ध्येयवेडे आण्णा..

शिक्षण घेत असताना स्वतःला भरण्यासाठी परीक्षा फी नव्हती. परीक्षा फी भरण्यासाठी लोकांनी वर्गणी केली. परीक्षा देता आली. मात्र, पुढचे शिक्षण घेता आले नाही. ही खंत कायमच मनामध्ये होती. यातून श्रीगोंदा शहरात मुरलीधर अण्णा होनराव यांनी गोरगरीबासाठी शिक्षणांचे मंदिर उभे केले. आजपर्यतच्या अठ्ठावीस वर्षाच्या वाटचालीमध्ये या मंदिरासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले. श्रीगोंदा शहरासह परिसरातील सर्वांच्या शारदा शिक्षण संकुलावरील विश्वासामुळे शाळेची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली. संस्थापक अध्यक्ष मुरलीधर (अण्णा) होनराव यांचा हा शिक्षणप्रवास ..

स्वत:चे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे पुर्ण करता आले नाही.आण्णा यांना स्वतःच्या परीक्षेसाठी वर्गणी करावी लागली. त्यामुळे अण्णांना अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले. अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत १९५२ साली हॉटेल व्यवसाय सुरु केला. संसार चालण्यासाठी व्यवसाय सुरु केला खरा पण अधु – या राहिलेल्या शिक्षणांची खंत कायम होती. परीक्षा फी साठी लोकांनी केलेली चार आण्याची मदत अण्णा विसरू शकत नव्हते. लोकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मन सतत बैचेन असायचे. आण्णाच्या मनावर गांधीवादी विचारप्रणालीचा पगडा होता. श्रीगोंद्याचे स्वातंत्र्यसेनानी बाबूमिया बँण्डवाले यांच्या विचाराने आण्णा प्रभावित झाले . लोकांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी शिक्षण संस्था काढण्याची ध्येय उराशी बाळगले. गोरगरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यासाठी सातत्याने परिश्रम त्यांनी उपसले.

शिक्षण संस्था उभी करण्याअगोदर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सातत्याने मदत करत असत. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय साहित्याचे वाटप अण्णांनी केले. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत एका मुलीचेप दवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. हूशार व गरीब असलेला ज्ञानेश्वर टपले याचे डीएड पर्यंतचे शिक्षण अण्णांनी पूर्ण केले.

मनातील खंत अण्णांना स्वस्थ बसू देत नव्हती. १९८८ साली वनस्थळी संस्थेची बालवाडी सुरु करून दोन वर्षे चालविली. १९९० साली श्रीगोंदा तालुका शैक्षणिक व सांस्कृतिक प्रसार मंडळ नावाची संस्था रजिस्टर केली. बाबूमिया बँण्डवाले व मित्र दिवंगत शिवाजी बापू नागवडे यांच्या हस्ते बहिणीच्या जागेवर रोपटे लावून श्रीगोंदा येथे शारदा विद्या निकेतन चा संस्थेचा श्रीगणेशा केला. संस्कारक्षम शिक्षण राष्ट्राची घडण या ब्रीदवाक्यानुसार हे ज्ञानमंदिर अवघ्या ५ ते ६ विद्यार्थी संख्येवर सुरु झाले. पहिलीपासून सुरु झालेले वर्ग चौथीपर्यत गेले पण शासनाची मान्यता मिळेना. शासन दरबारी अर्ज, विनंत्या केल्या पण सगळे फोल ठरले. यादरम्यान विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती ना.स.फरांदे यांनी शाळेला मान्यता मिळवून दिली. सलग सहा वर्षे केलेल्या कष्टाचे चीज झाले. पुढे वर्ग वाढत गेले. सातवीपर्यंतच्या शाळेला मान्यता मिळाली . पुन्हा दहावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले. या दोन वर्गाच्या मान्यतेसाठीही अडचणी आल्या पण अण्णा मागे हटले नाहीत. खंडपीठात दाद मागितली. या कामी माजी मंत्री बबनराव पाचपुचे व त्यांचे स्वीय सहाय्यक लालासाहेब फाळके यांची मदत लाभली. या सर्वाच्या बळावर संस्थेचा शिक्षणाचा हा आलेख उंचावतच होता. २००४ साली उच्च माध्यमिकचे वर्ग सुरु केले. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे वर्ग आज विनाअनुदान तत्त्वावर सुरु आहेत. आज आण्णांच्या परिश्रमामुळे हे ज्ञानमंदिर श्रीगोंदा शहराचे भूषण बनले. आज बालवाडीपासून बारावीपर्यत सुमारे अठराशे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. संस्थेच्या प्रवासात अनंत अडचणी आल्या. संकटे आली परंतु हे शिवधनुष्य न डगमगता आजही अण्णा पेलावत आहेत. स्वत:ची स्थावर मालमत्ता, राहते घर पतसंस्थेकडे तारण ठेवून काढलेले कर्ज स्वत:च्या शिरावर आहे. हे कर्ज जरी असले तरी लोकांच्या ऋणातून उतराई होता. आल्याचे समाधान आण्णांच्या चेह – यावर सातत्याने दिसून येते.

आण्णांच्या शिक्षणरूपी संसारात खंबीर साथ दिली ती धर्मपत्नी सुनंदा होनराव यांनी. शाळेला कपाट घेण्याची ऐपत नव्हती. तेव्हा सुनंदा यांनी घरातील कपाट संस्थेला दिले. तुटपंज्या मानधनावर काम करुन आजच्या वैभवापर्यंत संस्था आणण्याचे काम शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे हे शक्य झाल्याचे अण्णा सांगतात.

विश्वस्त मंडळाचे मौलिक मार्गदर्शन व धर्मपत्नी सुनंदाची खंबीर साथ यामुळे गेल्या २८ वर्षात आलेल्या अडचणी, सोसावे लागलेले कष्ट विसरता येत नाहीत. आज वयाच्या ८६ व्या वर्षीही संस्थेला खुप मोठे वैभव प्राप्त करून देण्यासाठी झटण्याचा त्यांचा उत्साह आजही इतरांना प्रेरणादायी आहे.
शब्दांकन: शिवाजी साळुंके प्रतिनिधी, सार्वमत..

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन संस्था उभी केली. अनेक अडचणी आल्या. त्यामधून मार्ग निघाला. कोणत्याही अडचणीला न डगमगता खंबीरपणे सर्वांनी साथ दिली. याच बळावर श्रीगोंदा शहरातील शाळेचे यशस्वी मार्गक्रमण सुरु आहे.
मुरलीधर उर्फ आण्णा होनराव, संस्थापक अध्यक्ष..

स्रोत:(अग्नीपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading