसल्या झोप घेई. जमिनीवर आडवे पडण्याची त्याला मुळी गरज वाटत नसे! एकमेकांच्या खांडांत मिसळलेली मेंढरे मेंढके कशी ओळखतात हे आपल्याला कोडे वाटते, पण म्हातारा काकुबा धनगर फारच पुढे होता.
नव्याने मेंढरे करायची झाली तर मालकाला मेंढरे विकत घेऊनच सुरुवात करावी लागत नाही. असा माणूस खोबऱ्याची एक वाटी आणि त्यावर थोडा भंडार घालून चांगल्या मेंढक्याकडे जातो आणि ती खोबऱ्याची वाटी देऊन त्याला म्हणतो, “ मी बेणं करतोय. ” मग तो मेंढका आपल्या खांडातील शेलके मेढरू काढून ते मागणाराला मोफत देतो. अशी दहापंधरा मेंढरे मिळवून सुरुवात केली जाते आणि दोनतीन वर्षात बियाणे मागणारा दुसऱ्यास बियाणे देऊ शकतो. मात्र बियाणे म्हणून आणलेली मेंढरे विकायची नाहीत, कापायची नाहीत, हा नियम पाळला जातो.काकुबाकडून एकदा दोनपाच मेंढरे एका परगावच्या इसमाने नेली. पुढे एकदोन वर्षांनी म्हातारा त्या गावी गेला, तेव्हा त्या इसमाने चुकचुकून म्हटले, “काकू, तुजी चार बी मेंढरं मेली ! “ मेली ? त्यांची काही वाढ गा ? “न्हाई. वाढ न्हाई, काही न्हाई. बीमोडच झाला! “म्हाताऱ्याला हे खरे वाटले नाही. तो म्हणाला, “ तुझा वाडा मला दाखव. त्या इसमाने तो दाखवला. बराच वेळ मेंढरे बघत म्हातारा हिंडला आणि काही वेळाने त्याने आपल्या मेंढरांची संतती शोधून काढली. तो म्हणाला, “ ही दोन पोरं माझ्या मेंढीची हायेत!” आणि ही गोष्ट खरी होती. खजील झालेल्या त्या इसमानेही ती कबूल केली. रामा बनगराने आपल्या बापाविषयी ही माहिती सांगितली, तेव्हा मला नवल वाटले.
मी काकुबाला विचारले, “ काकुबा, हे तुम्ही कसं ओळखलं ? “म्हातारा म्हणाला, ” त्याचं तोडगं असत्यात लेकरा. चेहरा, रंग, रूप कळल्याशिवाय कसं राहील? आता तू हायेस – तुज्या बाचं, तुज्या आईचं, तुज्या आज्याचं कायतरी तुज्यात उतरलं असंलच की. नाक म्हन, डोळे म्हन – कायतरी सारखं असंल! “मग रामाने मला थोडे आत नेले. दिव्याच्या प्रकाशात तो आत गेला आणि एक लहान मडके घेऊन बाहेर आला. त्यात चांदीचे नगद रुपये होते. बुचड्याच्या छापाचे! मी बघतच राहिलो. या धनगराकडे एवढे पैसे असतील अशी कधी चुकूनही शंका मला आली नव्हती. रामा म्हणाला, “लईंदी साठवत आलोय बग. हे मोज आन् संग घिऊन जाऊन मोडून आन. “मी ते रुपये मोजले. तीनशेचाळीस भरले. आकडा सांगताच रामाने तो मानला आणि पैसे बिनघोरपणे माझ्या हवाली केले. मास्तराने पाच रुपये कमी मोजले असतील, किंवा एवढे पैसे मास्तर खाऊन टाकील, अशी शंका त्याला आली नाही. मी म्हणालो, “ रामभाऊ , हे इतके पैसे मोडायचे, नवे रुपये तुम्हांला द्यायचे म्हणजे काही दिवस लागतील. तुम्हांला नड नाही ना ?

“रामा म्हणाला, “ सावकाश मोड. महिनापंधरादी लागले तरी हरकत नाही. ‘मी उठून घरी आलो. मे ‘महिना संपला आणि जून आला. उन्हाळा संपला, पावसाळा आला. इंद्रगोप दिसू लागले आणि मृग निघाला. आभाळ झाकोळून आले. स्वच्छ ऊन नाहीसे झाले. वारा सुटला. झाडेझुडे गदगदू लागली. धूळमाती चौफेर उडू लागली. आभाळाकडे बघून लोक म्हणू लागले, ‘वारा पाऊस घालवील. ‘पण तसे झाले नाही. सडासडा धारा आल्या. मृगाचा पाऊस बनगरवाडीला झोडपत राहिला. भटकी कुत्री भिंतीच्या आडोशाला उभी राहिली. लवकर उघडीप होण्याचे दिसेना. धनगरांची धावाधाव झाली. डोक्यावर रिकामे पोते घेऊन त्यांनी वाड्यात भिजणारी मेंढरे काढून झोपड्यात आणली. घरात दाटीवाटीने उभ्या राहिल्या राहिल्या मेंढरांनी अंगे झाडली. भिजल्या लोकरीच्या वासाने धनगरांची घरे दरवळली. सरीवर सरी आल्या. तापलेल्या जमिनीतून वाफा निघाल्या. धूळ उडाली.
चिखल झाला आणि मग गेला. खडे उघडे पडले. काडाने शाकारलेली घरे गळू लागली. सुरेख सारवलेली जमीन ठिकठिकाणी ओली होऊन उखणू लागली, तेव्हा धनगरणी चरफडल्या आणि गळणाऱ्या जागी त्यांनी लहानमोठी भांडी ठेवून दिली. मेंढरांच्या धडपडीतूनही भरलेल्या भांड्यांत ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज कान किटवू लागला. धाब्याच्या घरातून गळू लागले. तेव्हा डोक्यावर रिकामी पोती घेऊन धनगर माळवदावर चढले. जिथे पाणी साचले होते, माळवदाला भोक पाडून आत शिरत होते, ती भोके त्यांनी दगडमाती घालून तात्पुरती बुजवली. हवेमध्ये गारवा आला. धनगरांच्या कुऱ्हाडींवर गंज धरू लागला आणि धनगरणींनी साठवून तोही वाहून..
क्रमशः
स्रोत: (व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी कादंबरीतुन)
