दिनांक १५ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या पदभार ग्रहणानंतरचे काही फोटो सामाजिक माध्यमांवर वायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये शिंदे यांच्या कार्यालयात वाढदिवस साजरा होत असल्याचे दिसत आहे, तर, काही सत्काराच्या फोटोतील व्यक्ती हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समोर आले आहे. यामुळे श्रीगोंदा शहरासह तालुक्यात या सत्कारासह वाढदिवसाची चर्चा सुरू आहे.
फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयातच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशा सार्वजनिक कार्यक्रमात आणि शुभेच्छा देणाऱ्या लोकांत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींची उपस्थिती असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे शहरातील पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच श्री. किरण शिंदे यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर लगेचच हा वाढदिवस सरकारी कार्यालयात साजरा झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या घटनेमुळे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे अवैध धंदे करणाऱ्या लोकांशी पूर्वीपासून संबंध असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
यापूर्वी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी आपल्या हद्दीतील पाच जिल्ह्यांत सरकारी कार्यालयात वाढदिवस किंवा सत्कार समारंभ आयोजित करण्यावर बंदी घातली होती. सरकारी कार्यालयात अशा खाजगी कार्यक्रमांचे आयोजन करणे हे गैरकृत्य असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले होते. या घटनेनंतर काही कायदे अभ्यासकांनी शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असे सूचित केले आहे.
श्रीगोंदा शहरातील वाढत चाललेले अवैध धंदे आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींनी पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या कार्यालयातच वाढदिवस साजरा केला असल्याने या प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला आहे. पोलीस प्रशासन आणि गुन्हेगारी व्यक्तींमधील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
स्रोत:(FB वरील फोटो)





