श्रीगोंदा तालुक्यातील जवानाचा मृतदेह कोलकात्यात आढळला; अपघात की घातपात याचा तपास सुरू..

दिनांक २५ जुलै २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी गावचा लष्करी जवान ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७) यांचा मृतदेह कोलकात्याजवळील खरगपूर परिसरात रेल्वेमार्गाशेजारी सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा मृत्यू अपघातामुळे झाला की घातपात होता, याचा तपास लष्करी पथक आणि पश्चिम बंगाल पोलीस करत आहेत.

ज्ञानदेव अंभोरे हे कोलकात्यातील पायोनियर आर्मी युनिट-१८०३ मध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. २००४ पासून ते सैन्यदलात कार्यरत होते आणि लवकरच निवृत्त होण्याच्या तयारीत होते. १५ जुलै रोजी ते सुट्टीसाठी गावी येण्यासाठी निघाले होते. त्या रात्री ९:०० वाजता त्यांनी पत्नीला कॉल करून आपण हावडा रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर १६ जुलैपासून त्यांचा संपर्क पूर्णतः तुटला.

कुटुंबीयांनी कोलकात्यातील त्यांच्या युनिटशी संपर्क साधल्यानंतर लष्करी पथकाने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, खरगपूर परिसरात रेल्वेमार्गाशेजारी १६ जुलै रोजी आढळलेला एक बेवारस मृतदेह अंभोरे यांचाच असल्याचे २२ जुलै रोजी स्पष्ट झाले.

तपासादरम्यान पुणे रेल्वे स्थानकावर ‘आझाद हिंद एक्स्प्रेस’मध्ये आढळलेली बेवारस बॅग अंभोरे यांची असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांच्याकडे असलेली दुसरी बॅग, ज्यामध्ये ओळखपत्र व महत्त्वाची कागदपत्रे होती, ती अद्याप सापडलेली नाही. विशेष म्हणजे, त्यांचा मोबाईलचा शेवटचा लोकेशन महाराष्ट्रात दाखवतो, ही बाब संशयास्पद मानली जात आहे.

या प्रकरणी अपघाताची शक्यता असली तरी लुटमार करून रेल्वेतून खाली ढकलल्याचा संशयही वर्तवण्यात येत आहे. लष्करी अधिकाऱ्यांसह पश्चिम बंगाल पोलिसांकडून याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading