दिनांक १० एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त श्रीगोंदा शहरात सकल जैन संघाच्या वतीने भव्य आणि भक्तिमय सोहळा पार पडला. इ.स. पूर्व ५९९ मध्ये कुंडलपूर नगरीत जन्मलेले श्रमण भगवान महावीर यांचे जीवन सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि तप या मूलतत्त्वांवर आधारित होते. त्यांच्या या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन जैन समाजाने या पवित्र दिवसाचे औचित्य साधून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले.

यावर्षी प्रथमच संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांतील जैन बांधवांनी एकत्र येत भगवान महावीरांचा जन्मकल्याणक दिन एकाच ठिकाणी – श्रीगोंदा शहरात – मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाला तालुकाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी ७ वाजता जैन स्थानक श्रीगोंदा येथून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची शोभायात्रा सुरू झाली. शिवाजी चौक, शनी चौक, जोधपूर मारुती चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा बालाजी मंगल कार्यालयात पोहोचली. शोभायात्रेत जैन बांधवांनी पारंपरिक पांढरे वस्त्र तर भगिनींनी सौभाग्याचे प्रतीक असलेले लाल वस्त्र परिधान करून शोभायात्रेस अद्वितीय स्वरूप प्राप्त करून दिले. विशेष म्हणजे, या शोभायात्रेदरम्यान पर्यावरणपूरक व स्वच्छतेचा संदेश देत कुठेही कचरा न करता शिस्तबद्धतेने मार्गक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण शहरात जैन समाजाच्या या उपक्रमाची चर्चा रंगली.

बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या प्रमुख कार्यक्रमात सटाण्याहून आलेले सन्मा. श्री आनंदजी बंब यांनी भगवान महावीरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंगांवर प्रकाश टाकत जैन बांधवांना मार्गदर्शन केले. त्याचवेळी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासोबतच आनंद सद्भावना मंडळांच्या वतीने शहरालगतच्या जंगलांमध्ये वन्यजीवांसाठी पाणवठ्यांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या भव्य कार्यक्रमास माजी मंत्री मा. आ. बबनदादा पाचपुते, सौ. अनुराधाताई नागवडे, मा. आमदार राहुलदादा जगताप तसेच विविध माध्यमांचे पत्रकार बंधू व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयजी मुथा यांनी केले. सकल जैन संघाचे अध्यक्ष विजयजी बोरा यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांचे स्वागत व समाजाची एकजूट अधोरेखित केली. महाप्रसादाची व्यवस्था लोकेश दिलीप मेहता व वैभव दिलीप मेहता यांनी केली होती. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नवनीत मुनोत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. श्रीगोंदा शहराने या पवित्र प्रसंगी धर्म, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर मिश्रण अनुभवले.
स्रोत:(पत्रकार धनेश गुगळे)
