जुन्नरमध्ये महिलांचे दागिने हिसकावणारे श्रीगोंद्यातील दोघे अटकेत; पाच जबरी चोरींचा पर्दाफाश, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त..

दिनांक ९ एप्रिल २०२५, जुन्नर/श्रीगोंदा:

महिलांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ८ तोळे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ७,१६,७९३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडून जबरी चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

११ मार्च रोजी इंदुबाई विठ्ठल पानसरे (वय ६०, रा. पिंपळगाव सिद्धनाथ, ता. जुन्नर) या आपल्या जुन्या घराकडे जात असताना दोघा अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील १,८०,००० रुपयांचे सव्वा दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि माळ हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांनी स्प्लेंडर मोटारसायकलचा वापर केल्याचे निष्पन्न केले. पुढील तपासात ही दुचाकी शिरूरच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल सोमनाथ गव्हाणे (वय ३१) आणि अनिल नारायण गव्हाणे (वय २५, दोघेही रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

त्यांच्याकडून जुन्नर, शिक्रापूर, शिरूर, आळेफाटा परिसरातील अशा प्रकारचे पाच गुन्हे उघडकीस आले असून ७ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली परि. उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री धीरबस्सी, जुन्नर पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर व त्यांच्या पथकाने केली.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading