दिनांक ८ जुन २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी समितीचे सचिव आणि आडते व व्यापारी अशा १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण दिनांक १ मे २०२३ ते १ जुलै २०२३ दरम्यान घडले. आरोपींमध्ये सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा. वेळु, ता. श्रीगोंदा), आडते/व्यापारी हवालदार ट्रेडींग कंपनी व त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्स, घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रय किसन राऊत (रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा. श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा. श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिंबीरे (रा. साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी कडेवळीत) यांचा समावेश आहे.
फिर्यादी राजेंद्र फकिरा निकम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ४६५ (कागदपत्रांची बनावट), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने कागदपत्रांची बनावट), ४७१ (बनावट कागदपत्रांचा वापर), ४७७(अ) (लेखापरीक्षणाची फसवणूक) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक ज्ञनेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुकेशकुमार बडे यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रभाकर निकम करीत आहेत.
स्रोत: (फिर्याद)


